त्यांनाही मिळाली शिक्षणाची संधी

खोपेगाव ता. लातूर इथली ही गोष्ट. बाळू, प्रभावती व बबन मारोती रणसूळे ही तीन भावंडे वडिलांविना पोरकी. चार घरची धुणीभांडी करून आईचं त्यांचे पालन पोषण करते. प्रभावती आईसोबत कामाला जात होती. तर बाळू व बबन ही दोन मुले हॉटेलात काम करीत. या बाल मजुरांची माहिती मिळताच कला पंढरीचे बी.पी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सविता कुलकर्णी, मधुकर गालफाडे, जयवंत गंगापल्ले, प्रतिमा कांबळे आदींनी सदर बालकामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईस समजावून सांगितले. नंतर चाईल्ड वेलफेअर समितीच्या (सीडब्ल्यूसी) माध्यमातून या मुलांना सरकारी वसतीगृहात दाखल केले.
कलापंढरीने बालमजुरीतून सोडवलेली ही मुले आज आवडीने शिक्षण घेत आहेत. कलापंढरी ही संस्था गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात बाल हक्क आणि जागृतीचे कार्य करीत आहे. ही संस्था राष्ट्रीय पातळीवरील चाईल्ड लाईनच्या माध्यमातून बाल मजुरी निर्मूलनाचेही प्रभावीपणे काम करीत आहे. वर्षभराच्या काळात १४ वर्षे वयोगटातील ८० बाल मजुरांची त्यांनी सुटका केली आहे. तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन केलेले आहे.

या शिवाय लातूरच्या राजीवनगरात राहणारा आई-वडिलाचे छत्र हरवलेला गौतम जाधव हा छोटा मुलगा आपल्या आजोबासोबत बिगारी कामास जात होता. या चिमुकल्याचीही मजुरीतून सुटका केली. त्याला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समाजकल्याण विभागाच्या निवासी वसतीगृहात प्रवेश दिला असून तो आता आठवीचे शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड येथील सुमन रावसाहेब साळुंके व तिच्या भावाचीही अशीच कहाणी आहे. सुमन १४ वर्षाची तर तिचा भाऊ १२ वर्षाचा. आई-वडिल नाहीत आणि दुसरे जवळचे असे कोणीच नव्हते. कुणाचाही आधार नव्हता. सुमन इतरांच्या घरची धुणीभांडी करायची. चाईल्ड लाईनवरून या दोघांचीही संस्थेने दखल घेतली. सुमनची शाळा बंद झालीच होती, पण तिचा भाऊ सहावीच्या वर्गात शिकत होता. या भावंडांना चाईल्ड वेलफेअर समितीने वर्षभर रामचंद्र बालकाश्रमात ठेवले. त्यानंतर बाल कल्याण समितीसमोर सादर केले आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.
-शिवाजी कांबळे