दारू गाळणारे हात लागले- कशिदाकामाला!

सोलापुरात 22 ते 24 जुलै दरम्यान बंजारा महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या, कशिदाकामाच्या वस्तू, कपडे, ड्रेसमटेरियल, शर्ट, साड्या, पिशव्या, पर्सेस यांचं एक उत्तम प्रदर्शन भरलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झालं, तर अध्यक्षस्थानी भटक्या विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पी. शिवशंकर, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या बंजारा महिलांच्या उद्योगशीलतेचे आणि कलाकौशल्याचे कौतुक केले. सामान्य सोलापूरकरांचाही या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभला.

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अलंकार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आणखी एका व्यक्तीचं मनापासून कौतुक होत होतं- त्यांचं नाव आहे, सोलापूरच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते. आता तुम्हांला सांगायलाच हवं की, वर उल्लेख केलेल्या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बंजारा महिला या काही वर्षांपूर्वी सोलापुरात हातभट्टीची दारू गाळण्याचा आणि दारूविक्रीचा व्यवसाय करत होत्या. हे अवैध आणि घातक काम बंद करण्यासाठी सोलापूरच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी १ सप्टेंबर २०२१ पासून ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा उपक्रम सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या मदतीनं हाती घेतला आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून बंजारा महिला या प्रदर्शनात उद्योजक म्हणून, अभिमानाने आपल्या उत्पादनांची विक्री करत होत्या.

सोलापूर जिल्ह्यात बंजारा तांडे मोठ्या प्रमाणावर आहेत. या तांड्यांवर हातभट्टी दारूविक्रीचे काम सर्रास व्हायचं. हे थांबवण्याच्या मुख्य उद्देशाने ‘ऑपरेशन परिवर्तन’ची सुरूवात झाली. यात हातभट्टीच्या दारूचे उत्पादन आणि विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच, बंजारा महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणे, त्यांच्यातल्या कलेला प्रोत्साहन देणे आणि विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या ऑपरेशनदरम्यान हातभट्टीची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यातील ७१ गावांची/ तांड्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक तांड्याला एक पोलीस पालक नेमण्यात आला. पालक अधिकारी सातत्याने वरील उद्देश डोक्यात ठेवून त्या गावाला भेट देत असे. यात कारवाईची भीती दाखवणे, समुपदेशन, पुनर्वसन आणि जागृती ही चतु:सुत्री डोक्यात ठेवून बंजारा तांड्यांसोबत काम केलं गेलं.

आत्तापर्यंत बंजारा तांड्यावरील ६०० हून अधिक लोकांचे पुनर्वसन करण्यात आलंय. त्यांचं किराणा दुकान,  मटण– चिकन दुकान, नोकरी मेळावा, उद्योजकता इ. मार्गानं पुनर्वसन करण्यात आलंय. मुळेगाव तांड्यातील ४१ महिलांना घेऊन कपडे शिवण्याचा उपक्रम सुरू केला गेला. त्यांना मिटकॉन संस्थेमार्फत शिवणकाम आणि फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण दिलं गेलं. त्यापैकी २० महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुळेगावच्या पालक अधिकारी आणि पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी हॉल, शिलाई मशीन आणि कर्जसुध्दा उपलब्ध करून दिलं. या महिला आता जर्मनीला कपडे निर्यात करणाऱ्या अपेक्स गारमेंट कंपनी सोबत काम करतायेत. या उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणजे आता, २० बचत गटातील २०० महिलांना पुण्यातील फॅशन डिझायनर तर्फे प्रशिक्षण दिलं जातंय.

“बंजारा महिलांना जन्मत:च कलाकुसर करण्याची उत्तम कला अवगत असते. नवीन पिढीतील कितीतरी जणी बीए, बीएस्सी शिकून पदवीधर झालेल्या आहेत. दारू गाळण्याचा व्यवसाय हा अवैध आहे, आणि तो प्रतिष्ठेचा तर मुळीच नाही याची जाणीव या तरूण बंजारा महिलांना आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन परिवर्तन’ला महिलांनी अगदी उस्फूर्त साथ दिली. त्यांचे पारंपरिक कशिदाकाम यासोबत, मिटकॉन, जिल्हा उद्योग केंद्र, अपेक्स गारमेंटसारखे स्थानिक उद्योग इ.नी त्यांना प्रशिक्षण दिले. आणि दारू गाळणारे हात आता उद्योगात गुंतले. या प्रदर्शनात अत्यंत सुंदर कशिदाकारी केलेल्या साड्या, जाकीटं, ड्रेस मटेरियल, कुर्ते, ५०० हून अधिक कुशन्स, वॉल हँगिंग फ्रेम्स, घड्याळ, ओढणी, शाली अश्या एकाहून एक देखण्या वस्तू आहेत. या प्रदर्शनाच्या विक्रीतून मिळणारा संपूर्ण नफा या बंजारा महिलांचाच असेल. इतकंच नाही तर सणासुदीला अशी आणखी प्रदर्शनं भरवली जातीलच, शिवाय या महिलांकरिता ऑनलाईन विक्रीचा प्लॅटफॉर्म उभारण्याचाही आमचा मानस आहे” तेजस्वी सातपुते बोलत होत्या.

सोलापूरजवळ कुंभारीमध्ये गेली अनेक वर्षं ज्योत्स्ना मंजुळकर या बंजारा समाजाकडून दारू विकत घेऊन, दारूविक्री करत होत्या. पण ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यमातून त्यांचंही मनपरिवर्तन झालं. तब्बल २२ वर्षांनंतर त्यांनी कुंभारीत कपड्यांचं दुकान सुरू केलंय. त्या म्हणतात “ माझं स्वप्न जरी मला पूर्ण करता आलं नसलं तरी माझ्या मुलांनी ते पूर्ण करावं, उत्तम आयुष्य जगावं अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच त्याच्या शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्त्व देतोय. त्याला उत्तम शिक्षणासाठी गुरूकुलमध्ये घातलं आहे आणि दारूविक्री बंद करून घरातही चांगलं वातावरण देण्याचा प्रयत्न करतोय.”

लेखन: विनोद चव्हाण, सोलापूर

 

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवी_उमेद

#ऑपरेशन_परिवर्तन

#सोलापूर

#तेजस्वीसातपुते

#बंजारातांडा

#सातपुतेपॅटर्न

 

Leave a Reply