त्यांच्या धैर्याला सलाम !

सहकाराचं मोठं जाळं असलेला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा. आर्थिक दृष्ट्या संपन्न जिल्हा समजला जात असला, तरी गरिबीशी झुंजणारे लोक इथे कमी नाहीत. या जिल्ह्यात पुणे-नगर हायवेवरचं चास नावाचं छोटं खेडं. शहरालगत वसलेल्या याच गावात राहणारं जाधव कुटुंब. ८० वर्षाचे गंगाराम आणि ७५ वर्षांच्या त्यांच्या पत्नी सीताबाई जाधव.
पिढीजात गरीबी, राहायला स्वतःचं घर नाही. दुसऱ्याच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आपला संसार मांडलेला. पोटापाण्याचं एकमेव साधन म्हणजे जेमतेम एकरभर शेती. हलाखीपायी दोन मुलींचं लहानपणीच लग्न लावून दिलेलं.


गंगाराम आणि सीताबाई कबाडकष्ट करुन आपला संसार चालवत होते.
एक दिवस अचानक गंगाराम यांचा मोठा अपघात झाला. त्यात त्यांचा एक हात अन् एक पाय गंभीर जखमी झाला. ते अंथरूणाला खिळून पडले. घरात पैसा नाही, कोणाचा मानसिक आधार नाही. या परिस्थितीतदेखील त्यांच्या पत्नी सीताबाई खचल्या नाहीत. त्यांनी हातात नांगर धरला. नवऱ्याची अहोरात्र सेवा करत करत त्यांनी स्वतः शेती करण्यास सुरुवात केली.
औषधखर्चासाठी जवळ असलेल्या ६ पैकी ४ शेळ्या विकाव्या लागल्या. एका एकरमध्ये पहिल्या वर्षी त्यांनी कांदा आणि लसूण लावला. कांद्याला भाव न मिळाल्याने तो सडला आणि अक्षरशः फेकून द्यावा लागला. पण सीताबाईंनी जिद्द सोडली नाही. आठवडी बाजारात जाऊन त्या लसूण विकत असत आणि सोबतच इतरांच्या शेतात मजुरीकाम करुन मिळणाऱ्या पैशातून नवऱ्याचं औषधपाणी करत.
जिद्द, कष्ट यांना या वर्षी निसर्गाचीदेखील साथ मिळाली. चांगला पाऊस झाल्याने गव्हाचं चांगलं पीक आलं. त्यासोबतच लसूण आणि कांद्याचं उत्पन्नही मिळालं. आता गंगाराम यांच्या तब्येतीत पण चांगला फरक पडलाय. ते आता चालु-फिरु शकत आहेत.
एकामागून एक संकटं येऊनसुद्धा, कोणाचाही आधार नसताना सीताबाई ठामपणे उभ्या राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी मनात एक उमेद जागृत ठेवली. त्यांच्या धैर्याला सलाम ! धैर्या सीताबाई – कौशल खडकीकर, बीड