धडपडणारी मुले माझ्यासाठी नव्हे तर, तुमच्यासाठी…

अमोल हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील एम. ए. अर्थशास्त्रचा द्वितीय वर्षाचा एनएसएसचा विद्यार्थी. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरचा रहिवासी. कोरोनाकाळातील अनुभवाबद्दल म्हणाला, “भारतात कोरोनाचा शिरकाव होताच आम्ही सर्व प्रथम ग्रामीण भागात याची माहिती देण्यासाठी बोली भाषेत पथनाट्य लिहिलं. याचं सादरीकरण आम्हीच केलं असतं तर तेवढा प्रभावी झालं नसतं. म्हणून कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसंच विद्यापीठातील ‘एनएसएस’चे संचालक यांना यात रोल दिला. त्याचा व्हिडीओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर बॅनर, पोस्टर तयार केलं. यासोबतच वाडी, तांडे आणि झोपडपट्टीत जाऊन कोरोनाची माहिती दिली. तेथील नागरिकांना हात धुण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर स्वयंसेवकाच्या मदतीने गरजूंची एक वेळची जेवणाची सोय स्वता:च्या पैशानं केली. ‘पेटिएम’वर खातं उघडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चार हजार ७०५ रुपये निधी जमा केला. यावेळी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांना किमान एक रुपया निधी देण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे याची ‘पीएम हाऊस’ने दखल घेतली. ‘एनएसएस’ च्या राष्ट्रीय सभेत याचा उल्लेख केला.”
अमोल एवढ्यावरच थांबला नाही तर लाॅकडाऊनमध्ये शाळा बंद असल्यानं मुलांच्या पालकांची परवानगी घेऊन त्याने त्याच्याच घराच्या छतावर सामाजिक अंतर ठेवत त्यांच्या शिकवण्या घेतल्या. तसंच त्यांच्यासाठी मैदानी खेळ घेतले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत त्रिसूत्री काय आहे? याची माहिती घरोघरी जाऊन सांगितली. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केलं. कोरोना योध्यांना स्वत: फेसशिल्ड तयार करून त्याचं वाटप केलं. याशिवाय उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी पिऊन फेकून दिलेल्या नारळाची ‘सकोरी’ तयार करून ती पाण्यानं भरून झाडावर ठेवली. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक झालं. विद्यापीठात परिसरातील सर्व झाडांवर ‘सकोरी’ ठेवण्यात आली.
अमोल सांगत होता, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांना रक्तदानासाठी तयार केलं. कोरोनामुळे युवकांच्या मनात रक्तदानाविषयी भिती निर्माण झाली होती. रक्तदान केल्यानंतर आपल्याला कोरोना होईल का?, असं त्यांना वाटतं होतं. त्यांचं समुपदेशन करून मनातील भिती घालवली. त्यामुळे रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळाला. शिबिर घेऊन ही रक्ताची गरज भागत नव्हती. म्हणून पुढे रक्ताचा कायमचा तुटवडा भरून काढण्यासाठी महाराष्ट्रभर ‘रक्तदान आणि प्लाज्मा दान’ अभियान सुरू केलं. यासाठी गुगल फॉर्मची निर्मिती केली. या फाॅर्मवर स्वयंसेवकांची नोंदणी केली. ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत, त्यांचा रक्तगट कोणता?, त्याचा पत्ता, याची संपूर्ण माहिती नोंदविण्यात आली. व्हाॅट्सएप, इंस्टाग्राम, फेसबुकवर हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला. या माध्यमातून ३०० स्वयंसेवक आमच्याशी जोडले गेले. या अभियानाचा उद्देश असा होता, कुठल्याही जिल्ह्यात रक्ताची गरज निर्माण झाली तर गुगल फॉर्मवर जमा झालेल्या माहितीतून आम्ही त्या त्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्याचं कळवू शकू. या अभियानामुळे त्यांच्याशी थेट संपर्क साधला जात असल्याने नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, पुणे, शिर्डी, औरंगाबाद, अमरावती, आदी ठिकाणच्या २९ जणांचे जीव वाचले. यात पंधरा दिवसाचं बाळ, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात कुठेही रक्ताची गरज लागल्यास तत्काळ आम्ही त्याठिकाणी डोनर पाठवतो. यापुढेही हे काम असंच सुरू राहील.
– शरद काटकर, नांदेड
#नवीउमेद #नांदेड
NSS Maharashtra

Sharad Katkar