पर्यावरणस्नेही पेन्सिल

शिसपेन्सिल तर आपण सर्वच वापरतो. ह्या पेन्सिल्स लाकडापासून बनवतात, हे तर माहित आहेच. पण तुम्हांला माहितीय का इको-फ्रेण्डली पेन्सिलही मिळतात. या पेन्सिल्स बनवण्याकरता लाकडाचा वापर करत नाहीत. या पेन्सिल्स बनवतात वृत्तपत्रापासून. आश्चर्य वाटलं ना! वाशिममधले ललित राठी ह्या पेपर पेन्सिल्सचं उत्पादन घेतात. बी.कॉम झाल्यावर एम.सी.डब्ल्यूचं शिक्षण सुरू असताना ललित वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनांना नियमित भेटी द्यायचे. २०१३ मध्ये गुजराथ आणि दिल्ली एक्स्पोमध्ये इको-फ्रेण्डली उत्पादनांनी त्यांचं लक्ष वेधलं. यात त्यांना रस निर्माण झाला. या विषयाशी संबंधित माहिती, लेख गोळा करायला त्यांनी सुरू केलं. कागदापासून काही करता येईल का? सोबत पोटापाण्याचा उद्योगही हवा, यावर ते विचार करू लागले. जे कधीही संपणार नाही असा काहीतरी उद्योग करायचा. प्रदर्शनांमध्ये पेपर पेन्सिलनं त्यांचं लक्ष वेधलं होतं. 2-3 वर्ष याबाबत ते रिसर्च करत होते. फायदे, नुकसान, निर्मिती, मार्केटिंग, विक्री या सगळ्याची माहिती घेणं सुरू होतं. 2014 ला निर्मितीमध्ये न उतरता या पेन्सिल्सचं मार्केटिंग आणि विक्री करण्याचं ललित यांनी ठरवलं. बंगलोरमधल्या उत्पादकांना ललित त्यांच्या डिझाईन्स देऊ लागले. त्याप्रमाणं बनवून आलेल्या पेन्सिल्स ते विकू लागले.


लाकडाची पेन्सिल बनवताना दोन लाकडाच्यामध्ये शीसं ठेवून मग हे लाकडाचे तुकडे गमनं चिकटवण्यात येतात. पेपर पेन्सिलमध्ये शिशाला कागद गुंडाळण्यात येतो. मग ही पेन्सिल वाळवण्यात येते. लाकडाच्या पेन्सिलमध्ये हवेची रंध्र राहतात. पण पेपरपेन्सिलमध्ये ही रंध्र नसतात. मार्केटिंग नीट न जमल्यामुळं 3-4 उत्पादकांनी त्यांचा उद्योग आवरायचा निर्णय घेतला. 2015 मध्ये यातल्या एका उत्पादकासोबत ललित यांनी करार केला. त्यांचं मशिन आणि ललित यांचं मार्केटिंग. ललित यांनी एजंटच्या मधल्या साखळीला गाळत मोठ्या शहरांमधल्या मोठ्या शाळांसोबत थेट संपर्क केला. पेपर पेन्सिल, त्यांचं पर्यावरणपूरक असणं या मुद्द्यावर शाळा प्रभावित झाल्या. अशाप्रकारे ललित त्यांचं मार्केट बांधत गेले. थोड्याच दिवसांत ललित यांनी वाशिम इथं स्वतःचं युनिट सुरू केलं. नैसर्गिक रंगाच्या EN 71 या युरोपियन प्रमाणित पद्धतीनुसार त्यांनी या पेपर पेन्सिलना रंग दिले. या पद्धतीत रंगात शिसाचं प्रमाण कमी असतं. मुलांना आवडतील असे रंग आणि चित्राचं डिझाईन या पेपर पेन्सिल्सवर ते छापू लागले. या पेन्सिलना चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता रंगही पूर्णपणे पर्यावरणस्नेही वापरुयात अशी कल्पना ललित यांना आली. मग त्यांचा फुलं आणि फळांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक रंगावर अभ्यास सुरू झाला. खाद्योगात वापरल्या जाणाऱ्या रंगांचाही पर्याय त्यांनी वापरला. या सर्व प्रयोगांनाही यश आलं. देशातल्या दिडशे शाळा ललित यांच्याकडून पेपर पेन्सिल्स घेत आहेत. यात ५० इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. ह्या शाळांच्या कस्टमाईज्ड ऑर्डर्स असतात.

ललित यांचे या पेपर पेन्सिलसोबतचे प्रयोग सुरूच असतात. पेन्सिलच्या मागं खोडरबर असतं तिथं ललित यांनी फुलझाडं, तुळस अशा रोपांच्या बिया बसवल्या. ह्या सीड पेन्सिल सगळ्यांच्या पसंतीस उतरल्या. पेन्सिल संपत आली की ती सरळ मातीत रोवायची. तिला पाणी घालायचं. सगळं जमून आलं की धुमारा फुटतोच. ललित यांनी त्यांच्या एका ग्राहकाकरता पेपर पेनचाही प्रयोग केला आहे. या पेनलाही सीड पेन बनवलं. सेमी ऑटोमेटीक मशीन आणि दोन कामगारांच्या साहाय्यनं ललित ग्रीन्सचं काम चालतं. काम जास्त असलं की ते कामगारही वाढवतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता यावं म्हणून ते नेहमीच्या १० च्या पॅकिंगऐवजी ५ च्या पॅकमध्येही पेन्सिल देतात. म्हणजे मुलांना, पालकांना पेन्सिलचा अंदाज घ्यायला बरं पडतं.
आपण रोज सकाळी वाचणाऱ्या वृत्तपत्राचा असाही वापर चांगला आहे ना…

– साधना तिप्पनाकजे

Leave a Reply