नागपूरमधले डॉ. आशिष अटलोये. ब्लॅंकेटदूत म्हणून ओळखले जातात. थंडीत गेल्या ६ वर्षात त्यांनी २००० हून अधिक ब्लँकेट्स गरजूंना दिली आहेत.त्यांचं स्वतःचं आयुर्वेदिक रुग्णालय आहे. आजोबा स्वातंत्र्यसैनिक गौरीशंकर अटलोये. मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झालेले. इतरांसाठी काही करण्याची प्रेरणा डॉ आशिष यांना घरातूनच मिळालेली.
गरजूंना उन्हयाळयात पाणी व चपला वाटप. अन्नपाणी,बेघरांना आसरा, कोणाच्या औषधाची सोय, यासाठी दररोज १७-१८ फोन किंवा मेसेज डॉक्टरांना येतात. मग कैलाश कुथे, निलेश नागोलकर, अजीज शाह, शीलदेव दोडके, चंद्रकांत घोडेस्वार या मित्रांच्या साहाय्यानं ते गरजूंना आवश्यक ती मदत करतात.
भिक्षेकरी ते कष्टकरी अशी संकल्पना त्यांना राबवायची आहे. इच्छुक भिकाऱ्यांना त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचं दोन वर्षांपूर्वी त्यांनी मतपरिवर्तनही केलं. त्याला फुलांचं दुकान सुरू करून दिलं. छोटीमोठी कामं मिळवून दिली. त्याच्या मुलीला सोमलवार हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारीही डॉक्टरांनी उचलली आहे.
व्हाट्स अप वरच्या समाजऋण या उपक्रमाच्या माध्यमातून साडे तीन वर्षांपूर्वी कोतवाल नगर आणि सोमलपाडा इथे वन टी फ्रॉम वॉल उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजूंच्या चहा, स्नॅक्सची सोय केली. २०१६ मध्ये नेकी कि दिवार हा उपक्रम डॉक्टर आशिष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. वापरात नसलेले कपडे, खेळणी, पादत्राणं, छत्री, रेनकोट इत्यादी नागरिकांनी नेकी कि दिवारपाशी आणून ठेवावं आणि गरजूंनी ते मोफत घेऊन जावं.
डॉक्टर ग्राहक कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आहेत. पोलीस मित्र, मुख्यमंत्री मित्र म्हणून त्यांची निवड झाली होती. शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी ते आहेत.
२०१७च्या लोकनायक जयप्रकाश आंतरराष्ट्रीय अध्ययन विकास केंद्रानं त्यांना सन्मानित केलं आहे. समाजभूषण, अपघात रक्षक पुरस्कारासह १६-१७ पुरस्कार डॉक्टर आशिष यांना मिळाले आहेत.
-नीता सोनवणे , नागपूर
Related