महाराष्ट्र विधिमंडळाने घडवला इतिहास!
स्त्रिया, मुलं हा समाजाचा मोठा हिस्सा असूनही त्यांच्या समस्यांची चर्चा धोरणकर्त्या सभागृहांत फारशी होत नाही असं आम्ही केलेला अभ्यास सांगतो. आणि अधिकाधिक चर्चा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा, प्रयत्नदेखील करतो. आठ मार्चच्या महिलादिनानिमित्त विधिमंडळात जे घडून यावं म्हणून आम्ही प्रयत्न केले, ते घडलं.
परवा, ५ मार्चला विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांचा शाश्वत विकास या विषयावर विशेष ठराव मांडण्यात आले. त्यावर स्त्री-पुरूष आमदारांनी आपापली मतं मांडली आणि सूचना केल्या. विधानपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिलं. विधानसभेत तब्बल सात तासांहून अधिक वेळ ही चर्चा चालली. महिला-बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चर्चेला उत्तर दिलं.
या सर्वांनी अभ्यासपूर्ण आणि गंभीरपणे मुद्दे मांडले. स्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवं, ते सुचवलं. त्यामुळे ही चर्चा प्रतिकात्मतेच्या पलीकडे गेली.
शाळा-कॉलेजात महिलाविषयक कायदे समजावून सांगणारा तास सुरू करावा, आईबहिणीवरून शिव्या देणार्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटिसारखा कायदा आणावा, ग्रामीण भागात प्रत्येक बसथांब्यापाशी, बाजाराच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह असावं, आशा अणि अंगणवाडी ताई यांच्या मानधनात वाढ करावी, पीटीच्या तासाला मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, पुरूषी मानसिकता बदलण्यासाठी शाळेपासूनच प्रयत्न करावेत अशा विविध सूचनांचा वर्षाव परवा महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात झाला. हे विषय पटलावर आल्याने यंदाचा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होत असल्याची भावना आहे.