पोलीस आहेत सदैव साथीला

बहुतेकदा मुलांनी ऐकाव म्हणून त्यांना पोलिसांची भीती घातली जाते. पण त्याचबरोबर मूल जेव्हा थोडं मोठं होतं, त्याच्यावर एकट्याने बाहेर वावरायची वेळ येते तेव्हा त्याला पोलिसांचाच आधार दिला जातो. एकट्याने बाहेर पडणाऱ्या मुलामुलींना आईबाबा बाहेर पडते वेळी आवर्जून सांगतात, काहीही अडचण आली, पत्ता विचारायचा असेल, कुठलीही मदत लागली तर पोलिसांना विचारायचं. कोणी पाठलाग करत असेल, वेडंवाकडं वागत असेल तर पोलिसांना सांगायचं. त्यांची मदत घ्यायची. मुलांच्या संरक्षणासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात. आपल्यावरचा हा विश्वास पोलीस कायम टिकवून आहेत. मुलांच्या संरक्षणासाठी पोलीस करत असलेल्या उपाययोजनांबाबत ठाण्याच्या पोलीस उपायुक्त (मुख्यालय १) रश्मी करंदीकर यांनी माहिती दिली. मुलांवरचं प्रमुख संकट म्हणजे हरवल्यामुळे, अपहरण झाल्यामुळे घरच्यांपासून त्यांची ताटातूट होते. आपल्याकडे वर्षाकाठी हजारो मुलं बेपत्ता होतात. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली होती. हरवलेल्या तसेच अपहरण झालेल्या मुलांच्या सुटकेसाठी गेल्यावर्षी जानेवारी आणि नंतर जुलै महिन्यात ‘ऑपेरेशन स्माइल’ आणि ‘ऑपेरेशन मुस्कान’ राबवण्यात आलं होतं. या अभियानांना चांगले यश मिळाले. केंद्र सरकारच्या डिसेंबर २०१५ च्या नोंदीनुसार वर्षभरात विविध राज्यांमधून ‘ऑपेरेशन स्माइल’ अंतर्गत ९,१४६ तर ‘ऑपेरेशन मुस्कान’ अंतर्गत १९,७४२ मुलांची सुटका करण्यात आली. या अभियानाअंतर्गत राज्यातही मोहिमा राबवून मुलांची सुटका करून त्यांची त्यांच्या पालकांबरोबर गाठ घालून दिली जाते. मुलं आणि पालकांची गाठभेट हा पोलिसांसाठी आनंदाचा समाधानाचा क्षण असतो असं रश्मी करंदीकर सांगतात. ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्यातल्या पोलिसांच्या साथीने यावर्षी एप्रिल महिन्यात ऑपेरेशन मुस्कान, महाराष्ट्र हे विशेष अभियान राबवलं होतं. त्यामधून ० ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांचा शोध यात घेण्यात आला. या मोहिमेत ठाणे आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून ८८ मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. यात अपहरण झालेली ४२, हरवलेली ७ आणि बेवारस फिरणारी तीन मुले होती. विविध बालगृहातल्या २५ मुलामुलींना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. भीक मागणाऱ्या मुलांसह त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं.


हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्टशन युनिटही उत्तम काम करत असल्याचं रश्मी यांनी सांगितलं. हरवलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जुलै २०१४ मध्ये या युनिटची स्थापना करण्यात आली. अशी स्थापना करणारे ठाणे हे देशातले पहिले आयुक्तालय आहे. जूनमधल्या नोंदीनुसार युनिटने २२२ मुलांना त्यांच्या घरी पोहोचायला मदत केली आहे. याखेरीज बालमजुरी आणि बालविवाह यांना आळा घालण्याचं काम हे युनिट करते. गुन्हे शाखेअंतर्गत असणारे जुवेनाईल एड पोलीस युनिट मुलांना भीक मागायला लावणाऱ्या ठिकाणांवर छापे घालतात तसेच मुलांना मजूर म्हणून ठेवणाऱ्या दुकानांवर, स्टॉलवर, हॉटेलवर छापे घालतात आणि कायदेशीर कारवाई करतात. बालगुन्हेगार कायद्यासंदर्भात पोलिसांच्या वेळोवेळी परिषदा घेऊन पोलिसांना याविषयी सजग केले जाते, अशी माहिती करंदीकर यांनी दिली. मुलांचं लैगिक शोषण, छळ हा एक घृणास्पद प्रकार. रश्मी यांनी अशा काही प्रकरणांमध्ये तपास केला असून या प्रकरणांमधल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली आहे. पनवेल इथल्या अपंग, मतिमंद, मूकबधिर मुलींच्या लैंगिक अत्याचारासंबधीच्या खटल्याचा तपास त्यांनी केला होता. या गुन्ह्यातल्या एका आरोपीला फाशीची शिक्षा व इतरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण एकूणच अशी प्रकरणं उघड होण्याचं आणि त्यात आरोप सिद्ध होऊन गुन्हेगाराला शिक्षा होण्याचं प्रमाण अद्याप कमी आहे का आणि त्यावर उपाय काय या प्रश्नावर रश्मी म्हणाल्या, ‘अशी प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढणे आवश्यक असते कारण मूल जसजसं मोठं होत जातं तसतशा त्याला कटू आठवणी नकोशा वाटू लागतात आणि त्याचा परिणाम केसवर होतो. अपराधसिद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलीस कायम प्रयत्नशील असतात आणि महाराष्ट्रात हा दर चांगला असल्याचेही त्यांनी सांगितले’.

– सोनाली कुलकर्णी.