घराबाहेर सुरू असलेली फटाक्याची आतीशबाजीने सर्वांच्या कानठळ्या बसल्या असतांना तीन वर्षाची चिमुकली अपूर्वा शांततेने फटाक्यांच्या उजेडाकडे पाहत होती. चेहऱ्यावर कुठलेच भाव नाहीत. हे बघून तिचे आईवडील भाग्यश्री आणि महेंद्र पाटील धास्तावले. त्यांनी लगेचच तिची बालरोग तज्ञांकडून तपासणी करून घेतली. अपूर्वा कर्णबधीर असल्याचं निदान झालं. आधी जन्मतः हृदयाला छिद्र, एकच किडनी हे कळलं होतंच. त्यात ही भर पडली. तरीही, भाग्यश्री आणि महेंद्र यांनी तिला सर्वसामान्य बालकांप्रमाणे वाढविण्याचा निर्णय घेतला.
नाशिक येथील सातपूर कॉलनी परिसरात महेंद्र आणि भाग्यश्री यांचं घर आहे. अपूर्वा त्यांचं पहिलंच अपत्य. तिला जन्मतः असलेल्या व्यंगामुळे तिच्याकडे अन्य नातेवाईकांनी पाठ फिरवली. तिच्या कर्णबधीर व्यंगावर मात करण्यासाठी तातडीने कॉक्किलअर ही शस्त्रक्रिया करावी लागली. शालेय प्रवासासाठीही वारंवार झगडावं लागलं. या दरम्यान एकदा वर्तमानपत्राच्या कागदावर पिस्तुल घेतलेल्या खेळाडूचे चित्र अपूर्वाने पाहिलं. हे चित्र, खेळ कुठला असं तिनं विचारलं. वडिलांनी तिला या खेळाविषयी समजावून सांगितलं. आणि तिला सातपुर येथील भीष्मराज बाम यांच्या शूटींग रेंजवर नेलं. बाम यांनी तिला आंतरराष्टीय प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांच्याकडे पाठवलं. मोनाली यांच्याकडे पहिल्यांदाच कुणी कर्णबधीर नेमबाजी शिकण्यासाठी आलं होतं. सहकारी प्रशिक्षक श्रध्दा नालमवार यांच्या मदतीने त्यांनी हे आवाहन स्वीकारलं. तिला प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. अपूर्वाची आई भाग्यश्री यांनीही नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेत अपूर्वाकडून सराव करून घेतला. अपूर्वाने व्यंगावर मात करायची या जिद्दीने यशाला गवसणी घालण्यास सुरूवात केली. सर्व स्तरांवरील स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला. दोनदा राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली. यावर्षी जानेवारीत स्वीझरलँडमध्ये होणाऱ्या पॅरालम्पिक स्पर्धेत ती सहभागी होणार होती. मात्र करोनामुळे ही स्पर्धा स्थगित झाली. आता ही स्पर्धा 2022 साली होणार असून त्यामध्ये अपूर्वा सहभागी होईल. त्यासाठी तिने सराव सुरू ठेवला आहे.
अपूर्वा सध्या दहावीत असून भोसला सैनिकी शाळेत शिकत आहे. स्पर्धेचा सराव आणि नियमीत अभ्यास सुरू आहे. स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवण्याचा तिचा प्रयत्न आहे.
– प्राची उन्मेष, नाशिक