नोकरी थांबली; ‘ईश्वर’ धावला करोनग्रस्तांच्या मदतीला

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसर. इथल्या एका ऑइलपेंटच्या दुकानात ईश्वर कदम गेल्या १५ वर्षांपासून काम करत होता. कोविड साथ सुरू झाली, लॉकडाऊन लागलं आणि ईश्वरचं काम अनिश्चित काळासाठी थांबलं. अशावेळी कुणालाही आता पोटापाण्याचं काय, घर कसं चालवायचं असा प्रश्न पडला असता. सगळ्या चिंता सोडत ईश्वरने कोविड रुग्णांसाठी काम सुरू केलं. दोन्ही लॉकडाऊनमध्ये तो हे करत राहिला. त्यामुळेच ईश्वर वेगळा ठरतो.

ईश्वरने पोलिस मित्र म्हणून काम सुरू केलं. नांदूर नाका, १० व्वा मैल, औरंगाबाद नाका, अमृतधाम आदी परिसरात तो लोकांची तपासणी करणे, त्यांचे प्रबोधन करणे आदी कामे करत होता. कधी दिवसभर काम असे तर कधी रात्रभर. त्यानंतर लॉकडाऊन जरा शिथिल झाले. जीवन थोडंसं पूर्ववत झालं. मात्र काही महिन्यांनी पुन्हा दुसरं लॉकडाऊन जाहीर झालं. ईश्वर वडिलांची रिक्षा घेऊन करोनग्रस्तांना, त्यांच्या नातेवाईकांना, करोनायोद्ध्यांना स्वखर्चाने मोफत डबे पोहोचवण्याच्या मोहिमेवर स्वार झाला. मित्र अमोल जगले याच्या आवाहनानुसार त्याचा सर्व मित्र परिवार कामाला लागला होता. सकाळी निर्मल गंगा यांच्या भोजनस्थळी ईश्वर रिक्षा घेऊन हजर व्हायचा. वरण, भात, भाजी,पोळी याचं व्यवस्थित पॅकिंग केलं जायचं. हे सर्व झाल्यावर डबे, त्यांचे पत्ते असे सारे रिक्षात टाकून हा निघायचा. शहरातल्या निरनिराळ्या भागात करोनग्रस्तांच्या घरी, दवाखान्यात, स्मशानभूमीत, पोलिस चौक्यांमध्ये असे विविध ठिकाणी डबे दिले जात होते. हे सारे आटोपून दुपारी थोडी विश्रांती झाली की लगेच चार ते रात्री उशिरापर्यंत हेच रूटीन असायचं. फोन करून जेवण मागवलेले कुणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेत डबे पोचविण्याचे काम चालू होते. दररोज हजार ते पंधराशे डबे ईश्वर देत होता.


लॉकडाऊनमधलं दुसरं कठीण काम होतं ते लोकांना घरी, परगावी परतायचं होतं. गाड्या वगैरे सगळं बंद झालेलं. तेव्हा अशा अडकलेल्या कित्येकांना त्याने सायकली मिळवून दिल्या. काहींची जायची सोय ट्रकमधून करून दिली.

करोना काळात स्वार्थीपणे स्वतःचा विचार न करता ज्या समाजात राहतो त्याचे देणे फेडण्याचा निश्चय करून ईश्वर कार्यरत राहिला. आता त्याचं नेहमीचं काम सुरू झालं आहे पण आपण समाजाच्या उपयोगी पडलो हे समाधान कायम ऊर्जा देत असल्याचं तो सांगतो.

भाग्यश्री मुळे, नाशिक

Leave a Reply