पापरीचा आंबा गोडच गोड!

मोहोळ तालुक्यातल्या पापरी गावातल्या सम्मेद शहांच्या आंब्याची ही गोष्ट. पापरी गावात सम्मेद शहा यांच्या कुटुंबाची अकरा एकर शेती. काही वर्षांपूर्वी त्यांनी तिथं आंबा लावला. हळूहळू झाड मोठं झालं आणि साखरेसारख्या गोड चवीच्या आंब्यांनी सम्मेद यांना भरभरून फळं मिळाली. त्यांनंतर प्रत्येक वर्षी झाडाने दोन-अडीच हजार फळं द्यायला सुरूवात केली. हे आंबे न विकता नातेवाईक आणि मित्र परिवारात वाटणं तेव्हा सम्मेद यांनी सुरू केलं.
असा गोड आंबा प्रत्येकाच्या दारी असावा, त्यातूनच पर्यावरण वाचवावं असा विचार शहा यांच्या मनात आला. विचारापाठोपाठ त्यांनी घरासमोर छोटीशी रोपवाटिका तयार केली. इथं तयार झालेली रोपं ते शाळा, सामाजिक संस्था यांना मोफत देतात. घरी आंबे खाल्ले किंवा त्याचा आमरस काढल्यावर त्याच्या कोयी टाकून न देता दरवर्षी ते पाचशे रोपं तयार करतात.


नातेवाईक, मित्र, राजकारणी व्यक्ती असा कुणाचा वाढदिवस अथवा कार्यक्रम असल्यास सदर रोपे भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करतात. पावसाळा सुरू झाला की, कागदी पिशव्यांमध्ये माती भरून कोयीचं रोपण केलं जातं. ही रोपं बनवण्यासाठी शहा कुटुंबातील सर्व सदस्य मदत करत असतात. रोज नियमितपणे या रोपांना पाणी दिलं जातं आणि वाढीसाठी त्याची निगा राखली जाते. गेल्या पाच वर्षात त्यांनी अडीच हजारापेक्षा जास्त रोपं वाटली आहेत.
याविषयी सम्मेद शहा सांगतात, “आम्ही आंब्याची रोपं तयार करुन वाटप करत असतो. याचे भविष्यात मोठे वृक्ष होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागेलच. शिवाय त्याला हजारो फळे लागून त्यापासूनही शेकडो झाडे बनतील. ज्यांना ज्यांना अगोदर रोपे दिली आहेत ते त्याची जोपासना करत आहेत. या उपक्रमातून आम्हाला मोठे समाधान मिळते.”
सम्मेद शहा यांचा संपर्क क्र. – 9860442927

– अमोल सीताफळे, पापरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर

Leave a Reply