सोबतच्या छायाचित्रात दिसत आहेत, त्या आहेत बीड जिल्हा रुग्णालयातील परिसेविका विरुमती साने व शेजारी त्यांचे पती पोलीस राजकुमार प्रकाश. ते जिल्हा नियंत्रण कक्षात काम करतात.
लॉकडाऊनच्या काळात आपत्कालीन सेवा वगळता सारेजण घरात बसून काम करतात. मात्र, विरुमती व राजकुमार हे दांपत्य नेहमीप्रमाणेचं आपल्या कर्तव्यावर हजर आहे. आई, बाबा दोघेही कोरोनाच्या काळात बाहेर असल्याने त्यांच्या मुलांना काळजी वाटते. पण, ‘आपल्याला अडचणीच्या काळात जनतेची सेवा करण्याची संधी मिळतेय. हे मोठे काम आहे, ते केलेच पाहिजे’, अशा शब्दांत राजकुमार त्यांची समजूत काढतात.
दररोज सकाळी ८ वाजता विरुमती यांना रुग्णालयात सोडून राजकुमार स्वतःच्या ड्युटीला जातात. विरुमती या सध्या क्वारंटाईन कक्षात कार्यरत आहेत. इथे दररोज संशयित असणारे रुग्ण दाखल होतात. मग या रुग्णांना बेड टाकून देण्यापासून डॉक्टर्सने सांगितलेल्या औषध, गोळ्या, इंजेक्शन्स देणे, रुग्णांना नाष्टा, दोनवेळा जेवण आदी बाबींकडे त्या सहकाऱ्यांसह लक्ष ठेवून असतात. क्वारंटाईनमध्ये रुग्ण एकटाच असल्याने त्याची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. काही रुग्ण धास्तावलेले असतात. त्यांचे समुपदेशन करत मानसिक आधार देण्याचेही काम पर्यायाने करावे लागते. सर्वात महत्वाचे म्हणजे संसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वता:चीही काळजी घ्यावी लागते. दुपारी साडेतीन वाजता ड्युटी संपते. निघताना त्या घरी मुलांना कळवतात. आई येईपर्यंत मुलं पाणी तापवून ठेवतात. मग कुठल्याही वस्तूला, कुणालाही स्पर्श न करता थेट बाथरूममध्ये जाऊन स्नान करणे, कपडे धुणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे या सर्व गोष्टी केल्यावरचं विरुमती घरात जातात. पोलीस असल्याने पती राजकुमार प्रकाश यांचाही असाचं दिनक्रम असतो.
‘कोरोनाचं संकट संपूर्ण देशापुढे ‘आ’ वासून आहे. संसर्गजन्य आजार असतानाही आम्हाला रुग्ण सेवा देण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. रोज सकाळी नोकरीसाठी घरुन निघताना लेकरं, कुटुंबाची काळजी वाटते. पण आपत्कालीन स्थितीत लोकांच्या कामाला आले नाही तर उपयोग काय.’, अशी भावना व्यक्त करत विरुमती व राजकुमार हे दांपत्य कर्तव्य बजावत आहे.
आज जागतिक आरोग्य दिन. विरुमती यांच्याप्रमाणेच रुग्णसेवा करणाऱ्या साऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम.
– अनंत वैद्य, बीड