परंपरा समृद्ध, पण…
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेली, सापन आणि बिच्छन या दोन नद्यांनी वेढलेली, उत्कृष्ट निसर्ग सौंदर्य ल्यालेली भूमी हे अचलपूर – परतवाडा ही दोन जुळ्या शहराचं वैशिष्ट्य. अमरावती जिल्ह्यातील ‘अ’वर्गीय नगरपालिका असलेलं हे शहर अनेक अर्थाने सातत्याने चर्चेत असतं.
फार प्राचीन काळी ‘ईल’ नावाच्या एका हिंदू राजाची ही राजधानी होती. त्यामुळे अचलपूरचं पूर्वीचं नाव होतं, इलीचपूर. नंतर एलीचपूर, अळजपूर आणि आज अचलपूर या नावाने हे गाव ओळखलं जातं. अनेक साधुसंतांची ही कर्मभूमी. अनेक अर्थांनी समृद्ध असलेलं हे गाव मागील दोन दशकांपासून चर्चेत आहे, ते मात्र दंगलीमुळे. काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक दुल्हा गेटवरील ध्वज काढल्याने येथे दोन गटात गोटमार झाली. राम नवमी, हनुमान जयंती व भीम जयंती उत्साह शांततेत पार पडल्यानंतर गाव झोपेतच असतानाच घडलेली ही दंगल घडली. पहाटे संचारबंदीची माहिती सांगणारे वाहन फिरल्यानंतरच गावातल्या अनेकांना हे कळलं.
तशी अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांना संचारबंदीची विशेष भीती किंवा वेगळं काही वाटत नाही. कारण आता गावातल्या लोकांना त्याची सवयच झाली असावी. 2007 मध्ये नवरात्र उत्सवात अशाच प्रकारे मिरवणुकींवर अचानक गोटमार झाल्याने गावात दंगल पेटली होती. नव्याने उभे राहिलेले अनेकांचे व्यवसाय, स्वप्न व आयुष्यावर त्यातून कायमचाच परिणाम झाला. त्यानंतर बटाऊवाले हत्याकांड, शामा पहेलवाल प्रकरण, कोरोना संचारबंद, अमरावती दंगल पडसाद संचारबंदी व आता झेंडा काढण्याचा वादावरुन निर्माण झालेला तणाव यातून मात्र सर्वसामान्यांचे जगणं मुश्कील केलं.
महाकवी भारवी या संस्कृत पंडिताची ही कर्मभूमी आणि उत्तर रामचरीत नाटकाचा कर्ता भवभूतीची संचार व प्रचार भूमी. संत कल्याण स्वामींचे (संत रामदास स्वामींचे शिष्य) शिष्य पू. भोलाराम महाराजांनी स्थापित केलेली शेणापासून घडविलेली मारुतीची मूर्ती आजही इथल्या श्रीराम मठात (माळवेशपुरा) विराजमान आहे. अशीच कार्तिक स्वामींची नखशिखांत पाषाण मूर्ती तसेच अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिरे इथं आहेत. अर्थातच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं आमचं अचलपूर.
परतवाडा जरी अचलपूरचा भाग असला तरी तेथील संस्कृती आणि मूळ जुन्या अचलपूर शहराची संस्कृती भिन्न आहेत. अचलपूर म्हणजे जुनी वस्ती- ज्यात एकूण 52 मोहल्ले (पुरे) अजूनही आहेत. येथील कष्टकरी समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे हातमाग आणि शेती. गरीब पण अत्यंत धार्मिक वृत्तीचा हा समाज आहे. ७५ -८० वर्षांपूर्वी वसलेले मिलिटरी कॅम्प आणि न्यायालय इत्यादी कार्यालये इथं आहेत. त्यामुळे वकिलांची वस्ती, सर्वच सरकारी कार्यालये तसंच बँका इत्यादी मुळे वस्ती वाढत गेली. त्यामुळे परतवाडा हे जुळे शहर असूनही त्याची संस्कृती जराशी आधुनिक वाटणारी आणि नवीन पिढीला आकृष्ट करणारी ठरली. पण अचलपूर शहराची संस्कृतीच न्यारी!
सध्या मात्र अविचारांची वाढलेली देवाण घेवाण, खुटलेला विकास, निराशाजक औद्योगिक स्थिती, स्पर्धा परिक्षांच्या नावावर वाचनालयातील खुर्च्यांना खिळून बसलेली तरुणाई, वाढती बेरोजगारी व राजकारणात विरोधकाच संपल्याने जुळे शहर अनेक अर्थाने अस्थिर होत आहे. किंबहूना ते अस्थिरच रहावे अशी इच्छा असणाऱ्या मानसिकतेला शोधून मानसिकता त्यात बदल करण्यासाठी काम करणाऱ्या तरुणाईची आज शहराला गरज आहे.
याविषयी स्थानिक पत्रकार जितेंद्र रोडे सांगतात की, अचलपूर-परतवाडा जुळे शहर अस्थिर करण्याऱ्या दोन गोष्टी आतापर्यंत समोर आल्या आहेत. एक म्हणजे अवैध धंदे आणि दुसरे धार्मिक उन्माद आहे. जुळ्या शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना राजकीय वरदहस्त असल्याचं दिसून येते. या सोबतच व्हिजन नसलेले राजकारण सुध्दा तेवढेच जबाबदार आहे. उद्योग धंद्यांसाठी लागणारा कच्चा माल, मुबलक पाणी, जमीन व मजूर इथं उपलब्ध आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यामुळे अशिक्षित व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे.
अचलपूर नगरीला समृद्ध इतिहास लाभला असूनही गेल्या दोन दशकांत दशके ही जुळी शहरं धार्मिक द्वेष आणि पेटत्या दंगलींनी दूषित झाली आहेत. त्यातून तरुणांच्या आयुष्यात अंधःकार आणि गावाचं भविष्य धोक्यात आणणारं इथलं चित्र आहे. हे पाहून आम्हा गावकऱ्यांचं मन सतत अस्वस्थ आहे.
– जयंत सोनोने

Leave a Reply