धुळ्यातल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही दिवशी कोरोनारुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालयातून फोन येतो तो, सचिन शेवतकर या तरुणाला. कोरोनामुळे सामाजिक हेटाळणीचा सामना करावा लागणाऱ्या पीडित कुटुंबांना बहुतांशी कोणी आधार नसतो.
गेल्या साडेतीन महिन्यात सचिन यांनी कोरोनामुळे मृत झालेल्या १००हून अधिक व्यक्तींवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. जाती – धर्माचा विचार न करता सचिन आणि त्यांचे सहकारी हे काम अविरत करीत आहेत. सचिन भाजपाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.
एप्रिल महिन्यात धुळ्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनारुग्णांचा तिरस्कार, कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करू न देणे, अशा एक ना एक सामाजिक बहिष्काराच्या घटना समोर येऊ लागल्या. यातून व्यथित होत सचिन यांनी पुढाकार घेत कोरोनारुग्णांची सेवा आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. “मित्रांना विचारले, कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठी पुढाकार घेण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही सोबत येणार का ?”सचिन सांगत होते. त्यावर क्षणाचाही विचार न करता सर्वानी होकार दिल्याचं सचिन सांगतात.
सचिन यांना या कामात आरएसएस आणि भाजपा कार्यकर्त्यांची साथ आहे. प्रशांत मोराणकर, विजय पवार, किशोर कंड्रे, सुरज आहिराव, दिपक दंगोरे, नरेंद्र परदेशी, गोकुळ देवरे, प्रकाश राणा ही मंडळी सचिन यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी राहते. तृतीयपंथीयदेखील त्यांना मदत करत आहेत. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यंचा तिरस्कार करू नये. ही वेळ माणुसकी जपण्याची आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न सचिन या कामातून करत आहेत.
सचिन हे स्वतः हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांची कोरोना रुग्णांवर देखरेख आहे. रुग्णांना योग्य वेळी योग्य ते जेवण मिळतं की नाही ? त्या जेवणाची गुणवत्ता कशी आहे? हे ते वारंवार तपासतात. योग्य ते बदल घडवून आणतात. कोरोना रुग्णांसाठी गरम पाणी पिणं अत्यावश्यक असतं, हे लक्षात घेऊन रुग्णालयात गरम पाणी 24 तास उपलब्ध राहील अशी व्यवस्था सचिव यांनी निर्माण केली आहे. रुग्णसेवेचे काम करत असताना कोरोनाची भीती त्यांना कधी वाटले नाही. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे, याच विचारानं त्यांचं काम सुरू आहे.
– कावेरी राजपूत, धुळे