‘न्यू नॉर्मल’मध्ये आता मिळवा प्रशिक्षित घरकामगार

“जानेवारी महिन्यात मी घरकाम करण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि माझी कामं पटापट व्हायला लागली. चार घरची काम करत होते. वेळ वाचू लागला, त्यामुळं मी आणखी तीन घरची काम करू लागले. पण मार्चपासून लॉकडाऊनमुळे सर्व काम बंद झाली, ती अजून सुरूच नाही झालीत. एक महिनाच ही जास्तीची कामं मिळाली.” ठाण्यातल्या टिकूजीनीवाडी जवळच्या कोकणीपाडा इथं राहणाऱ्या मालन म्होळे सांगतात. मालन यांनी कमीतकमी वेळेत स्वच्छ घरकाम करण्याचं सहा दिवसांचं प्रशिक्षण घेतलं. मालन यांच्याप्रमाणेच कल्याणच्या सुरेखा आणि पुण्याच्या अनिता यांनीही हे प्रशिक्षण घेतलं. पण ह्या दोघींनी हे प्रशिक्षण ऑनलाईन माध्यमातून घेतलं आहे.


‘घरकाम करणाऱ्यांना महिलांकरता (Domestic workers) ऑनलाईन प्रशिक्षण’ वाचून काहीतरी वेगळं वाटतंय ना! पण तुम्ही बरोबर वाचलंत. प्रथम इन्स्टिट्यूट हे प्रशिक्षण वर्ग घेत आहे. या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गांना घरकाम करणाऱ्या महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टेक्निकल आणि नॉनटेक्निकल असे या प्रशिक्षणाचे दोन भाग आहेत. टेक्निकल म्हणजे प्रत्यक्ष काम करण्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण, सुरक्षितता, व्यसनांपासून दूर राहणं. नॉनटेक्निकल वैयक्तिक स्वच्छता, नीट-नेटकं राहणं, संभाषण, नवीन काम कसं मिळवायचं. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सहभागी महिलांना शासनाच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDL) आणि प्रथम इन्स्टिट्यूट यांचं एकत्रित प्रमाणपत्र मिळतं.
समाजातला सर्वात महत्त्वाचा तरीही दुर्लक्षित घटक म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला. या महिला घरकाम करून चरितार्थाला हातभार लावतात. घरकाम करण्याकरता प्रशिक्षण कशाला हवं? असा सर्वांचाच समज असतो. आता शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडे घरातल्या कामांकरता मदतनीस हवाच असतो. मग या महत्त्वाच्या घटकाला व्यवस्थित प्रशिक्षण दिलं, तर काम करणारा आणि ज्यांना अशा मदतनीसांची गरज लागते या दोघांचाही फायदा होईल. या कामाला आणि काम करणाऱ्यांनाही सन्मान मिळेल. याच विचारानं प्रथम इन्स्टिट्यूटनं घरकाम करणाऱ्यांना महिलांना प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. या प्रशिक्षणांची सुरूवात सप्टेंबर 2019 मध्ये खारघर इथं झाली.


प्रथमच्या सुनिता बनसोडे यांच्यासोबत सात जणी फिल्डवर जाऊन प्रशिक्षण देणार असं ठरलं. या टीममध्ये एमएसडब्ल्यू, ग्रॅज्युएट, दहावी, बारावी आणि ड्राफ्टसमन असं शिक्षण झालेल्या सदस्या आहेत. सुनिता यांनी त्यांच्या माहेरी घरकामाकरता येणाऱ्या ताईंना या प्रशिक्षणाची माहिती सांगितली. या ताईंनी चाळीस जणींना गोळा केलं. प्रत्यक्ष प्रशिक्षणाकरता यातल्या 26 जणी आल्या. या भागात नवऱ्यासोबत बांधकाम मजूर म्हणून या महिला हळूहळू घरकामाकडं वळू लागल्या. राज्याच्या विविध भागातून या महिला इथं आल्या आहेत. पहिल्या प्रशिक्षणातच महिलांना चांगला हुरूप आला. अनेक नविन गोष्टी कळल्या. त्यांचा अनुभव ऐकून ताबडतोब दुसरंही प्रशिक्षण आयोजीत करण्यात आलं. हळूहळू चेंबूर, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, पार्ले या भागात ही प्रशिक्षण घेण्यात आली. मार्च 2020 पर्यंत 1 हजार 265 महिलांनी हे प्रशिक्षण घेतलं.
या प्रशिक्षणांना खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. पण लॉकडाऊनमुळे प्रशिक्षण बंद झाली. कित्येक घरकामगार महिला त्यांच्या गावी परतल्या. तरी त्यांना हे प्रशिक्षण हवं होतं. त्यांचे फोन येऊ लागले. मग ऑनलाईन प्रशिक्षण द्यायचं ठरलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद इथं आपापल्या गावी राहून साधारण दोनशे महिलांनी स्मार्टफोनवरून ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं आहे. यात दीड तासाचे आठ प्रशिक्षणवर्ग आहेत. चर्चा, पीपीटी आणि व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांमध्ये आपल्या कामाबद्दल नवं शिकण्याची उमेद आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षणांनाही त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपणही काहीतरी शिकू शकतो हाही विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर पाहता येतो.
या प्रशिक्षणात कोणत्या वस्तूची स्वच्छता कशी करायची, त्याकरता कोणतं सामान वापरायचं हे समजावून सांगतात. कमी वेळेत दर्जेदार काम कसं करायचं, यावर भर असतो. या प्रशिक्षणाच्या समन्वयक सुनिता बनसोडे याकरता एक उदाहरण देतात, सामान्यपणे फ्रीज साफ करताना त्यातलं सामान काढून साबण्याच्या आणि डेटॉलच्या पाण्यानं अक्षरशः फ्रिजला आंघोळ घालतात. पण याऐवजी व्हिनेगर आणि कोमट पाण्यानं फ्रिज, ओव्हन, मिक्सर पुसून काढल्यास ते स्वच्छ आणि चमकदारही होतात. घाण वास येत असेल तर तोही निघतो. कामही चटकन होतं. असंच पंखे साफ करताना, पंख्याचं पात उशीच्या जुन्या कव्हरमध्ये घालून पुसावं. म्हणजे त्याची धूळ इतर ठिकाणी उडणार नाही. त्यानंतर शाम्पू आणि थोडं तेल मिसळून पंख्याचं पात पुसून घ्यावं. परत कोरड्या कपड्यानं पुसल्यावर पंखा स्वच्छ आणि चकचकीतही होतो. अशा अनेक सोप्या आणि फायदेशीर युक्त्या प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात येतात. स्टीलची भांडी, काचेची भांडं, चहाचे कप कसे घासावेत. सिंकमध्ये सगळी भांडी एकत्र कोंबलेली असतात. जास्त भांडी असल्यावरही स्वच्छ, पण जास्त वेळ न घालवता काम कसं करता येतं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येतं. कपडे भिजत घालायचा क्रम असू द्या किंवा ते धुण्याचा, वॉशिंग मशिनमध्ये धुणं असू द्या किंवा वाळत घालणं, फर्निचर पुसणं असो की भिंतींची साफसफाई घरातल्या स्वच्छतेशी निगडीत सर्व बाबींचं प्रशिक्षण या कार्यक्रमाद्वारे देण्यात येत आहे. बऱ्याचदा घरातले मालक विशिष्ट वस्तू वापरण्याचा किंवा उंचावर चढून सफाईकरता आग्रह धरतात. अशा वेळी आपली सुरक्षितता पाहून ती वस्तू वापरता येते का ते पहावं. सुरक्षित वाटत नसल्यास मालकांना ते पटवून द्यावं.
प्रशिक्षणानंतर प्रथमची टिम या महिला आधीपासून काम करत असणाऱ्या घरांमध्ये आणि नव्यानं काम सुरू करणाऱ्या घरांमध्ये फोन करून कामाच्या दर्जाबाबत, बदलाबाबत चौकशी करतात. एक्सेल शीटमध्ये ही माहिती साठवली जाते. प्रशिक्षण, प्रमाणपत्र मिळाल्यावर आधीपासूनच्या घरात लगेच पगार वाढवणार का? तर तसं नाही. पण कामाचा दर्जा सुधारल्यावर आपसूकच त्या घरात आणखी काम मिळतं किंवा त्यांच्या ओळखीतून आणखी काही कामं मिळतात. शासकीय प्रमाणपत्र असल्यामुळं काम मिळायलाही सोपं होतं. या प्रशिक्षणामुळं घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. त्या आपल्या कामाकडे सकारात्मकतेनं पाहू लागल्या आहेत.
ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रशिक्षणांमध्ये महिलांना रोज मेडिटेशनही करायला लावतात. त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव, त्यांच्या आवडीनिवडी विचारून त्यांना बोलतं करण्यात येतं. नेहमी दुसऱ्यांकरता झटणाऱ्या या महिलांचा हळुवार कप्पा यामुळं उलगडतो.
सध्या तरी या महिलांची कामं फारशी सुरू झाली नाहीत. कोरोनोसोबतचं जगणं किंवा हळूहळू सर्व सुरळीत होऊ लागल्यावर या महिलांनी कामाच्या ठिकाणी आणि घरीही काय काळजी घ्यावी याबद्दलही आता प्रशिक्षण देण्यात येत आहे.. यासोबतच वृद्धांची काळजी, एअर कंडिशनरचं सर्व्हिसिंग आणि ब्युटीकेअरची बेसिक माहिती याबाबतही प्रशिक्षण द्यायला प्रथम सुरू करणार आहे. आताच्या ‘न्यू नॉर्मल’ काळात घरात कामगार येण्यावर लोकांचा सावध पवित्रा असणार आहे. कामांकरता 4-5 लोकांना बोलवण्याऐवजी एकाच व्यक्तीला ही कामं येत असतील तर सोयीचं ठरणार. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी मिळतील.
प्रशिक्षणासाठी सुनीता बनसोडे संपर्क क्र. – 9220858437 / 8424060208
– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply