पिंकीनं पुढाकार घेतला आणि मुलं शिकू लागली

”आमच्या जिल्ह्यात मेळघाटाचा भाग आणि इतर ठिकाणच्या, शहरातल्या वस्त्यांमधूनही पारधी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. साधारण दोन दशकांपूर्वी  काही समान विचारांच्या लोकांनी या वस्त्यांना भेट द्यायला सुरुवात केली. आपल्या समाजानं या घटकाकडे किती दुर्लक्ष केलं आहे ते जाणवू लागलं आणि २००३ मध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीदिनी, सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सेवाकार्याचा आरंभ केला.” अमरावतीतल्या प्रज्ञा प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे  सांगत होते. सुरुवातीचा   या लोकांना, त्यांच्या चालीरीती, जगणं, अडचणी समजून घेतल्या . जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात ४८ वस्त्यांमध्ये पारधी समाज राहतो. त्यापैकी ४० वस्त्यांचं सर्वेक्षण संस्थेनं केलं. ३५ वस्त्यात संस्थेचा प्रत्यक्ष संपर्क असून २० वस्त्यांमध्ये संस्था वेगवेगळे उपक्रम राबवते. आहार, आरोग्य, रोजगार असं प्राथमिक गरजा भागवणारं, मूलभूत समस्या सोडवणारं काम सुरू असताना पारधी मुलांच्या शिक्षणासाठी काम करण्याची नितांत आवश्यकता कार्यकर्त्यांना जाणवली. शिक्षणाचा कुठलाच वारसा नाही, आजूबाजूला तसं पोषक वातावरण नाही त्यामुळे या मुलांना शिकणं खूपच जड जातं. शाळेत गेले तरी बहुतांश जण काही दिवसातच ते सोडणारे. या मुलांसाठी अमरावती शहरात  स्वामी विवेकानंद छात्रावासाच्या रूपानं नऊ वर्षांपूर्वी निवासी शिक्षणाची  सुरुवात झाली. सुरुवातीला ९ मुलं होती, त्यातलीही दोन निघून गेली. मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणं कठीण होतं. अशातच पिंकीनं पुढाकार घेतला आणि चित्र पालटू लागलं. वेगवेगळ्या पाड्यावर भेटी देताना  पिंकी नरेंद्र भोसले ही तरुणी संस्थेच्या संपर्कात आलेली. पिंकी छात्रावासात दाखल झाली. पोटच्या लेकराप्रमाणे ती मुलांची काळजी घेऊ लागली. त्यांचं जेवणखाण,आरोग्य याची जातीनं काळजी घेऊ लागली. त्यांची मनं जपली.  तिनं मुलांना चांगल्या सवयी लावल्या आणि अभ्यासही करून घेऊ लागली.  नऊ वर्षांपूर्वी  छात्रावासात आलेला प्रशांत पवार सांगतो, ”मी  समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण नुकतंच  पूर्ण केलं आहे.  त्याचं श्रेय पिंकी ताई आणि प्रज्ञा प्रबोधनीचं ! माझ्या आयुष्यात हे नसते तर इतरांप्रमाणे मलाही चोर म्हणून हिणवलं  गेलं असतं.  आता मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीसाठी  तयारी करत आहे.” पंचक्रोशीतून विवेकानंद छात्रावासात आलेल्या विद्यार्थ्यांचा आपल्या कुटुंबाशी संवाद राहावा, कुटुंबीयांना संस्थेविषयी विश्वास वाटावा यासाठी बेड्यावर बेडाप्रमुख, आरोग्य रक्षकप्रमुख, बचतगट प्रमुख व स्वयंरोजगार प्रमुख नेमण्यात आले आहेत. अविनाश देशपांडे सांगतात, ”नऊ वर्षांपूर्वी  सेवा, शिक्षण आणि संस्कार यावर आम्ही काम सुरू केलं.  पिंकी आणि नरेंद्र भोसले या दाम्पत्याच्या सहकार्यानं  आम्ही ३१ मुलांना बीए, बीएस्सी, बीकॉम, एमएस डब्ल्यू करू शकलो. पैसासुद्धा न घेता आपल्या कुटुंबातील लेकरं उच्च विद्याविभूषित  होत असल्यानं  पारधी समाजात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हीच प्रज्ञा प्रबोधिनी संस्थेची फलश्रुती आहे.”

-जयंत सोनोने, अमरावती

Leave a Reply