धुळे जिल्ह्यातल्या शाळेची ‘वायफाय’ अमेरीकन सफर

एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा लोकल ते ग्लोबल प्रवास आपण कधी पहिला आहे? आज आम्ही आपल्याला धुळे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातल्या जिल्हा परिषद शाळेचा ग्लोबल प्रवास दाखवणार आहोत. हा प्रवास आपल्याला थक्क करणारा तर आहेच. अनुकरणीयसुद्धा आहे.  धुळे जिल्ह्यातलं घाणेगाव. साक्री तालुक्यातल्या माळमाथा परिसरात असल्याने दुर्लक्षित. भटके विमुक्त आणि मागासांच्या लोकवस्तीचं. गावाची लोकसंख्या तीन हजार. मात्र आता गावातील जिल्हा परिषद शाळेने राष्ट्रीय पातळीवर लौकिक कमावला आहे. या शाळेतील मुलांना थेट अमेरिकेतील शिक्षक शिकवायला येतात. आपल्याला आश्चर्य वाटेल… मात्र हे खरं आहे! शाळा वायफायने जोडली असल्याने डिजिटल क्लास रूमद्वारे इथली मुलं थेट परदेशात जोडली गेली आहेत. धुळ्यातील तरुण अमेरिकन उद्योजक हर्षल विभांडीक यांच्या मदतीतून हे घडलं आहे. 


शाळेत शिकणार्‍या सर्व मुलांना एकसमान आणि दर्जेदार शिक्षण मिळतं. मुलं मजुरांची किंवा नोकरदारांची असोत. शाळेतील बहुतांश मुलं संगणक साक्षर आहेत. मुलं शिक्षकांच्या मदतीने स्वतःच अनुभवशिक्षण घेतात. त्यांचा आत्मविश्वास चकित करणारा आहे. काही वर्षांपूर्वी शाळेत फक्त १२० मुलं होती. आज गावात एक नव्हे तर दोन जिल्हा परिषद शाळा सुरु झाल्या असून त्याची पटसंख्या १९० च्या घरात आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारी ३० मुलं पुन्हा या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित झाली आहेत.
जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकनप्राप्त शाळा, गुणवत्ताविकासात प्रथम क्रमांक, जिल्ह्यातील पहिली वायफाय शाळा, शिक्षण हक्क कायदयानुसार सर्व भौतिक सोयीसुविधांनी युक्त शाळा… घाणेगावच्या या शाळेच्या नावाने असे अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. शाळेतला प्रत्येक कोपरा मुलांशी बोलणारा.
शाळेला हा दर्जा मिळवून देण्यात शाळेतील शिक्षक, शिक्षणविभाग, स्थानिक ग्रामस्थ आणि हर्षल विभांडीक हा तरुण उद्योजक यांचा मोठा वाटा आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे जगातील कुठलंही ज्ञान मिळवणं या मुलांसाठी एका क्लीकइतक्या अंतरावर आहे.
– प्रशांत परदेशी.