नौशीनच्या भाच्याचं लसीकरण सुरू झालं
”आमच्या मालेगावात लसीकरणाबद्दल जागरूकता नाही. इथे अजून खूप काम होणं गरजेचं आहे. माझं स्वप्न आहे संपूर्ण मालेगावातील मुलं रोगमुक्त व्हावीत. त्यासाठी लग्नानंतरही मला काम करायचं आहे.” १९ वर्षांची नौशीन अखत्तर अतेक अहमद सांगते.
नौशीनचा भाचा,भावाचा मुलगा सतत आजारी असायचा. त्यांच्या कुटुंबात कोणीच कधीच बाळांना लस दिली नव्हती. इंजेक्शन दिलं की ताप येतो,पाय सुजतो याची भीती.
एक दिवस तिच्या घरासमोरच्या शमीम आपाकडे एक बैठक होती. त्यात बाळांची काळजी कशी घ्यायची, लसीकरणाचं महत्त्व याबाबत माहिती दिली जाणार होती. आई आणि भाभी दोघी घरात नसल्यामुळे त्या बैठकीला नौशीन गेली. आपला भाचा आजारी का पडतोय, वेगवेगळे आजार, त्यापासून संरक्षण करणाऱ्या प्रतिबंधात्मक लसी, याविषयी सगळी माहिती तिला मिळाली. तिने येऊन ती घरी सांगितली. मात्र कोणालाच काही पटलं नाही. पहिलंच बाळ असल्यानं भावाला तर लसीकरणाबाबत खूपच भीती वाटत होती. पुढच्या बैठकीला नौशीन आई आणि भाभीला सोबत घेऊन गेली. त्यांचेही गैरसमज दूर झाले. भाऊ मात्र विरोधातच होता. नौशीनने मग आपल्याच घरी बैठक ठेवली. आशा आणि आरोग्य कार्यकर्त्यांनी नौशीनच्या भावाच्या सगळ्या शंका दूर केल्या. लसीकरणामुळे बाळाचं संरक्षण होणार आहे हे त्याला पटलं. त्याची भीती दूर झाली. बाळाची काळजी कशी घ्यायची हे समजल्यानं नौशीनचा भाचा आता सुदृढ होत आहे.
नौशीन आणि तिच्या घरातले आता त्यांच्या परिसरात लसीकरणाचा प्रचार करतात. नौशीनने तिच्या अनेक मैत्रिणींना याबाबत माहिती दिली.
” आमच्या समाजात मुलींची लवकर लग्न होतात. मुलींना फारशी माहिती नसते. आपल्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची, याची आम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे. ” नौशीन सांगते.
नौशीनचंही नुकतंच लग्न झालं असून लग्नानंतरही हे काम करायची तिची इच्छा आहे.
‘चरखा’च्या सौजन्याने
– प्राची उन्मेष, मेघा बुरकुले नाशिक

Leave a Reply