धनेगावच्या स्मार्ट लेडिज

 

वर्षा गुंडले पोकळ बोलत नाहीत. त्यांच्या शब्दांना अनुभवांचं वजन असतं. “संकटं येत राहतात. आपण खचायचं नसतं. हिमतीनं शेवटपर्यंत लढायचं असतं.” हे त्यांचे बोल त्या अध्यक्ष असलेल्या बचतगटानं प्रत्यक्ष उतरवत कोरोनाकाळात नवा आदर्शच घालून दिला आहे.


नांदेड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरचं धनेगाव. इथल्या वर्षा गुंडले, कविता माहेवार, उज्ज्वला वाघमारे, सुशिला कसबे, लक्ष्मी भंडारे, कविता पुलकंटवार, आशा तायडे, शिवकन्या टिमके, आरती पाटोदेेकर, मुक्ताबाई गुंडले अशा १० जणींनी ऑक्टोबर २०१९ मध्ये ‘स्मार्ट लेडिज बचतगट’ सुरू केला. गटाचा आंबुजा गृह उद्योग. पापड, चिवडा, चकली, काटे शेव, शेंगदाणे , फुटाणे हे तयार करणं.


मालाला चांगली मागणी होती. पण जून २०२० मध्ये वर्षा आणि चार- पाच जणींना कोरोना झाला. त्यातून त्या बऱ्या झाल्या. पण समोर मोठं आव्हान उभं राहिलं. कोरोनाचा परिणाम त्यांच्या धंद्यावर झालेला. लोक त्यांच्या मालाला हात लावत नव्हते. उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर.
या संकटातून पुन्हा कशी उभारी घेणार असा प्रश्न महिलांना पडला. या कठीण काळात त्यांचं कुटुंब सोबत होतं. त्याच पाठबळावर त्यांनी बँकेचं कर्ज घेतलं. नव्यानं उद्योगाची उभारणी केली. मालाची गुणवत्ता कायम उत्तम राखली. हळूहळू मालाला पुन्हा मागणी मिळू लागली. दोन महिन्यात उद्योगाला उभारी मिळाली. नांदेड जिल्ह्यासह परभणी, लातूर जिल्ह्यातही त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे. गटानं पाच पुरुषांनाही रोजगार दिला. खर्च वजा जात गटाला रोज पाच हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं.
”कोरोनाच्या संकटानं आम्हाला अधिक मजबूत केलं,” असं वर्षाताई सांगतात.

-शरद काटकर, नांदेड
………

Leave a Reply