पाचंगे कुटुंबाला आणि परिसरातल्या नागरिकांना पाणीटंचाई भासत नाही

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा. इथल्या आयआयटी कॉलेजजवळ प्रभाकर पाचंगे कुटुंबासह राहतात. त्यांना आणि परिसरातल्या नागरिकांना गेली चार वर्ष झाली पाणीटंचाई भासत नाही. मात्र त्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती.
माळरानावरची पाण्याची समस्या काही केल्या सुटत नव्हती. पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. प्रभाकर आणि पत्नी सोनाली दोघे मोलमजुरी करणारे. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी. आपल्या 40 बाय 30 क्षेत्रफळाच्या प्लॉटमध्ये स्वतःच विहीर खोदण्याचं त्यांनी ठरवलं.


चारशे रुपयांचं घण, छानी, घरातील पार, सायकलच्या चाकाची कप्पी बनवून नायलॉनच्या दोरीच्या साथीने प्रभाकर खोदलेले मुरुम वर पाठवत. ते बाजूला टाकून सोनाली टोपले परत आत सोडत. अशी 25 फूट खोल विहीर त्यांनी खणली. त्यासाठी दोन महिने लागले.
पावसाळ्यात तर विहीर काठोकाठ भरते. पाचंगे कुटुंबाने त्यावर परसबाग फुलवली आहे.
ना रोजगार हमीचे मजूर, ना कुठली शासकीय मदत, अनुदान. चातुर्य आणि मेहनत या बळावर या सर्वसामान्य कुटुंबाने पाणीटंचाईवर कुठलाही बाऊ न करता मात केली.

– गिरीश भगत, उस्मानाबाद

Leave a Reply