मार्च महिन्याचा तिसरा आठवडा. धारावीतला पहिला कोरोनाचा रुग्ण डॉ. बालिगानगर या आठ इमारती असलेल्या वसाहतीत आढळला. त्याला दिल्ली प्रवासाचा इतिहास होता. तो ज्या कुटुंबासोबत राहिला होता, त्या कुटुंबाला कोरोनाची लागण झालेली होती. मुंबईत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत होती, तशीच धारावीतही रुग्णसंख्या वाढायला लागली होती. रोज पन्नासेक रुग्ण वाढू लागले. मुंबई मनपाने तातडीने त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर सुरू केलं. धारावीजवळच्या मनपाच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात जागा अपुऱ्या पडू लागल्या. १७ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झालं. धारावीतही लोकांची हालचाल रोखण्यात आली. पण रुग्णवाढीचा वेग कमी होत नव्हता. २२ मार्चला शेवटी देशभर लॉकडाऊन सुरू झालं. अत्यंत दाटीवाटी असलेल्या धारावीत शारीरिक अंतर पाळणं कसं शक्य होणार?
धारावीत दहा बाय दहाच्या एकेका घरात दहा-वीस मजूर राहतात. हे मजूर शिफ्ट ड्युटी करत असल्यामुळे दहा लोक रात्रपाळी करून दिवसा घरात झोपत आणि उरलेले दहा लोक दिवसपाळी करून रात्री त्याच घरात झोपत असत. कोरोना काळात शिफ्ट बंद झाल्यामुळे सर्वच लोक त्या एकाच घरात रहाणं शक्य नव्हते. म्हणून लोक बाहेर पडत. मनपाकडून खिचडी वाटप होत असे तेव्हा लोकांची गर्दी होत असे. शारिरीक अंतराचा फज्जा उडाला होता. लोक बाहेर आले की, पोलीस लाठीहल्ला करीत होते. कोणतेही नियम पाळणं शक्यच नाही अशी स्थिती झाली होती. रोज रुग्णांचा आकडा वाढत होता.
एक दिवस, मनपा आणि राज्यशासन यांच्याबरोबर आमच्या स्थानिक डॉक्टरांच्या संघटनेच्या (माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन) पदाधिकाऱ्यांनी मनपा सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. या आणीबाणीच्या स्थितीत खाजगी डॉक्टर्स काय मदत करू शकतात, ते आम्ही सहाय्यक आयुक्तांना विचारलं. त्यानंतर आम्ही आमच्या सत्तावीस तरुण डॉक्टरांचा गट तयार केला. एक किंवा दोन डॉक्टरांसोबत मनपाचे कर्मचारी आणि आशा वर्कर यांना घेऊन आमच्या डॉक्टरांनी धारावीतला एकेक विभाग पिंजून काढायला सुरुवात केली. सर्व डॉक्टरांना मनपाकडून PPE किट्स रोज दिले जात होते. ट्रॅव्हल हिस्टरी, ताप, खोकला, निमोनिया सदृश लक्षणं दिसली की त्यांना स्वॅब तपासणीसाठी पाठवायचं. इतरांना रोगाविषयी माहिती देऊन धीर द्यायचा, अशी कामं आमचा गट करत होता. दहा-बारा दिवसात चाळीस ते बेचाळीस हजार लोकांची तपासणी झाली. पुढील काळात साडेतीन लाख लोकांचं स्कॅनिंग करण्यात आलं. आठ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकंची तपासणी केली गेली. लोकांमध्ये विश्वास वाढला. मनपाने तातडीने क़्वारंटाइन सेंटर्स वाढवली. १४ हजारांचं संस्थात्मक क्वारंटाइन केलं गेलं. धारावीत ५२ बेड्सचं साई हॉस्पिटल ताब्यात घेऊन फक्त कोवीडचे उपचार सुरू झाले. या सगळ्या तपासणीमुळे आमच्या गटातले पाच डॉक्टर्स कोवीड पॉजिटीव्ह निघाले. मात्र, डॉ वाघमारे यांच्या उपचारामुळे धारावीतल्या त्याच साई हॉस्पिटलमधून हे डॉक्टर्स पूर्ण बरे होऊन पुन्हा स्वतःचे दवाखाने चालवू लागले. ज्यांनी कोरोनासंसर्ग नियंत्रणात मनपाबरोबर भाग घेतला होता त्या डॉक्टर्सना अजूनही मनपा PPE किट देत आहे.
पोलिसांवर ताण वाढत होता. शहरातली वाहतूक थांबलेली. खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचारी धारावीत येऊ शकत नव्हते. त्यामुळे सर्व दवाखाने बंद होते. वयस्कर डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवले. धारावीतील तीनशे डॉक्टरांपैकी जेमतेम चार-पाच डॉक्टर्स दवाखाने उघडे ठेवत होते, त्यांपैकी मी एक होतो.
अशा या धारावीतली कोरोना महामारी कशी आटोक्यात आली?
पुढच्या भागात वाचूया: परिस्थिती सुधरू लागली