पाणी, मजूर,साधने नाहीत तरी धडपड डोंगर हिरवागार करण्याची

बीड तालुक्यातलं आहेरवडगाव. साधारण चार हजार लोकसंख्येचं हे गाव. इथं साडे नऊशे एकरात सरकारी डोंगर तर साडे बाराशे एकरवर खाजगी डोंगर.  ग्रामपंचायतीअंतर्गत तहसीलचं गायरान. पूर्वेकडच्या डोंगरावर २२ वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरणातून लावलेली झाडं देखभालीअभावी जळून गेली.  २० वर्षापूर्वी  गावात पाऊस  चांगला असल्यानं मुबलक पाणी होतं.  हरीण, कोल्हे, लांडगे, तडस, साळींदर, नीलगाई, ससे या प्राण्यांचा अधिवास होता. काळाच्या ओघात  झाडांचा इंधनासाठी  वापर होऊ लागला.   परिसरात पावसाचं  प्रमाण कमी झालं. दहा वर्षापासून तर पाणीटंचाईनं डोकं  वर काढल्यानं  खाजगी टँकरनं  पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
या परिस्थितीत इथले एक वृक्षमित्र जिद्दीनं काम करत आहेत.  त्यांचं नाव अभिमान खरसाडे.  १८००हून अधिक झाडं त्यांनी लावली आहेत.
खरसाडे यांनी गेली चार वर्ष अथक प्रयत्न करत  सरकारी खडकाळ डोंगरावर साडेतीन एकरात शिवराई वन प्रकल्प फुलवला आहे. खरसाडे यांनी  २०१७ मध्ये ‘सृष्टी संवर्धन व पर्यावरण वाचवा’ अभियान  सुरू केलं.   काटेवाडा आणि  आहेरवडगावच्या दोन जिल्हा परिषद शाळेत बिया  संकलन  स्पर्धा घेऊन  दीड क्विंटल बिया जमा  केल्या. मग  साडेसहाशे विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन  पावसाळ्यात आहेरवडगावातील पूर्वेकडच्या  गैबीबाबांच्या  डोंगरावर  बिया लावल्या. परंतु  त्या वर्षी कमी पावसामुळे काही रोपे करपली.  कोरोनाच्या काळात २०२० मध्ये घराबाहेर पडणं कठीण झालं तेव्हा बीड शहरातल्या आपल्या घराच्या छतावर मोह, फणस, करवंद, भोकर, बेल अशा ८०० दुर्मिळ वृक्षांची रोपवाटिका त्यांनी तयार केली. या काळात  बीडहून बलगुजार, खजाना विहिरमार्गे आठ किलोमीटर  पायी जाऊन त्यांनी रोपं लावली.
आहेरवडगाव पशुधनासाठी प्रसिद्ध. खरसाडे, उघड्या डोंगरावर लावत असलेल्या झाडांचं शेळ्या आणि वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत होतं. ते पाहून शिवाजी विद्यालयातल्या १९९५ च्या १० वीच्या बॅचच्या त्यांच्या वर्गमित्रांनी  झाडांना तारांचं कुंपण घालण्यासाठी १८ हजार रुपयांचं साहित्य दिलं. पण कुंपण घालण्यासाठी मजूर १५ हजार रुपये मागत होते. ते शक्य झालं नाही. मग खरसाडे यांनी स्वतःच चार दिवसात हे साहित्य डोंगरावर नेलं. तिथे स्वतः दररोज १० खड्डे खणले आणि महिनाभरात साडे तीन एकराचं कुंपण घातलं. यामुळे १५० झाडं जगली. गेल्या वर्षीही देवराई ट्रेकिंग क्लबच्या सदस्यांनी १८ तर वर्गमित्रांनी ३४ खांब दिले. झाडांची भिशी घेणाऱ्या ग्रुपनं पाच जाळ्या, २५ ट्री गार्ड आणि ५० वडाची झाडं दिली.  झाडांना पाणी कसं द्यायचं प्रश्न होता. मग बार्शी नाक्यावरच्या  दोन हॉटेलमधल्या पाण्याच्या दीड हजार प्लॅस्टिकच्या  रिकाम्या बाटल्या संकलित  केल्या. पावसाळ्यात शिवराई वन प्रकल्पाच्या बाजूच्या  वाहत्या झऱ्यात दीड  हजार बाटल्या भरून  खड्ड्यात ठेवल्या.  उन्हाळ्यात  बाटल्यांना टाचणीनं  खालच्या बाजूला छिद्र  पाडून बाटली खोडाला ठेवून  ठिबक सिंचनाद्वारे पाणी.  वर्षभरापासून  हा प्रयोग सुरू आहे. एप्रिलनंतर हे पाणी संपलं.  मग  प्रकल्पाजवळील  काटेवाडा साठवण तलावाच्या  डोहातील  खराब पाणी  एका दुचाकीला दहा कॅन बांधून  आणत आहेत. खरसाडे, यंदाही पावसाळ्यात दीड  हजार बाटल्या भरून  ठेवणार आहेत.   आहेरवडगाव इथल्या  डोंगरावर ६२ हेक्टरवर झाडं लावायला  ग्रामपंचायतीनं  खरसाडे यांना  ना हरकत  प्रमाणपत्र दिलं असल्यानं ते ६२ हेक्टरवर झाडं लावणार आहेत.
पावसाळ्यात  शेतात कडूलिंबाच्या झाडाखाली लिंबोळी पडून हजारो रोप उगवतात.  मात्र शेतातली ही रोपं नष्ट होतात.  खरसाडे ही रोपं शिवराई प्रकल्पाच्या  डोंगरावर लावतात.
तत्कालीन सामाजीक वनीकरण उपविभागीय अधिकारी अमोल सातपुते यांनी खजाना विहिरीच्या पूर्वेला जेसीबी लावून जमीन समतल केली.  दीड एक्करातील दगड काढून जुलै २०२१ मध्ये १०१ प्रजातीची १२ हजार झाडं लावली. हा घनवन प्रकल्प  वृक्षमित्र अभिमान खरसाडे यांच्या संकल्पनेतून पूर्ण झाल्यानं  वनीकरण विभागानं  खरसाडे यांच्यावर  चित्रफीत काढली आहे.
निसर्गाशी संबंधित ८ बालकथा संग्रह त्यांनी लिहिले आहेत. वृक्ष बियांच्या दहीहंडीसारखे उपक्रम ते घेतात. खरसडे सांगतात,”निसर्गाबद्द्दल ओढ असेल तर त्याच्यासाठी काम करण्याची, अडचणींशी दोन हात करण्याची उमेद मनात जागतेच.”
-दिनेश लिंबेकर, बीड

Leave a Reply