धोरणकर्त्यांसाठी प्रशिक्षण केंद्र

“विधिमंडळात गदारोळ, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, कामकाज तहकूब…” विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना अशा हेडलाईन्स आपण वाचतो-ऎकतो. पण सुधारणावादी परंपरा लाभलेल्या आपल्या विधिमंडळाची खरी ओळख यापलीकडची आहे. महाराष्ट्र विधिमंडळातल्या वि स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राविषयी आज जाणून घेऊया. ”सभागृहात गोंधळ झाल्याच्या बातम्या लगेच येतात. पण महत्त्वाच्या चर्चेवेळी मध्यरात्रीपर्यंत कामकाज सुरू असतं, हे सहसा लोकांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे व्यवस्थेविषयी नकारात्मकता वाढीला लागते. ती दूर करण्यासाठी, विधिमंडळाविषयी सकारात्मकता निर्माण होण्यासाठी, संसदीय लोकशाही प्रणालीची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी वि स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे”, केंद्रसंचालक निलेश मदाने सांगतात. शासनात आणि त्याआधी पत्रकारितेत प्रत्येकी १२ वर्ष घालवलेल्या मदाने यांना प्रसिद्धीमाध्यमांच्या कामाची उत्तम जाण आहे.

धोरणकर्त्यांच्या दूरदृष्टीसाठी नावाजल्या गेलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक, स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी, तत्त्वचिंतक, १९६० ते ७८ अशी १८ वर्षे विधानपरिषदेच्या सभापतीपदाची धुरा सांभाळणाऱ्या विठ्ठल सखाराम तथा वि स पागे यांच्या नावे संसदीय प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र विधिमंडळात असणे औचित्यपूर्णच आहे. २०१०मध्ये सुरू झालेल्या केंद्राद्वारे संसदीय लोकशाहीच्या कार्यप्रणालीविषयी प्रबोधन केले जाते. आमदार, नव्याने रुजू होणारे शासकीय अधिकारी, विद्यार्थी, विविध संस्था, कंपन्यांमधले अधिकारी-कर्मचारी यांना विधिमंडळाविषयी माहिती दिली जाते. अभ्यासभेटीत सेंट्रल हॉलसह विधानसभा, विधानपरिषद सभागृहे दाखवली जातात. मदाने सांगतात की विद्यार्थ्यांमध्ये या भेटीविषयी फार कुतूहल असते.
राज्यघटना, भारतीय लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, विधिमंडळ कार्यपद्धती, समित्यांचे काम, कायदा तयार करण्याची प्रक्रिया, वित्तीय कामकाज, संसदीय आयुधे, सभागृहाचे, सदस्यांचे विशेषाधिकार , प्रशासन व प्रसिद्धीमाध्यमे अशा विषयांवर स्वतः मदानेंसह विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करतात. नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर सर्व आमदारांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.

महाराष्ट्र इंटरनॅशनल स्टडीज असोसिएशन आणि नेदरलॅण्डच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ पॉलिटिकल सायन्स या संस्थांच्या अभ्यासगटाची विधिमंडळ भेट, नाशिकमधील सीडीओ मेरी हायस्कूल, मनपा शाळा, कोल्हापूरमधील महावीर महाविद्यालय यांच्यासाठीचे अभ्यासवर्ग, यवतमाळ आणि अकोला इथल्या पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींसाठी अभ्यासभेटी, मुंबईतल्या एसएनडीटी आणि श्रीमती चंपाबेन भोगीलाल महाविद्यालयातर्फे अभिरूप विधानसभेचं आयोजन, नागपूरच्या प्रिमिअर अॅकेडमी फार अॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिसेस या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग, नवनियुक्त गट ब अधिकार्‍यांसाठी पायाभूत प्रशिक्षण वर्ग (यावरील माहितीपट सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात आला) हे पागे केंद्राचे अलिकडचे उपक्रम. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि प्रधान सचिव डॉ अनंत कळसे यांच्या मार्गदर्शनाने असे उपक्रम आयोजले जातात.
केंद्राच्या उपक्रमात सहभागी झालेल्यांच्या मनोभूमिकेत संध्याकाळपर्यंत फरक पडलेला असतो. विधिमंडळाविषयी, आपल्या लोकशाहीविषयी सकारात्मक भावना बरोबर घेऊन प्रशिक्षणार्थी जातात हे आमच्यासाठी खूप समाधानकारक असतं, निलेश मदाने सांगतात.

– सोनाली काकडे-कुलकर्णीे / समता रेड्डी, मुंबई