नको तेरवीचं जेवण…करू पाणीसाठवण

वाशीम जिल्हा. कारंजा तालुका. जानोरी गावं. जेमतेम ८०० लोकसंख्या. एका विहिरीवर आणि कूपनलिकेवर लोकांची भिस्त. डिसेंबर महिन्यातच इथं पाणीटंचाई सुरु होते. त्यामुळे दुष्काळ तसा कायमचाच. म्हणूनच पाणी फाऊंडेशननं स्पर्धेसाठी इतर गावांसोबत कारंजा तालुका निवडला. मग जानोरीतून तीन पुरुष आणि दोन महिलांची ग्रामसभेनं प्रशिक्षणासाठी निवड केली. पाणी संधारणाची कामं झालेल्या ठिकाणी ही टीम गेली. आणि अभ्यास करून आली. या गटानं गावातल्या लोकांना जलसंधारणाच्या कामाची माहिती दिली. महत्त्व समजावून सांगितलं. 

गावातल्याच अन्नपूर्णा बचत गटाच्या महिलांना लगेचच या कामाचं महत्त्व समजलं. कारण सगळ्यांनीच पाण्यासाठी वणवण केलेली. मग या महिलांनी एकत्र येत “आमची तेरवी करू नका, तो पैसा जलसंधारणाच्या कामाला द्या’ असं आवाहन आपल्या मुलांना केलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दोन लाखांचा निधीही जमा केला. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशी गावाला गोड जेवण घालायची खर्चिक प्रथा आहे. त्याऎवजी हा खर्च पाणीबचतीसाठी केला जावा, असा आग्रहच गावातल्या बायांनी धरला.   “गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी तेरवीत होणा-या पैश्याच्या खर्चातून गावात जलसंधारणाची कामे करा. त्यामुळे तुमच्या मुलाबाळांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार नाही. दुष्काळाची झळ सोसतांना आम्हाला झालेलं दुःख शब्दात मावण्यासारखं नाही. तेव्हा पाणी अडवा, पाणी जिरवा हीच आजच्या काळात खरी भक्ती आहे” – बचत गटाच्या सदस्य गंगाबाई भिंगारे मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात.

 : मनोज जयस्वाल