दोन्ही हात नसले म्हणून काय झालं?

 

नागेश किनूर. वय ३८ . मूळचे अक्कलकोट तालुक्यातल्या हालहळ्ळी या गावचे रहिवासी. शिक्षण जेमतेम दहावी. रोजीरोटीसाठी १९९७ साली त्यांनी थेट पुणे गाठलं. पुण्यात बिगारी म्हणून त्यांना काही दिवस काम मिळालं. एक दिवस काम करताना नागेश यांना विजेचा शॉक बसला. धक्का इतका मोठा होता की त्यांचे हात, त्यांच्या हातांचे पंजे काढावे लागले. कामाच्या ठिकाणाहून काही भरपाईही मिळाली नाही. त्यानंतर, कित्येक वर्षं त्यांना अंथरुणात खिळून पडावं लागलं. या कठीण प्रसंगात तोंड देताना त्यांना आई वडील आणि पत्नीची खंबीर साथ होती.


नागेश यांना दोन्ही हाताचे पंजे नसल्याने कुणीही काम द्यायला तयार होईना. नैराश्यावर मात करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सोपा व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. तसा कोणताही व्यवसाय सोपा नसतोच. नागेशनी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. हडपसरच्या गाडीतळ पुलाखालच्या भाजीमंडईत ते रोज भाजी विकतात. दोन्ही हातांचे पंजे नसतानादेखील एका सराईत विक्रेत्यासारखे भाजी मोजून ग्राहकांना देतात.
गेल्या ५ वर्षांपासून ते भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत . त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. भाजी व्यवसायात पत्नी सुवर्णाची मदत आहेच.
नागेश यांची आर्थिक परिस्थिती देखील सध्या बेताची आहे. मालकीचं घर नाही. ते भाड्याच्या खोलीत राहतात. अपघातामुळे उपचारासाठी झालेला मोठा खर्च कधी भरून निघेल, कोण जाणे? हातांविना जगण्याची त्यांची उमेद आणि धडपड पाहून त्यांच्याकडे भाजीपाला घेण्यासाठी आलेले लोक त्यांचे कौतुक करतात.

-विनोद चव्हाण, सोलापूर

Leave a Reply