नाशिकच्या अपंग विद्यार्थ्यांचा लघूउपग्रह अंतराळात

 

काव्यांजली जंगले, समर्थ डाके, प्रसाद भोसले, सपना शेंगडे, आर्या थोरात, मल्हार ठाकरे, प्रतीक सूर्यवंशी, आर्यन देवतळे आणि स्वयंम मैंड या मुलांची नोंद इतिहासात होणार आहे. नाशिकमधल्या महाराष्ट्र समाज सेवा संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्याालयाचे हे विद्यार्थी. ही मुलं लघू उपग्रह तयार करत आहेत.


वातावरणातील बदल, सूर्याची अतिनील किरणे, ओझोनचा थर अशा विविध विषयांचा अभ्यास मुलं करणार आहेत. विशेष शिक्षिका अर्चना कोठावदे सांगत होत्या. त्या, वर्षा काळे, शाळेतले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक संतोष पाटील मुलांना मार्गदर्शन करत आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांना साथ आहे.
रामेश्वरममधील हाऊस ऑफ कलाम, ही माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कुटुंबाची संस्था. ही संस्था आणि डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन यांनी एक उपक्रम आखला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा वाढवण्यासाठी. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्यासाठी, कलाम यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी. उपक्रमाचं नाव, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पलोड क्युब्स २०२१. या उपक्रमात नाशिकचे १० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातून उपक्रमाचं नेतृत्व दीपक पगार आणि बाळासाहेब सोनवणे करत आहेत
यात देशातले एक हजार विद्यार्थी १०० लघू उपग्रह अंतराळात सोडणार आहेत. यात राज्यातले ३५४ विद्यार्थी जवळपास ३० लघू उपग्रह तयार करत आहेत. ते तयार झाल्यावर रामेश्वरमला नेण्यात येणार आहेत. सात फेब्रुवारीला एकाच वेळी हे सर्व लघू उपग्रह हेलिअम बलूनद्वारे रामेश्वरम इथून प्रक्षेपित होतील. त्यांचं वजन साधारणतः २५ ते ८० ग्रॅम . ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर ते स्थिर करण्यात येतील.
यासाठी मुलांना मराठीतून दोन दिवसांचं ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलं. उपग्रह तयार करण्यापासून अंतराळातील प्रक्षेपणाबाबत मुलांना सर्व माहिती मराठीतून देण्यात येत आहे. उद्याही १०० मुलांसाठी पुण्यात कार्यशाळा आहे.
उपक्रमाची नोंद जागतिक विक्रमात होणार आहे.

– प्राची उन्मेष, नाशिक

Leave a Reply