पालकत्व केवळ कुटुंबापुरतंच नसतं

प्रश्न : पालकत्व केवळ कुटुंबापुरतंच नसतं. आमदार या नात्याने तुम्ही मतदारसंघातल्या सर्वच मुलांचे पालक आहात; त्यांच्याबाबतची कोणती जबाबदारी तुम्हाला जाणवते? उत्तर : मतदारसंघात विविध सामाजिक स्तर आहेत. तसे ते शाळांच्या आणि मुलांच्या बाबतीतही आहेत. सरसकट एक धोरण ठरवून, एक उपक्रम राबवून सर्वांचं भलं साधणं शक्य नाही. ई लर्निंगचा प्रसार झाला पाहिजे. शिकणं-शिकवणं सगळ्या ज्ञानेंद्रियांचं विकसन करणारं हवं. शाळांनी सर्व प्रकारच्या क्षमता असलेल्या मुलांचं हित लक्षात घ्यावं, असा माझा प्रयत्न असतो. विकसित देशांत प्रत्येक मूल खास आहे, या विचाराने शिक्षणक्रम ठरवतात. ते इथे व्हावं. हे एकदम होणार नाही. पण माझा विचार त्या दिशेनं चालला आहे.
प्रश्न : एखादं उदाहरण ?
उत्तर : इथल्या एका मुलाच्या क्षमता नीट न तापसता शाळेनं त्याला विशेष मुलांच्या शाळेत पाठवा, असं पालकांना सांगितलं. मुलाची स्थिती अशी होती की सामान्य मुलांच्या शाळेत त्याच्या क्षमता विकसित होण्यास वाव होता. मग ती शाळा त्याला का मिळू नये? मी हालचाल करून त्याला सामान्य मुलांच्या शाळेत शिकण्याची व्यवस्था केली. गरीब कुटुंबातल्या या मुलासाठी खर्चाच्या व्यवस्थेतही मी लक्ष घातलं. अशा प्रकारची मदत मी करतच असतो.
प्रश्न : एखादं धोरणात्मक उदाहरण?
उत्तर : बारावीच्या परीक्षेच्या वेळी (विशिष्ट क्षमतांचा अभाव असलेल्यांना) बेसिक कॅल्क्युलेटर वापरायला परवानगी देणारं धोरण झालं, ते माझ्या प्रयत्नांतूनच. विद्यार्थ्याची हुशारी तपासण्याची पद्धत पूर्णत: बदलायला हवी. क्षमतांचा अभाव असलेल्यांचं ज्ञान तपासताना त्यांना काही मदत पुरवणंही गरजेचं आहे.
प्रश्न : हा मुद्दा तीव्रतेनं जाणवण्याचं खास कारण?
उत्तर : माझा मुलगा नववीत असताना त्याची क्षमता आणि कल आम्ही जाणून घेतला. हे तंत्र चांगलं आहे. मानवी मेंदूंचं पूर्ण मॅपिंगच होतं त्यात. विज्ञानाचा असा उपयोग सर्व मुलांसाठी होणं गरजेचं आहे. मात्र आज तरी हे फार खर्चिक आहे.
प्रश्न : मुलाचा विषय निघाला हे छान झालं. तुमच्या स्वत:च्या पालकत्वाविषयीही उत्सुकता आहे.
उत्तर : पालक म्हणून मी समाधानी आहे. आमचं बाप-लेकाचं नातं मित्रत्वाचं आहे. तो मला ‘अरे बाबा’ म्हणतो. मी त्याला ‘चत्र्या’ म्हणतो. तसाच आहे सौमित्र. मी नाकासमोर चाललो नाही, वेगळ्या प्रकारे जगून पाहिलं… तोही तसाच आहे. त्याची वाट तो निवडतो. नागरिक म्हणून मी जाणीवपूर्वक एकच मूल, कुटुंबाचा आकार सीमित, सौमित्रला मराठी माध्यमातच घालणं हे केलं.
प्रश्न : आपले वडील सौमित्रच्या नजरेत कसे आहेत?
उत्तर : (मोठ्याने हसतात) त्याचा राजकारण्यांवर राग आहे. राजकारणातील वाईट गोष्टींना तो टीकेचं लक्ष्य करतो. मी त्याच्यावर कधीही दबाव आणला नाही, याची त्याला जाणीव आहे. मोकळेपणानं वाढण्याची मौज त्यानं अनुभवली.
प्रश्न : खंतावण्याचे प्रसंग कधी आले?
उत्तर : त्याला वाचनाची आवड मी लावू शकलो नाही. सामाजिक व्यक्ती होण्याकडे त्याचा कल नाही, याचं काही अंशी वैषम्य आहे. आमदार अतुल भातखळकर (मुलाखत : सुलेखा नलिनी नागेश, समता रेड्डी)