पालकत्व हा आयुष्यातील जबाबदारीचा टप्पा असतो

मुलांना वाढवणं, पालक होणं या सुंदर गोष्टी असतात, त्यांना आपणच आकार द्यावा लागतो, पालकत्व हा आयुष्यातील जबाबदारीचा टप्पा असतो हा संस्कार आई-वडिलांकडून झाला. मुलं होतील तेव्हा त्यांना वेळ देता येण्याइतके आपण मोकळे असलो पाहिजे, हे पक्कं ठरवलेलं होतं. शिक्षण, नोकरी संपेपर्यंत मूल होणार नाही, याची डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घेतली. आपलं मूल देखणं, हुषार असावं असं वाटण्यापेक्षा ते सामान्य असावं, त्याला साध्या साध्या गोष्टींमधून आनंद घेता यावा एवढीच इच्छा होती. पोटात मूल तयार होणं, वाढणं हे बेबीसेंटरच्या वेबसाईटवर पाहताना आनंदून जायचो. मूल होणं ही खरोखर निसर्गाची जादूच! जन्मानंतर मुलाला विविध टप्प्यांवर वाढताना बघताना कमाल वाटते. एकाच आई-बापाची दोन मुलं वेगवेगळी असणंही विलक्षणच!

ओजस दहा आणि तुहिन सहा वर्षांचा. माझ्या आईबाबांकडून अनुभवलेला ओलावा पालक म्हणून आपल्यालाही मुलांना देता यावा असं वाटतं. ओजसचं स्वतःची ओळख शोधण्याचं वय. अपमान सहन न होणं, एकदम भडकणं, कोणाचंही न ऐकणं, उलट उत्तर देणं, लहान भावंडाला मारणं आणि तरीही सगळे लाड करून घेणं हे आम्ही ओजसच्या रुपाने अनुभवतो आहोत. स्वतःला कायमचं ठरवून घ्यावं लागतं की तो रागावला तरी मी रागावणार नाही. ठाम शब्दात त्याचं काय चुकतंय, ते कसं बदलता येईल हे सुचवीन. त्याला विचारीन की हे बदलण्यासाठी काय प्रयत्न करू शकशील, त्यात माझी काही मदत होईल का? आणि मुळात चुकतंय हे पटतंय का? या संवादात त्याला माझं काही चुकतंय का हेही सांगण्याची पूर्ण मोकळीक आहे. हे बोलूनही तो पुन्हा असाच वागणार आहे आणि मला शांत रहायची कसोटी पार करत पुन्हा हेच बोलावं लागणार आहे. मीच जर त्याच्याशी रागावून वागले तर तो माझ्यापासून आणि स्वतःपासूनही दूर जाईल अशी भीती वाटते. म्हणून हा खटाटोप. हे सगळं एका क्षणात जमलेलं नाही. वाचन, मनाची तयारी केल्यावरच प्रत्यक्षात आणता आलं आहे. हे जमल्यामुळे मला पालक म्हणून खूप छान वाटतं आहे. तुहिनला दादाचं अनुकरण करायचं असतं. शिवाय त्याला सर्व खेळणी आणि वस्तू तोडून बघायच्या असतात. आत काय आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. काही वेळा माझा संताप अनावर होतो. पण रागावलं की चिमुकली मुलं बिचारी घाबरतात, त्यांचा मोठ्या माणसांवरचा विश्वास उडतो. त्यापेक्षा समजावून सांगणं किंवा हे तोडून बघण्यापेक्षा अजून इतर काहीतरी कर, असे पर्याय समोर ठेवले की त्याच्या सृजनशक्तीलाही मार्ग मिळतो आणि रागवावंही लागत नाही.
मुलं जे करत असतात त्यामागे नक्की काहीतरी कारण असतं, विचार असतो यावर विश्वास ठेवणारी मी पालक आहे. हा विश्वास मीच गमावला, तर मुलाने कोणाकडे बघायचं? कितीही कठीण वाटलं तरी मुलाला नेमकं काय हवंय हे समजून घेणारे पालक तयार होणं हा मुलाचा हक्क आहे. तो मिळवून देणं हे पालकांच्याच हातात आहे.

– आभा भागवत