जून महिन्यात धुळ्यातील एका नामांकित बँकेतून २ कोटी ६ लाख ५० हजारांची रक्कम अचानक बँक सुरु होण्याआधीच लंपास झाली. सुरुवातीला ही चोरी बँकेतील कर्मचाऱ्याने केली असा पोलिसांचा संशय. मात्र पोलीस तपास पुढे सरकला तशी धक्कादायक माहिती समोर येत गेली.
घडलं ते अस. बँकेतील एक खातं हॅक केलं गेलं. तिथून दोन कोटी ६ लाखांची रक्कम १८ बँकेच्या २७ खात्यांमध्ये वर्ग केली गेली. हॅकरने नंतर ही रक्कम पुढे ६९ खात्यांमध्ये वर्ग केली. पुढे हे पैसे २१ खात्यात वर्ग केले गेले. काही तासात या कोट्यवधी रुपयांनी ११७ बँक खात्यांचा प्रवास केला. ना कोणाला एटीएम डिटेल विचारले गेले ना कुणा स्थानिक माणसाची मदत घेतली गेली, तरी या हॅकर्सने धुळ्यातील बँकेला कोट्यवधींनी लुटले.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन टीम तयार केल्या. व्रजेश गुजराथी या सायबर तज्ञची मदत घेतली गेली. एक टीमने तांत्रिक तपास सुरू केला तर दुसरी टीम आरोपीना आणण्याच्या कामाला लागली.
पोलिसांपुढे तपासाचं मोठं आव्हान होतं. धुळे पोलीस दिवस रात्र कामाला लागले. ज्या ११७ खात्यांमध्ये पैसे वर्ग झाले होते ती सर्व खाती बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडली गेली होती, त्यामुळे तपास अवघड ठरत होता. अश्यातच एक मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्या नंबरवर पाळत ठेवली गेली. तो नंबर वापरणाऱ्या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.
पोलिसांचं दुसरं पथक तात्काळ दिल्लीत पाठवलं गेलं. तिथं पोलिसांना नीतिका दीपक चित्रा ही ३० वर्षीय महिला हाती लागली. तिची चौकशी केल्यावर डोकं चक्रावून टाकणारी हकीकत समोर आली. नीतिका आणि तिचे तीन साथीदार दीपक चित्रा, रमनकुमार दर्शनकुमार आणि अवतारसिंग वरेआमसिंग हे टोबॉचिकू जोसेप ओकोरो ऊर्फ प्रेस या २३ वर्षीय नायजेरियन हॅकरसाठी काम करीत असल्याचं पोलिसांना कळलं.
त्यांनी लगेचच प्रेसला ताब्यात घेतलं. त्याच्या अन्य साथीदारांना इंदोर शहरातून ताब्यात घेतलं. प्रेस पर्यटनासाठी भारतात आला होता. त्याचा व्हिसा संपूनही तो इथंच राहिला. तो बँकांची खाती हॅक करायचा आणि कोट्यवधींची माया गोळा करत होता. ही टोळी अत्यंत नियोजनबद्ध काम करत असे. खाते हॅक करणारे, KYC प्राप्त करून बँक खाते उघडणारे, बँकेतून पैसे काढणारे आणि ते जमा करणारे, अश्या वेगवेगळ्या टप्प्यात ही टोळी काम करायची.
या टोळीकडून पोलिसांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांचे एटीएम, मोबाईल, सीमकार्ड, कॉम्प्युटर, आयपॅड, नोटा मोजण्याची दोन मशीन्स, डिजिटल लॉकर, डिजिटल घड्याळ असं सुमारे ६ लाखांचं साहित्य जप्त केलं आहे. पोलिसांनी या दरम्यान पैसे वर्ग केलेल्या बँक खात्यातील ८८ लाखापेक्षा अधिकची रक्कम गोठवली आहे. धुळे पोलिसांच्या या कामगिरीमुळे अनेकांची फसवणूक उघड होणार असून, अनेकांची भविष्यातील फसवणूक टळली आहे. डिजिटल विश्वातील या चोरीचा छळा लावण्यासाठी धुळे पोलिसांना तब्बल पाच महिने रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागली.
– कावेरी परदेशी, धुळे
#नवीउमेद #धुळे
Support Navi Umed – https://naviumed.org/support