निसर्गाला हवी परतफेड : त्यासाठी माती, पाणी आणि पिकांत केले प्रयोग

परभणी तालुक्यातलं झरी गाव. इथं राहणाऱ्या कांतराव देशमुख यांनी स्वतःच्या शेतीत प्रयोग केलेच. पण गावालाही सोबत घेत त्यांनी परिसरात जलसंधारणाची कामं केली. त्यामुळे हा परिसर पाण्याच्या बाबतीत स्वयंपपूर्ण बनला आहे.  कांतरावांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली ७८ साली. त्यांच्याकडे एकूण ५५ एकर शेती. सुरुवातीला ते पारंपारिक पिकंच घेत. गहू, ज्वारी, तूर, मुग, सोयाबीन ही पिकं घेतली. कितीही कष्ट केले तरी उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे ही शेती परवडणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. मुख्य पिकांमध्ये आंतरपिकं घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे उत्पादनात वाढलं, तरी उत्पन्न वाढत नव्हतं. मग जरा वेगळ्या वाटेवर चालायचं ठरवलं. जे विकतंय त्याचंच उत्पादन घ्यायचं त्यांनी ठरवलं. मग विविध ठिकाणच्या यशस्वी शेतकर्‍यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. बाजारपेठांची माहिती करून घेतली. आणि मोसंबीची लागवड केली. सुरूवातीला पावणेचार एकरावर लावलेली मोसंबी पुढे ५० एकरापर्यंत वाढवत गेले. 

आता जवळपास ४० वर्ष ते मोसंबीचं उत्पादन घेत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळातही ठिबक सिंचनद्वारे झाडांना पाणी देवून त्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला. मात्र पुन्हा दुष्काळाचा फटका बसला. नाईलाजाने मोसंबी बाग मोडून ते पेरू लागवडीकडे वळले आहेत. सध्या १४ एकरावर पेरू बाग असून गावात एक प्रोसेसींग युनिटही त्यांनी सुरू केले आहे. त्यांची फळं औरंगाबाद, नाशिकच्या बाजारात थेट विकली जातात. ज्यावेळी मोसंबीचं उत्पादन घेतलं जायचं तेव्हा कांतराव यांनी दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलोर, नागपूर, पुणे इथल्या व्यापार्‍यांना थेट माल पाठविण्याची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे विहीर आणि बोअरच्या पाण्यावर त्यांनी या फळबागा वाढविल्या आहेत.  भारतात फळं खाणार्‍यांचं प्रमाण जास्त असल्याने चांगल्या फळांना मोठी मागणी असते. देशमुख म्हणतात, ‘निसर्गाशी जुळवून घेत मी शेती करत आलोय. मोसंबीचे मृग, आंबिया, हस्त असे तीन बहार असतात. पाणी नसताना मी मृग बहार घेतला. कारण यात एप्रिल-मे महिन्यांत बागांचं पाणी तोडावे लागते. पाणी नसलं की ताण द्यायचो. आंबिया बहार घेतला असता तर संपूर्ण उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावं लागलं असतं आणि पाण्याची अधिक गरज भासली असती. मी देशभरात अनेक ठिकाणी जाऊन शेतीतील वैविध्यपूर्ण प्रयोग पाहून आलोय. त्यांनी इस्त्रायल देशाचा दौराही केलेला आहे.
 कांतराव म्हणतात, ‘मी शेतावर काम करणारा माणूस आहे. शेतच मालकाला काम सांगत असते. शेतात सहज चक्कर मारली तर अनेक कामं आपल्या लक्षात येतात’.
आपण निसर्गाकडून खूप काही घेतो. पण परतफेड करत नाही, ही बाब कांतरावांना अस्वस्थ करते. ते सांगतात, आज आपण जे पाणी वापरतोय ते पूर्वजांनी साठवून ठेवलेलं होते. आपण त्याचा केवळ उपसा करत असून भविष्यासाठी पाणी साठवण्याची व्यवस्थाच नाही. कांतराव देशमुख यांनी 1989 मध्ये जलसंधारणाचं काम हाती घेतलं. विहीर पुनर्भरण केले.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. ४० वर्षापासून ते शेतात हिरवळीचं खत घालतात. ते सांगतात, ‘आजकाल दर तीन महिन्याला पिकावर पिकं घेतली जातात. दुकानदाराच्या सांगण्यानुसार भरमसाठ खतं आणून घातली जातात. त्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडतं. मी सेंद्रीय पध्दतीची खतं वापरण्यावर अधिक भर देतो. शिवाय आम्ही शेणखतही मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यामुळेच आमची जमीन अधिक भुसभुशीत आणि सुपीक बनली आहे’. अनेक संशोधक व शास्त्रज्ञांनी त्यांच्या जमिनीची, गांडूळाची पाहणी केल्याचंही ते सांगतात.

– बाळासाहेब काळे.