ही कहाणी आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या ८१ वर्षांच्या आजीची. सरस्वती भीमराव सोनवणे असं या आजीचं नाव. सरस्वती यांना तीन मुलं. त्यांच्याकडे अडीच एकरांची शेती आहे. शेतातली ज्वारी त्यांनी विकतचं पाणी घेऊन जगवली आहे. रात्रंदिवस दिवस शेतात काबाडकष्ट करणार्या या आजीच्या शेतात ज्वारीचे पीक दमदार आले आहे.
शेतात पीकं बहरू लागली की, पक्ष्यांचा मोठा थवा डौलदार पिकांवर येऊन ताव मारताना दिसतो. हातातोंडाशी आलेली पिके पक्षी नासधूस करू नये, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात बुजगावणं उभारलेलं आपण नेहमी बघतो. पण सरस्वती आजींच्या शेतातली एक एकर ज्वारी चक्क पक्ष्यांसाठी राखीव आहे. याला कारण आहे आजीला पक्ष्यांविषयी असलेला जिव्हाळा.
अन्नपाण्याविना पक्ष्यांचे हाल होतात. या जीवांच्या सहवेदना आजीला जाणवल्या. त्यामुळेच उत्पादनाची पर्वा न करता तसंच नुकसान होईल याची काळजी न करता त्यांनी अडीच एकरातील एक एकर ज्वारीचे पीक हे पक्ष्यांसाठी राखीव ठेवलं. त्यामुळं पक्ष्यांची दाणा- पाण्याची चांगली व्यवस्था झाली आहे. आता दिवसभर असंख्य पक्षी रानात मनसोक्त कोवळ्या ज्वारीचा आनंद घेत आहेत. ज्वारीच्या शेतात इथं आता सर्व तऱ्हेच्या पक्ष्यांची मनसोक्त हुरडा पार्टी चालते.
सरस्वती आजीने आपल्या शेतात पक्ष्यांसाठी पाण्याची देखील सोय केली आहे. शेतात ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या पाणी भरून ठेवल्या आहेत. हजारो पक्षी या ज्वारीवर ताव मारून पाणी पिऊन भुर्रर्रर्र कन् उडून जाताना दिसत अाहेत.
पक्ष्यांना खाद्य मिळावे, यासाठी ज्वारीचे शेत राखून ठेवले. त्यामुळे त्यांच्या शेतात कायम कलकलाट असतो. दिवसभर पक्ष्यांचा होणारा किलबिलाट पाहून मन आनंददायी होऊन जाते. रानात बागडणारे पक्ष्यांचे हे चित्र पाहून आजीला मनस्वी आनंद होतो.
सरस्वती आजी सांगतात, माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी पक्ष्यांसाठी एक एकर शेती राखीव ठेवणार आहे. माझ्या मुलांना या संदर्भात कल्पना दिली आहे. त्यांनादेखील पक्ष्यांची आवड आहे. कुठल्याही पक्ष्याचा जीव अन्नपाण्यावाचून जाऊ नये, हाच शेती राखीव ठेवण्या पाठीमागचा हेतू आहे.
चिमणी, कावळा, दयाळ, साळुंखी, पारवा, कबूतर, हुदहूद, तांबट, शिंपी, सुर्यपक्षी, राखी वटवट्या, सातभाई, वेडा राघू, सुरंगी, तितर, घुबड, कोकीळ, सुगरण, मुनिया अशा विविध जातीच्या पक्ष्यांची आजींच्या शेतात रोज हजेरी असते.
– अमोल वाघमारे, इंदापूर, पुणे