देणाऱ्याने देत जावे…

जवळच्या व्यक्तीचे अचानक निघून जाणे सगळ्यांनाच चटका लावून जाते. पण, दुःख बाजूला सारून काही माणसे त्या व्यक्तीचे कार्य पुढे नेतात. सोलापुरातल्या माढा इथले अंबादास काटकर. त्यांच्या तीन मुलांपैकी मधल्या महेशचे फुफुसांच्या आजाराने निधन झाले. महेश हा युनियन बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होता. महेशच्या अकाली जाण्याने काटकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. महेशचा मोठा भाऊ कैलास यांचे मोडनिंब येथे सलून आहे. काटकर कुटुंबियांची परिस्थिती बेताचीच. पण, दुःख बाजूला ठेवून महेशच्या स्मृतीप्रित्यर्थ २०१३ पासून त्यांनी समाजातल्या गरजूंना मदत द्यायला सुरूवात केली.  तीन लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर असूनही महेशने त्याचा पहिला पगार गरजू विद्यार्थ्यांना दान केला होता. त्याची हीच कृती कुटुंबियांसाठी प्रेरणा ठरली. काटकर कुटुंबियांनी अपंग, मुकबधीर व अनाथांसाठीच्या संस्थांना, गरीब विद्यार्थ्यांना सुविधा पुरवणे, खेळाचे साहित्य भेट देणे सुरु केले. गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवणे सुरू केले.
२०१३ साली काटकर कुटुंबियांनी बैरागवाडी ता. माढा येथील जिल्हा परिषद शाळेतील ५५ मुलांना चपलांचे वाटप केले. २०१४ मध्ये अंध तबलावादक बिभिषण तुकाराम माने व सोलापूर येथील ‘व्हाईस अॉफ व्हाईसलेस’ या मुकबधीर संस्थेला आर्थिक मदत दिली. (या संस्थेच्या कामाविषयीची पोस्ट अलीकडेच या पेजवर प्रकाशित झालीच होती.)
२०१५ मध्ये बैरागवाडी येथील मोहोळ तालुक्याच्या हद्दीत येणा-या व्यवहारे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करून दिली. त्याच बरोबर येथील मुलांना खेळाचे साहित्य भेट दिले. 

मोहोळ येथील बाल चित्रकार युगंधर साळुंखे याचे मोडनिंब येथे तीन दिवस चित्रप्रदर्शन भरवण्यासाठी प्रोत्साहन देऊन मदत केली. या प्रदर्शनाला नामांकित चित्रकार शशिकांत धोत्रे याने भेट दिली. तर २०१६ मध्ये त्यांनी आईचे छत्र हरवलेल्या समीर ओहोळ या नववीत शिकणा-या मुलाला दत्तक घेतले आहे. त्याचा आठवी ते दहावीपर्यंतचा खर्च काटकर कुटुंबीय करणार आहेत.  कैलास काटकर सांगतात, “महेश दर महिन्याला गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून काही रक्कम मनीअॉर्डरने पाठवत होता. ते म्हणतात, आम्ही गरिबीत दिवस काढले. शिक्षण घेत असताना अनेक अडचणी सोसल्या. त्यामुळेच आर्थिक अडचणीत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दरवर्षी जमेल तशी मदत करत असतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक लोन मिळवून देणे, फीमध्ये सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे असे कैलास काटकर यांचे काम नित्यनेमाने चालूच असते.
वंचितांविषयी संवदेनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना कृतीत आणणारे काटकर कुटुंबीय अनेक विद्यार्थ्यांचे शिकणे आनंदाचे करत आहेत. त्यांचा दिवंगत महेश हा कृती आणि स्मृतीरूपाने जिवंतच आहे!

गणेश द. पोळ