माढ्यात शिवाजीनगर, सोलापूर रोड परिसरात मोबाईल दुकान आहे. नाव कर्मवीर मोबाईल. या दुकानात दारू ,सिगारेट गुटखा, गांजा , तंबाखूचं व्यसन करणाऱ्यांना प्रवेश नाही. दुकानासमोर तसा फलकच आहे. मादक पदार्थांचं सेवन करून आलेल्यांना परत पाठवण्यात आलं आहे.
हे दुकान प्रा. बापूराव घुले यांचं.अनगर इथल्या कै. शंकराव बाजीराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात ते २०११ पासून प्राध्यापक आहेत. नोकरीसोबतच त्यांनी २०१५ पासून हे दुकान सुरू केलं. या यादरम्यान त्यांना बहुतांश तरुण व्यसनाच्या आहारी गेलेले दिसले.
”तरुण पिढी म्हणजे देशाचं भविष्य. पण ही पिढी व्यसनांच्या विळख्यात गुरफटलेली. अन्नापेक्षा व्यसन महाग.” बापूराव सांगतात.
दुकानातल्या अशा नो एण्ट्रीमुळे व्यवसायात तोटा होतो पण यापेक्षा आतापर्यंत ६० जणांना व्यसनमुक्त केल्याचं समाधान ते मोठं मानतात. अनेक तरुणांचं समुपदेशन त्यांनी केलं आहे. व्यसनमुक्त झालेल्या काही तरुणांना त्यांनी कामावरही ठेवलं.
व्यसन सोडून देण्याची हमी देणाऱ्यांना १० हजार रुपयांच्या आतल्या मोबाईलसाठी ते पतपुरवठा करतात.
”व्यसनरूपी विनाशकारी वादळाची तीव्रता भयंकर आहे.” बापूराव सांगतात. ”फक्त इच्छाशक्तीच्या बळावर व्यसन सुटू शकत नाही. त्याला योग्य प्रयत्नांची जोड, योग्य मार्गदर्शन तसंच योग्य औषधोपचारांची साथ हवी. प्रत्येक गावात समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घ्यायला हवा.”
-अमोल सीताफळे, ता. माढा, जि. सोलापूर
#नवीउमेद #माढा #सोलापूर
Amol Sitafale
UNICEF India
Swati Mohapatra