धारावीची गोष्ट परिस्थिती सुधरू लागली

पोलिसांवर ताण वाढत होता. शहरातली वाहतूक थांबलेली. खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचारी धारावीत येऊ शकत नव्हते. त्यामुळे सर्व दवाखाने बंद होते. वयस्कर डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवले. धारावीतील तीनशे डॉक्टरांपैकी जेमतेम चार-पाच डॉक्टर्स दवाखाने उघडे ठेवत होते, त्यांपैकी मी एक होतो.
मीही दवाखान्यात जाऊ नये, असा दबाव माझ्या मित्रमंडळीकडून आणि घरून येत होता. पण मी या धारावीत गेली पस्तीस वर्षे काम करीत असल्यामुळे इथला नागरिक माझ्या जगण्याचा एक भाग झाला आहे. त्याच्या अडचणीच्या वेळी डॉक्टर म्हणून माझा सहभाग असणं आवश्यक आहे, असं मला वाटलं. मीच घरी बसलो तर माझे पेशंट, धारावीतील नागरिक आणखी घाबरून जातील, असाही विचार मी केला. धारावीच्या आरोग्यासाठीचा हा लढा आहे आणि म्हणून मला दवाखान्यात गेलंच पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बांधून मी एकही दिवस खंड न पाडता रुग्णसेवा करीत होतो.
कोरोनाच्या लक्षणांबाबत मी रोज तपासत असलेल्या पेशंटना काय औषधं वापरावीत, रोगनिदान कसं करावं, पेशंटना धीर कसा द्यावा या संदर्भात आम्ही डॉक्टर्स मंडळी रोज व्हाट्सअपवर चर्चा करत असू. रक्तचाचणी प्रयोगशाळा, क्ष-किरण तपासणी केंद्रं बंद होती. वाहतूक बंद असल्याने औषधांचा पुरवठा होत नव्हता. मनपाने सर्वच रुग्णालयं ताब्यात घेऊन कोवीड रुग्णालयं म्हणून जाहीर केली होती. खाजगी दवाखाने बंद असल्यामुळे आमच्याकडे भरपूर पेशंट भेदरलेल्या अवस्थेत येत होते. आम्हालाही हा रोग नवीन असल्यामुळे फार काही साहित्य उपलब्ध नव्हते. रोज इंटरनेटवरून अपडेट्स वाचणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करून मी पेशंटना तपासत होतो. शक्य तेवढे उपचार करत होतो. संशयित रुग्ण मनपा रुग्णालयात पाठवीत होतो. औषधांपेक्षा त्यांना व्याधी काय आहे हे समजावून सांगणं, आपली रोग प्रतिकारकशक्ती कशी वाढवायची, त्यासाठी आहार-विहार कसा घ्यायचा हे सांगणं जास्त महत्त्वाचं होतं. मी तर माझ्या दवाखान्याजवळ असलेल्या रिकाम्या जागेत प्रथम पाच-सहा लोकांना घेऊन या आजाराविषयी माहिती द्यायचो. मग कुणाला औषध पाहिजे असेल तर एकेका रुग्णाची सविस्तर माहिती घेऊन औषधे दिली जात होती. प्रतेक डॉक्टर दिवसभरात शंभरेक पेशंट्सना तपासत होता. माझंही तेच, तसंच सुरू होतं.
एप्रिलमध्ये दुसरे लॉकडाऊन सुरू झालं. त्यावेळी धारावीतलेच नव्हे तर मुंबईतील सर्वच परप्रांतीय मजूर, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मजूर आपापल्या गावाकडे जायला अधीर झाले होते. मिळेल त्या मार्गाने त्यांनी आपापल्या गावाकडे कुच केलं. मे महिन्यात तर ट्रेन्स सुरू झाल्या. मजुरांनी आपापल्या गावाकडे मुक्काम हलवला. धारावीतले दीड लाख लोक गावी निघून गेले. आरोग्ययंत्रणेवरचा ताण काहीसा हलका झाला. हळूहळू खाजगी डॉक्टर्सही आपापल्या दवाखान्यात परतू लागले. मे महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारू लागली.
धारावीकर सक्रीय होतेच. त्यांनी सार्वजनिक शौचालयं स्वच्छ कशी ठेवता येतील ते पहिलं. हाउसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वछतापालनासाठी काही कायदेही केले. जे अडीच हजार रुग्ण सापडले ते पूर्ण बरे होऊन गेले. सत्तर टक्के पेशंट बरे झाले. बाकी पेशंट्सना बीएमसी शाळा, मनोहर जोशी विद्यालय, आणि क्रीडासंकुल येथे क़्वारंटाइन केलं गेलं. गेल्या महिन्याभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. १५ जुलै रोजी धारावीत फक्त ८६ कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून ते वेगाने बरे होत आहेत. चौकशी केली असता असं कळलं की, धारावीसाठी बांधलेली दोन क़्वारंटाइन सेंटर्स बंद करण्यात आलीत. आणि ती आता दादरला हलवली गेली आहेत. धारावीतल्या नागरिकांमधलं भीतीचं वातावरण आता गेलं आहे. आता सर्वांच्या हे लक्षात आलं आहे की, एकूण बाधित रुग्णांपैकी फक्त ५ % रुग्णांना इतर काही आजार असल्यास आणि आत्मविश्वास गमावला तर औषधोपचाराची गरज असते. ९५% बाधित रुग्ण संतुलित आणि पोषक आहार-विहार केल्यास बरे होतात. त्यासाठी आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचाराचा यांचाही अवलंब करायला हवा. तीन-साडेतीन महिन्यात हेही लक्षात आलं की, फक्त औषधांचा उपयोग किंवा त्यावर अवलंबून न राहता नीट आहार-विहार ठेवला पाहिजे. कोवीड १९ च्या साथीमध्ये लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी की, धारावीकरांनी आपणहून स्वतःची काळजी घेतली.

Leave a Reply