ध्यास झाडांचा, आस पाण्याची- मेहनत बापलेकाची.

आपल्या पर्यावरणासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? तुम्ही म्हणाल शुद्ध हवा, हिरवीगार झाडे आणि मुबलक पाणी. बरोबर आहे, उत्तम पर्यावरणासाठी या अतिशय मूलभूत गरजेच्या गोष्टी आहेत. शिवाय झाडं आणि पाणी अर्थात पाऊस एकमेकांवर अवलंबूनही आहेत. भरपूर झाडं असतील तर चांगला पाऊस येईल, आणि चांगलं पाऊस पाणी असेल तरच हिरवाई वाढीला लागेल.

 

पर्यावरणासाठीच्या याच बेसिक गोष्टींवर काम करतायत नागपूरचे ध्येयवेडे बापलेक- ऋतुध्वज उर्फ बाबा देशपांडे आणि त्यांचा मुलगा रोहित देशपांडे. 78 वर्षांचे बाबा देशपांडे त्यांच्या मुलासह दररोज एकतरी झाड लावतात आणि त्या झाडाचे पालनपोषण- वाढ उत्तम रीतीने कशी होईल याची इतरांसह काळजी घेतात, तर त्यांचा मुलगा रोहित बाबांच्या या कामात त्यांना मदत करतोच, शिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात जलपुनर्भरणासाठीची जनजागृती ही करतोय.

“|| मूल तो ब्रम्हरूपाय, मध्य तो विष्णू रूपिणे, अग्रत: शिवरूपाय, वृक्ष राजाय ते नम: || हा मूलमंत्र मला माझ्या आईने 40 वर्षांपूर्वी दिला. झाडांची, बागकामाची आवड मला होतीच. आईचे शब्द लक्षात ठेवून 1973 सालापासून दररोज नागपुरात झाडं लावायचा नियमच मी घालून घेतला. आमचं नागपूर उन्हाळ्यात फारच तापतं, आमच्या या खारीच्या वाट्याने नागपूरचं तापमान अंशत: तरी कमी व्हावं, अशी मनोमन इच्छा आहे. गेल्या दहा वर्षांपासून माझा मुलगा रोहितही या वृक्षारोपणात आणि वृक्षसंगोपनात स्वेच्छेने मदत करतोय.”” बाबा देशपांडे सांगत होते.

बाबा देशपांडे यांचा पूर्वी स्ट्रक्चरल फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. आत्तापर्यंत बाबांनी आणि त्यांच्या मुलाने मिळून तब्बल 10,001 झाडं नागपुरात लावलेली आहेत. सुरूवातीला बाबा स्वखर्चातून रोज दोन- तीन झाडं विकत घ्यायचे, झाडं लावण्यायोग्य जागा शोधायचे आणि झाडं लावून त्याचं संगोपन करायचे.

हा नित्यक्रम गेल्या दहा वर्षांपर्यंत चालला होता. त्यानंतर बाबा देशपांडेंच्या मित्रांनी पुढाकार घेऊन, या सत्कार्यात त्यांना आर्थिक मदत केली. आता गेल्या 3 वर्षांपासून सान्वी नर्सरीकडून त्यांना झाडंही मोफत मिळत आहेत. शिवाय 78 वर्षांच्या तरूणाचं हे कार्य बघून प्रभावित झालेले लोक, त्यांनी लावलेल्या झाडांचे दत्तक पालक होऊन संगोपन करतात. त्यामुळे आता त्यांचं बरंचसं काम हलकं झालंय. करंज, सप्तपर्णी, रेन ट्री तसेच पिंपळाची झाडं ते प्रामुख्याने लावतात. पिंपळाच्या झाडाला ‘ट्री गार्ड’ लावावा लागत असल्याने, ते जरा खर्चिक आहे. म्हणून त्यांचा भर करंज आणि सप्तपर्णीकडे जास्त आहे. ही झाडं मानव आणि गुरांपासून सुरक्षित आहेत. करंजाच्या झाडापासून ऑक्सिजन तर मिळतोच, शिवाय औषधी तेल सुद्धा मिळते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात या झाडांची विशेष पानगळ होत नाही, त्यामुळे चांगली सावली मिळते.

विशेषकरून पावसाळ्यात भरपूर झाडं लावण्यावर या बापलेकांचा भर असतो, कारण त्या तीन महिन्यात वरून फारसं पाणी द्यावं लागत नाही. ही झाडं लावायला जाण्याकरिता या दोघांनी एक जुनी अँक्टिव्हा गाडी घेतली आहे. त्यावर पुढे दोन विटा ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मोठा कॅन ठेवतात आणि एका पिशवीत फावडे, कुदळ, खतं आणि निवडक झाडं ठेवून ते नियोजित ठिकाणी जातात. खोल खड्डा खोदून त्यात भरपूर पाणी घालतात. त्यावर खताचा एक स्तर टाकून झाडं लावतात, त्यावर पुन्हा खत व नंतर मातीची भर टाकून त्यात पाणी टाकतात. या पध्दतीनं झाडं लावल्यास झाडांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते व ते हमखास जगते. आजपर्यंत लावलेल्या झाडांपैकी फक्त माणसांनी नुकसान केलेली झाडंच  तेवढी जगली नाहीत, असं बाबा देशपांडे सांगतात.

बाबा देशपांडे यांनी इसासनी परिसरातील एका सोसायटीमध्ये पूर्वी 30 झाडं लावली होती. ते रोज त्या झाडांना पाणी टाकण्यासाठी  बारा किलोमीटर अंतर पार करायचे. झाडं जगवण्याची धडपड बघून तेथील लोकांनी ती झाडं दत्तक घेतली. त्यानंतर बाबा देशपांडे यांच्या प्रेरणेनं तिथल्या रहिवाश्यांनी या परिसरात झाडं लावण्याचा सपाटा सुरू केला. आज त्या ठिकाणी चार  हजार झाडं  सावली देत दिमाखात उभी आहेत आणि त्या परिसरातील पाण्याचा स्तर 200 फुटांवरून 40 फुटांवर आलाय, ही फारच मोठी बाब आहे. ओसाड, भकास पडलेली ती सोसायटी आता हिरवीगार दिसते. बाबा देशपांडेंचे हे सर्व काम पाहून नागपूर मनपाने त्यांना ‘परिसर पालक’ आणि ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ देत सन्मानित केलंय, तर निरी संस्थेनं त्यांना ‘जीवनगौरव’ सन्मान दिलाय.

आणि जमिनीतला जलस्तर वाढविण्याचं महत्त्व उमगलंय बाबा देशपांडेच्या मुलाला- रोहित देशपांडे यांना. रोहित स्केटिंगचे नॅशनल चॅम्पियन आहेत. नागपुरातल्या काही शाळांतल्या मुलांना ते स्केटिंग तर शिकवतातच, शिवाय पर्यावरणाचे, झाडांचे आणि पाण्याचे महत्त्वही पटवतात. रोहित यांनी त्यांच्या स्वत:च्या रवी नगर परिसरातील अलश्री अपार्टमेंटमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय. ते म्हणतात “ नागपुरात निसर्गकृपेने मुबलक पाऊस पडतो, छतावरून ओघळणारे पाणी आता जिकडं- तिकडं भरपूर कॉक्रिंटीकरण झाल्याने जमिनीत फार मुरत नाही. शेवटी ते वाहत जाऊन नाल्यातच जाते. हे पाणी किमान हजारो लीटर असणार, मग हे पाणी का वापरू नये असा विचार डोक्यात आला. आणि मी इंटरनेटच्या मदतीने कमीत कमी खर्चात रेनवॉटर हार्वेस्टिंग कसं करता येईल, याचा शोध घेऊ लागलो. आणि मग आमच्या सोसायटीतील विहिरीमध्ये या जलपुनर्भरणाचा यशस्वी प्रयोग केला.”

रोहित देशपांडे यांनी गच्चीवरचे सगळे पाईप एकत्र करून विहिरीजवळ आणले. कमीतकमी खर्चातलं फिल्टरेशन चेंबर तयार केलं. त्यात मोठी गिट्टी, छोटी गिट्टी (खडी), जाड रेती, बारीक रेती आणि कोळश्याचे तुकडे यांची स्तरात रचना केली. पावसाळ्याचे पहिले दोन- तीन पावसाचं पाणी गच्चीवरून या फिल्टरेशनमध्ये सोडायचं नाही ते वाहून जाऊ द्यायचं. कारण त्यात खूप धूळ, इतर पालापाचोळा कचरा असू शकतो. त्यानंतर हे पाणी फिल्टरेशन युनिटमध्ये सोडलं, की पाणी अगदी नितळ स्वच्छ होऊन निघतं. हे पाणी मग विहिरीत सोडलं. हे पाणी आंघोळ, टॉयलेट, किंवा कपडे धुवायला वापरता येतं.

आपल्या सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यावर रोहित गप्प बसलेले नाहीत, त्यांनी आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांनाही याचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने त्यांच्या कामावर आणि सूचनांवर एक मोठी बातमी छापली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं, की फक्त सोसायट्याच नव्हे तर सार्वजनिक जागा, रस्ते, फ्लायओव्हर, महामेट्रोचे व्हायडक्ट यातून वाहून जाणारं पावसाचं शुद्ध पाणी, हे जनपुनर्भरण करून वाचवायलाच हवं. एक हजार स्क्वेअर फूट जागेत पावसाचं सुमारे एक लाख लीटर पाणी जमा होण्याची शक्यता असते, तर सार्वजनिक जागी जमणारं किती बहुमूल्य पाणी आपण वाया घालवतोय. हे सर्व वाचून नागपूर मनपाने त्यांना पर्यावरणविषयक कमिटीवर घेतले आहे, तर महामेट्रोने रोहित यांची सूचना मनावर घेऊन सर्व व्हायडक्ट आणि मेट्रो रेल्वे स्टेशनांत रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय.

नागपूर मनपाला दिलेल्या सूचना मात्र अजून प्रत्यक्षात यायच्या आहेत. रोहित म्हणतात “ 24 तास पाणीपुरवठा असणारं नागपूरइतकं पाण्याच्या बाबत सुदैवी शहर नसेल. पण कदाचित त्याचमुळे नागपूरकरांना पाण्याचं महत्त्व कळायला हवं तितकं उमगत नाहीए. आज जरी चांगली परिस्थिती असली, तरी जमिनीतले पाण्याचे साठे कमी व्हायला वेळ लागत नाही. आज चेन्नईमधला सर्व जमिनीतंर्गत पाणीसाठा अतिशय खोल गेलाय, तर बंगळुरूत हजार फूट खोदल्यावर कुठं पाणी लागतंय. नागपूरवर आणि महाराष्ट्रातील कुठल्याच शहरावर अशी वेळ येऊ नये असं वाटत असेल, तर आत्तापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग शक्य तितक्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तहान लागल्यावर विहिर खोदण्यात अर्थ नसतो”

नीता सोनवणे, नागपूर

 

#जागतिक_पर्यावरणदिन

#विशेष_साप्ताहिक_पोस्ट

#निसर्गाशी मैत्री करू पृथ्वीला जपू

#नागपूर

#Rain_Water_harvesting

#वृक्षारोपण

#वृक्षसंवर्धन

 

Leave a Reply