दाणापाणी एटीएम

लॉकडाऊनमुळे सगळीकडेच सध्या थोड्या वेळासाठी दुकाने उघडी राहत आहेत. अर्थातच तेवढ्या वेळातच सर्वसामान्य व्यक्ती जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे एरवी गजबजलेले रस्ते, वसाहती निर्मनुष्य झाले आहे. एरवी प्राण्यांना उष्टे-खरकटे किंवा शिल्लक राहिलेलं अन्न देणारी मंडळीही आता रस्त्यावर फिरकेनाशी झाली आणि या प्राण्यांचा भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. नंदुरबार शहरातल्या संकल्प ग्रुपच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी या प्राण्यांचा भुकेचा प्रश्न सोडवायचं ठरवलं.
या भुकेल्या प्राण्यांसाठी आता संकल्प ग्रुपतर्फे आचार्य तुलसी मार्गावर दाणापाणी एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांसाठी पाण्याचे कुंड व दाणापाणी एटीएम ठेवण्यात आले आहेत.
अनेक नागरिक घरातील उष्टे व शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतात. हे अन्न वाया जाऊ न देता त्याचा योग्य वापर व्हावा. तसंच, प्राण्यांना अन्न मिळावे यासाठी संकल्प ग्रुपने त्या त्या भागातील नागरिकांना सदर ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरातील शिळे अन्न आणून टाकावं, असं सांगितलं आहे.
उन्हाचा तडाखाही आता वाढू लागल्याने प्राण्यांना, पक्षांना पाण्याची कमतरता भासते आहे. शहरातील वेगवेगळ्या दहा ठिकाणी पाण्याचे कुंड ठेवण्यात आले आहे त्यात सदाशिव नगर, वृदांवन नगर, शनि मंदिर, सुरभी संकुल, गजानन महाराज मंदिर, लोणखेडा या परिसराचा समावेश आहे. सदर कुंड्यांची जबाबदारी कुंड ठेवण्यात आलेल्या व शेजारी असणाऱ्या घरमालकाला देण्यात आली आहे. घर मालकाने कुंडात रोज पाणी भरायचं आहे. तीन ते चार दिवसांनी कुंड स्वच्छ करण्याची जबाबदारीही काहींनी घेतली आहे. तसंच संकल्प ग्रुपचे सदस्य गावात येता-जाता कुंडावर लक्ष ठेवून असतात. दाणापाणी एटीएम आणि कुंड ठेवलेल्या घराशेजारील व्यक्तीच्या मोबाईलवर फोन करून कुंड पाण्याने भरलेले, स्वच्छ आहे की नाही, याचीही चौकशी ते आवर्जून करत आहेत.
या उपक्रमाबद्दल शहरवासियांकडून संकल्प ग्रुपचे कौतुक होते आहेच. शिवाय, आपल्या परिसरातही कुंड लावा अशी मागणी होत आहे. कोरोनाचे संकट निवळल्यानंतर शहरात अजून कुंड व दाणापाणी एटीएम वाढवणार असल्याचं संकल्प ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
– रुपेश जाधव, शहादा