पिंपरण ते ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज, व्हाया रतन टाटा!

||अपना टाईम आएगा|| मालिकेतील पुढील भाग

परभणीच्या पूर्णा तालुक्यातलं पिंपरण नावाचं छोटंसं खेडेगाव. तिथंच डॉ. संजय ससाणेंचं कुटुंब राहायचं. घरात आई- वडील, तिघे भाऊ आणि एक बहीण. वडील ड्रायव्हर म्हणून काम करायचे. संजय चार वर्षांचे असताना त्यांचे वडील उलट्या होऊन, छातीत दुखून अचानक गेले. ‘वडील जाणं’ म्हणजे काय हे ही न कळणाऱ्या आपल्या पोरांना त्यांच्या आईनं अतिशय निश्चयानं आणि धीरानं सांभाळलं. हे कुटुंब त्यांच्या मामांच्या घरी राहायला गेलं. आईनं मोलमजुरीची कामं सुरू केली, पोरांनीही वेळप्रसंगी पडतील ती कामं केली. कधी पेप्सीकोला विकला, कधी लोकांच्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा काढल्या. आईची खूप इच्छा होती की मुलांनी भरपूर शिकून मोठ्ठं व्हावं. आज या माऊलीची चारही मुलं उत्तम शिक्षण घेऊन चांगलं करियर करत आहेत. त्यापैकीच आज आपण ज्यांच्याविषयी वाचणार आहोत ते पिंपरण गावातले पहिले डॉक्टर- डॉ. संजय ससाणे. ससाणे यांनी नुकतंच ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून मेडिसिन या विषयातील एमडी पदवी संपादन केली आहे.

डॉ. संजय सांगतात, “आई अतिशय मेहनती होती, सगळ्या मुलांनी उत्तम शिकावं, भरपूर मोठ्ठं व्हावं एवढी तिची एकच इच्छा होती. वडील अकाली गेल्याने सगळा संसार तिलाच चालवावा लागत असूनही, त्या कष्टांबद्दल तिची कधीच तक्रार नव्हती. आम्हीही हे सगळं ओळखून उत्तम अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचो आणि पैसे मिळवण्यासाठी पडेल ती कामंही करायचो. एकमेकांची जुनी पुस्तकं, कपडे वापरतच आम्ही शिक्षण घेतलं. सगळ्यात मोठा भाऊ नांदेडच्या पीपल्स कॉलेजला शिकायला गेला, बीए इंग्लिशमध्ये तो टॉपर झाला. तेव्हा मी जवळच्या कावलगाव नावाच्या गावी आठवीत होतो. मी सुद्धा वर्गात पहिला यायचो, तिथल्या मित्रांसोबतही खूप रमायचो. पण आणखी प्रगती करायची तर संजयला शहरात आणायला हवं म्हणून दादानं मलाही नववीसाठी नांदेडला आणलं. तिथल्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि बंजारा हॉस्टेलला मला राहण्यासाठी ठेवण्यात आलं. घरापासून बाहेर राहण्याचा पहिलाच प्रसंग, मला तिथं अजिबात करमायचं नाही, घरची- गावाची आठवण यायची. त्यात हॉस्टेलचं जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं.  या सगळ्यामुळे माझं अभ्यासात अजिबात मन लागेना आणि मी पिंपरणला पळून आलो. एसटी कंडक्टरला द्यायला पैसेही नव्हते, गयाबया करत कसंबसं परत आलो. पण आपल्याला  नांदेडला राहायचं नाही, एवढंच मी ठरवलं होतं.”

डॉ. संजय ससाणे, एमबीबीएस- एमडी

“आठवीपर्यंत वर्गात पहिला येणारा मुलगा शाळाच शिकायची नाही म्हणून घरी आल्यावर आईसुद्धा वैतागली. तिनं मला समजवायचा प्रयत्न केला पण आता शहर नको, शिक्षणही नको यावर मी ठाम होतो. आई तेव्हा बचतगटात काम करायची. तिला शेळी पालनासाठी कर्ज मिळालं होतं. आई म्हणाली, ‘तू काहीच करत नाहीस, शिकायचंही नाही ना, चल मग शेळ्या वळायला जा आजपासून!’ मी ही तयार झालो, शेळ्या वळल्या, गावात रस्त्याचं बांधकाम सुरू होतं, तिथं मिस्त्रीच्या हाताखाली काम केलं. हे सगळं गावातले शिक्षक, बहिणीच्या शाळेतले शिक्षक पाहत होते. ते ही मला वारंवार टोकायचे, ‘एवढा टॉपर मुलगा तो अभ्यास आणि शाळा सोडून असले उद्योग कशाला करतोस?’ मलाही आपण चुकतोय का असं वाटायला लागलं. त्याच दरम्यान भावाला उत्तम टक्के पडतच होते, त्याने परत मला समजावलं. आपण वाटल्यास नांदेडला एकत्र राहू, स्वत: स्वयंपाक करून खाऊ पण तू शिक्षण सोडू नकोस. आणि मी पुन्हा पीपल्स संस्थेच्या शाळेत नांदेडला दाखल झालो. तिथं मला नववीच्या ई तुकडीत प्रवेश मिळाला.” डॉ. संजय आयुष्यातल्या पहिल्या टर्निंग पॉईंटबद्दल सांगत होते.

त्यावेळी डॉ. संजय यांचे मोठ्ठे भाऊ पोलीस भरतीची तयारी करत होते. भावाला मदत आणि स्वत:लाही घरचं खायला मिळावं, म्हणून यांनी हॉस्टेलच्या रूमवरच स्वयंपाक करणं सुरू केलं. इकडं शाळेत रूळायलाही थोडा वेळ लागला, कारण शहरातली शाळा, दादागिरी करणारी मुलं, पण जेव्हा संजय यांना परीक्षेत उत्तम मार्क पडायला लागले, शाळेत त्यांच्या भाव आपोआपच वाढला. दरम्यान मोठ्या भावाचे पोलिस भरती परिक्षेद्वारे कॉन्स्टेबल म्हणून मुंबईत पोस्टिंग झाले आणि ससाणेंच्या घरातला पहिला माणूस सरकारी नोकरीला लागला.  भावाला पंधरा हजार रूपये पगार सुरू झाला. इकडं संजय ससाणे सुद्धा दहावीत ऐंशी टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. दुसरा भाऊ बारावीला होता, तो ही हुशार होताच. त्याचा इंजिनिअरिंगसाठी पुण्याच्या सीओईपी कॉलेजला नंबर लागला. आता मोठ्या भावाची आर्थिक मदत पूर्ण ससाणे कुटुंबाला होत होती. भावाचं काम बघून संजयना वाटायचं आपण सुद्धा पोलिसच व्हायला हवं, आपण पण पोलिस भरतीची तयारी करायची असं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं.

डॉ. संजय पुढे म्हणाले “त्यासाठी नांदेडच्या सायन्स कॉलेजला मी प्रवेश घेतला. एनसीसी जॉईन केली, उत्तम व्यायाम, धावणं सुरू केलं. तिकडं मोठ्या भावाचीही प्रमोशन होत होती, स्पर्धा परीक्षांमधून तो पोलिस सेवेत वरच्या पायऱ्या चढत होता. मी पण एमपीसी- यूपीएससी काही करण्याचा विचार करत होतो, पण तो मला म्हणाला, ‘सरकारी नोकरीपेक्षा तू स्वत: काहीतरी कर, तू हुशार आहेस चांगला. डॉक्टर व्हायचा विचार का करत नाहीस?’ मला हा विचार पटला. शिवाय विज्ञानाच्या अभ्यासात रस वाटत होताच. भावाच्या मदतीमुळे बारावीला सीईटीची ट्यूशनही लावली. 131 मार्क्स पडले, 155 चा कटऑफ होता. पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली, तेव्हा 175 मार्क पडले आणि माझा मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजला नंबर लागला. तिथंही ४५ हजार रू. फी होती. भावाच्या एकट्याच्या पगारात एवढं सगळं भागवणं शक्य नव्हतं आम्हांला. दिशा परिवार फाऊंडेशन या संस्थेकडे मदत मागितली, वीस हजार रूपयांची मदत त्यांच्याकडून झाली. मी सेकंड इयरला असताना मोठ्ठा भाऊ पीएसआय झाला, मधला भाऊ पुण्यात टाऊन प्लॅनर इंजिनिअर झाला. बहिणीनं डी. फार्मसीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली.”

पार्ट- अपार्ट पुस्तकातील डॉ. संजय ससाणे यांच्या संघर्षावरील पान

शासकीय वैद्यकीय सेवेचा बॉन्ड पूर्ण करता करता डॉ. संजय यांचा एमडी मेडिसिनसाठी नंबर लागला. एमबीबीएस करणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यात कसाबसा दहा विद्यार्थ्यांचा एमडीला नंबर लागतो, आणि डॉ. संजय त्यापैकी एक होते. त्यांच्या पिंपरण गावातले तर ते पहिले डॉक्टर. हे सगळं करताना मुंबईत येऊन राहणं, तिथल्या आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेणं, प्रसंगी रंगावरून चिडवलं जाणं असे कसोटी घेणारे कितीतरी प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले. पण या सगळ्यावर मात करून त्यांनी अभ्यासासोबत सोशल लाईफही व्यवस्थित सांभाळलं आहे. डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशनचा प्रेसिंडेंट म्हणून त्यांनी काम केलंय. त्यात शाहू महाराज जयंती, महापरिनिर्वाण दिन अश्या वेगवेगळ्या प्रसंगी गरीब, गरजूंसाठी मेडिकल कॅम्प्स आयोजित केले जातात. याशिवाय मार्ड संघटनेत स्पोर्टस सेक्रेटरी, ट्रेझरर म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रतन टाटांच्या ट्रस्टचे Part- Apart नावाच्या पुस्तकात, डॉ. संजय ससाणे यांच्या प्रवासावर एक पान छापून आलेलं आहे. या पुस्तकात मैलावाहक स्वच्छता कामगारांची भयावह परिस्थिती तसंच भारतात SCST समाजातून, अत्यंत कष्टातून वर आलेल्या गुणी, यशस्वी लोकांच्या कहाण्या आहेत. यात सूरज हेंगडे, पा रणजित अश्यांसारखी मोठ्ठी नावं आहेत. सुधारक ओलवे, शैलेशकुमार दरोकर यांनी या पुस्तकासाठी आशय तयार करण्याचं काम केलंय.

डॉ. संजय म्हणतात, “आत्तापर्यंतच्या या प्रवासात माझ्या कुटुंबियांइतकेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मी आभार मानतो. त्यांच्या कर्तुत्त्वाप्रति आपण सगळ्यांनीच कृतज्ञ असायला हवं, इतकं मोठ्ठं काम त्यांचं आहे. एमबीबीएसला आल्यावर मी आंबेडकर, शाहु, फुलेंची पुस्तकं वाचायला लागलो, Annihilation of caste हे माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे. मुंबईत आल्यावर आंबेडकरी चळवळीतही रमलो. बौद्ध समाजातून आल्यानं मला तर आंबेडकरांचे उपकार विशेषच जाणवतात. म्हणूनच आपण फक्त मोठं होणं हे आयुष्याचं एकमेव ध्येय नाही. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणं, मार्गदर्शन करणं हे ही काम मी करत राहणार आहे. बाकी कुटुंबापैकी आई, मोठा भाऊ असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर राजकुमार ससाणे, शालेय वयात मोफत ट्यूशन देणारे चौगुले सर, दिशा परिवाराची पूर्ण टीम, डॉ. रेवत कानिंदे, डॉ. आकाश वाघमारे सर, राहुल सावंत, निखिल कांबळे, अतुल भोंडवे, राजकुमार निंबाळकर हे इजिप्तला मर्चंट नेव्हीत आहेत, यांनी दिशा परिवारातर्फे मला मदत केली होती अजून एकदाही त्यांना भेटलेलो नाहीए, अश्या सर्वांचा मोठ्ठा पाठिंबा आणि सहकार्य मला लाभल्याने आज यशाच्या पायऱ्या चढतोय”

“आणि एकच शेवटची गोष्ट सांगतो, तुम्ही कितीही गरिबीतून आला असलात आणि कष्टाची तयारी असेल तर तुम्ही मोठे होऊ शकता, तुमचं जेन्यूईननेस दिसला तर लोक 100 टक्के मदत करतातच करतात”

लेखन: स्नेहल बनसोडे-शेलुडकर, संपर्क, पुणे

 

नवी उमेद कसं वाटतं तुम्हाला? तुमचा अभिप्राय, प्रतिसाद अवश्य लिहा. आणि वाचकहॊ, तुम्हीही नवी उमेदला आर्थिक मदत करा. त्यासाठी ही लिंक: https://naviumed.org/support/

 

#नवीउमेद

#DrBabasaheb_Ambedkar

#RatanTata

#JJHospital

#GrantMedicalCollege

#ApnaTimeAaega

#PartApart

 

 

 

Leave a Reply