सोलापुरातील कुंभारवेस भाग. इथल्या क्षेत्रीय गल्लीत राहणारे 53 वर्षीय दशरथ शालगर. त्यांचा शिवणकामाचा परंपरागत व्यवसाय आहे. टोपी, पिशव्या, लहान मुलांचे कपडे, झबले, लेडीज पर्स या वस्तूंचं शिवणकाम त्यांच्या दुकानात केलं जातं. बावीस वर्षांपासून ते आपला व्यवसाय सांभाळत आहेत. बाजारात सध्या मास्कला मागणी असल्यामुळे त्यांनी मास्क तयार करायला सुरूवात केली. ते विकून त्यांना दिवसाकाठी अडीचशे रुपये मिळकतही सुरू झाली. यावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मास्क तयार करण्यासाठी त्यांच्या पत्नी उमा या देखील त्यांना मदत करतात.
पण साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांना काही गरीब लोकांकडे पैसे नसल्याने मास्क घालत नसल्याचे दिसून आले. त्यांनी मास्क नाही घातले तर त्यांचं आरोग्य धोक्यात येईल हे शालगर यांना जाणवलं. म्हणून त्यांनी स्वतःहून लोकांना मोफत मास्क द्यायला सुरुवात केली.
त्यांच्या समोरून एखादा माणूस मास्क न घालता जात असेल तर ते स्वतःहून त्यांना मास्क देतात.असे दिवसभरातून दहा ते पंधरा लोकांना मास्क देतात. एका मास्कची किंमत जवळजवळ वीस ते तीस रुपये आहे. लोकांना मास्क दिल्याने आपल्या व्यवसायात तोटा येईल याचाही विचार न करता ते मोफत मास्क देतात. रस्त्यावरून जाणारे येणारे लोक देखील त्यांच्या या कामाचे कौतुक करतात.
शालगर सांगतात, “रस्त्यावर एखादा गरीब माणूस विनामास्क फिरत असेल तर मी त्याला आवर्जून मोफत मास्क देतो. यामुळे व्यवसायात तोटा येईल याचा मी विचार करत नाही. सामाजिक भावना म्हणून मी लोकांना मदत करतो. असं केल्यामुळे मला लोकांचा आशीर्वाद लाभेल असं वाटतं.”
– अमोल सीताफळे, सोलापूर