ते म्हणतात- We care!!

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सध्या सारे घरातूनच शक्य ते काम करत आहेत. पण ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं काय? अशा मजूर, कामगार वर्गासोबतच ज्येष्ठ नागरिक, शिक्षणासाठी दुसऱ्या गावी राहणारे विद्यार्थी, सिंगल पॅरेंट असणाऱ्या अनेकांना या लॉकडाऊनच्या काळात रोजच्या जेवणाच्या तजविजीपासून ते मेडिकल इमर्जन्सीपर्यंत कशालाही तोंड द्यावं लागू शकतं.
ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच पुण्यातील दीक्षा दिंडे, मुंबईतील राहुल साळवे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी फेसबुकवर #We_Care या हॅशटॅगखाली एक मदत गट उभारला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून (फेसबुक, व्हॉटसअप आणि इन्स्टाग्राम) या सर्वांनी गरजूंना जेवण अथवा किराणा, नर्सेस किंवा डॉक्टरांची इमर्जन्सी मदत मिळवून देणे आणि रक्तदानाविषयीची जनजागृती आणि आवाहनाचे काम गेल्या आठवड्याभरापासून सुरू केलंय.


खरंतर दीक्षा आणि राहुल हे दोघंही स्वत: दिव्यांग आहेत. व्हीलचेअरच्या मदतीशिवाय त्यांना घराबाहेर पडता येत नाही, पण त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला की त्यांना दिव्यांग म्हणणं हा त्यांचा अपमान आहे असं वाटतं. अर्थात यांच्यासोबत धावपळ करू शकणारी इतरही मित्रमंडळी आहेतच. तर यांचा ग्रुप जमला तो सांगली- कोल्हापूरला आलेल्या पुराच्या संकटापासून. आपण काहीतरी करायला हवं असं या सगळ्यांनाच वाटत होतं, कित्येकांनी एकमेकांना पाहिलंपण नव्हतं. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकत्र आले, मग व्हॉटसअप ग्रुपही बनला आणि पूरग्रस्तांसाठी #Flood_updates चा हॅशटॅग सुरू झाला. त्यातून पूरग्रस्तांना किराणा कीटस् पोहोचवणं, पाण्यात अडकून पडलेल्या लोकांपर्यंत प्रशासनाला पोहोचवणं, पूर ओसरल्यानंतर लोकांची घरं साफ करणं इ. काम केलं.


जेव्हा पंतप्रधान मोदींनी 22 मार्चच्या जनता कर्फ्युची घोषणा केली तेव्हा त्या दिवसापुरती कुणाला काही मेडिकल इमर्जन्सी आली तर आपण मदत करूया, अशा विचारांनी त्यांनी #We_care हा हॅशटॅग बनवून कुणालाही काहीही वैद्यकीय मदत लागली तर आमच्याशी संपर्क साधा असे मेसेज सोशल मीडियावरून त्यांच्या फोन नंबरसह पसरवले. त्यांना ‘युनायटेड नर्सेस असोसिएशन ऑफ पुणे’ ने पाठिंबा दिला असून, कुठंही अचानक गरज लागली तर नर्सेस, डॉक्टर्स आणि अम्ब्युलन्स यायला तयार आहेत. सुदैवाने त्या दिवशी फक्त एकाच व्यक्तीला वैद्यकीय मदत लागली. त्यांच्या मुलाला फीट्स आल्याने आणि बाहेर सर्व काही बंद असल्याने या ग्रुपच्या माध्यमातून त्यांना वेळेवर डॉक्टरांची मदत पोहोचली.

“तो दिवस व्यवस्थित पार पडला पण पुढे कोरोनाचे संकट गडद होत जाण्याची लक्षणं दिसू लागली आणि आम्ही काम चालूच ठेवायचं ठरवलं. दरम्यान आम्ही #Corona_Updates या हॅशटॅगखाली लोकांना काय काळजी घ्यावी, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचे सल्ले हे देखील पोहोचवत होतो. आरोग्यमंत्री राजेश टोपेंची आवाहनं ऐकताना कळालं की राज्यातल्या रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा आहे. आणि रक्ताची गरज केवळ कोरोनोबाधितांना नाही तर थॅलॅसेमियाग्रस्तांना किंवा इतर कुठल्याही इमर्जन्सीत लागू शकते. मग आम्ही #We_care_for_blood_donation या हॅशटॅगखाली लोकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करू लागलो. ”
“लोकांमध्ये खूप संभ्रम होता. या कोरोनाच्या काळात रक्तदान केल्याने आपल्यालाच अशक्तपणा आला तर? आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर? अशा अनेक शंका लोकांना असायच्या. रक्तदान केल्याने अशक्तपणा येत नाही याबाबतची शास्त्रीय माहिती आम्ही त्यांना देत होतो. शिवाय काही सेलिब्रिटीज- छाया कदम, सयाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून रक्तदानासाठी काही व्हिडिओ आवाहनं तयार करून घेतली. पुण्याच्या जनकल्याण रक्तपेढीशी संपर्क साधून आम्ही एक गुगल फॉर्म तयार केला. त्यात ज्यांना रक्तदान करायची इच्छा आहे अशा व्यक्तींची प्राथमिक माहिती असायची. ज्यांचे वय, वजन जुळायचे त्यांना रक्तपेढी रक्तदान करण्यासाठी बोलवायची. एका वेळेला दोघांनाच रक्तदानाची परवानगी होती. ती परवानगीची रिसिट मोबाईलवर यायची, ती पोलिसांना दाखवून लोक लॉकडाऊनमधेही रक्तदान करायला आले. ज्यांचे मोठे ग्रुप होते, तिथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अम्ब्युलन्स पाठवून रक्तदान करवून घेतले. आता जनकल्याण रक्तपेढीत किमान दोन आठवडे पुरेल एवढा रक्तसाठा आहे आणि राज्यात आमच्या आवाहनानंतर 2000 जणांनी 31 मार्च 2020 पर्यंत रक्तदान केलेलं आहे” दीक्षा सांगत होती.
याशिवाय #We_care_for_Food या हॅशटॅगद्वारे आत्तापर्यंत 600 हून जास्त गरजू लोकांना तयार डबे किंवा किराणा कीटस् पोहोचवली आहेत, #We_care_For_medicines द्वारे 100 हून अधिक लोकांपर्यंत हवी असलेली औषधं स्वयंसेवकांद्वारे घरपोच पोहोचविली आहेत. काही ठिकाणी फार्मासिस्टही त्यांच्या कामात सहभागी झाले असून ते सुद्धा गरजू आजी- आजोबा, दिव्यांग व्यक्तींना घरपोच औषधं पोहोचवीत आहेत. किराणा कीटस तयार करण्यासाठी कोल्हापूर- सांगलीच्या पुराच्या वेळी जमा झालेला निधी वापरण्यात येतोय. आता लवकरच रस्यावरच्या बेघर, गरीब, गरजू लोकांसाठी तयार जेवण पोहोचविण्याचा या ग्रुपचा विचार आहे. या ग्रुपमधील प्रमुख सदस्यांची नावे जरी मोजकी असतील तरी महाराष्ट्रात शक्य त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
या मदतगटाच्या सदस्यांची नावे आणि फोन नंबर. खऱ्याखुऱ्या गरजूंनी जरूर संपर्क साधावा.
पुणे:
चिन्मय साळवी – 81498 96898 (सिंहगड रोड)
सुजित नवले – 97629 08917 (नवले ब्रिज)
दीक्षा दिंडे – 81497 27257 (कात्रज)
पूजा भडांगे – 86552 67950 (रावेत)

मुंबई- नवी मुंबई:
राहुल साळवे – 99671 16687
नितीन जाधव – 77383 78017
रुपाली कदम – 88790 31363

कोल्हापूर:
सिद्धांत मांगोलीकर – 96659 98026

– स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे

Leave a Reply