डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. यापैकीच एक स्मशानभूमीतले कर्मचारी. कामाचा व्याप आणि स्मशानातलं वातावरण यामुळे खाण्यापिण्याचं भान नाही. वडापाव, सामोसे खाऊन ते दिवस काढतात. अमोल जगले यांच्या हे लक्षात आलं.
अमोल पंचवटी ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रमुख. नाशिकमधल्या पंचवटी इथली ही संस्था. ग्रुपच्या २५ जणांनी या कर्मचाऱ्यांना दोन वेळचं ताजे, सकस जेवण मोफत द्यायला सुरुवात केली.
याच वेळी पंचवटी म्हसरूळ इथल्या ‘निर्मल गंगा अग्रो टुरिझम’च्या प्रणिता गायकवाड, आशुतोष गायकवाड यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. ‘निर्मल गंगा’देखील मोठ्या प्रमाणात निशुल्क अन्नदान करते. दोन्ही संस्थांनी मिळून काम करायचं ठरवलं. गरीबरथ ढोल पथकाचे कार्यकर्तेदेखील सोबत आले. त्यामुळे पंचवटी अमरधाम स्मशानभूमी, जुने नाशिक अमरधाम, दसक पंचक स्मशानभूमी, नांदूर स्मशानभूमी, अंबड अमरधाम या ठिकाणी दोन वेळेस जेवणाचे डबे पुरवण्याचं काम सध्या जोमानं सुरू आहे. नांदूर, आडगाव, पंचवटी, जेलरोड, दसक पंचक, इंदिरा नगर, रामवाडी या परिसरातील कोरोनाबाधित कुटुंबानाही दररोज डबे. जिल्हा रुग्णालय, बिटको रुग्णालय इथं ३०० डबे. आडगाव, म्हसरूळ आणि इंदिरानगर पोलीस चेकनाके इथल्या पोलिसांनाही सकस जेवण मिळतंय.
डब्यात वरणभात, भाजी, पोळी, खिचडी, कोशिंबीर, मांसाहारी पदार्थ. व्यवस्थित पॅकिंगमुळे पदार्थ सांडत नाहीत. मोरया ग्रुपचे सदस्य सकाळी ९ ते ११ या वेळेत ‘निर्मल गंगा’ च्या केंद्रावर पॅकिंग करतात. त्यानंतर दुचाकी किंवा रिक्षेनं डबे पोहोचवतात. यासाठी इंधन स्वखर्चातून. दुपारी उशिरापर्यंत काम चालतं. थोड्या विश्रांतीनंतर दुपारी ४ पासून रात्री उशिरापर्यंत काम.
गरजूंसाठी खारीचा वाट उचलण्याची संधी मिळत असल्याचं समाधान मोरया ग्रुपचे अमोल जगळे, महेश पाटील, ईश्वर कदम, स्वप्नील दिघोळे, ओमकार इंगळे , प्रशांत भोये, सिद्धांत गरुड यांनी व्यक्त केलं .
-भाग्यश्री मुळे, नाशिक