लॉकडाऊनदरम्यान सतत घरी राहिल्यानं, कामाच्या तणावामुळे ताणतणाव वाढत आहे. हे बदल हेरत धुळे जिल्हा पोलिसांनी उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी धुळे जिल्हा सायक्याट्री असोसिशन मदत करत आहे.
‘सकारात्मक मानसिकता हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे,’ जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचा विचार. मग मानसोपचार सेलची सुरुवात.पोलीस आणि नागरिक दोघांसाठीही.
आपला जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचं समुपदेशन होत आहे. त्यासाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ राजू भुजबळ मानसोपचार तज्ज्ञांसह स्वतः मैदानात उतरले आहेत. जागोजागी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ते भेटतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ तुषार भट सांगतात, ”पोलिसांसोबत आम्ही शासनाच्या निवारागृहांमध्ये थांबलेल्या आणि आपल्या घराची आस असलेल्या मजुरांशीदेखील संवाद साधत आहोत. मानसिक आजारावर आधीपासून उपचार घेणाऱ्या तीन रुग्णांचा या उपक्रमांतर्गत कॉल आला. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना डॉक्टरांकडे जाता येत नव्हतं आणि औषधंदेखील मिळत नव्हती. त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं, औषधं दिली.”
अपर अधीक्षक डॉ राजू भुजबळ सांगतात, ”सामान्य नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सतत घरी राहून अनेक नागरिकांमध्ये मानसिक बदल झाले आहेत. झोप न लागणं, निराश, उदास वाटणं … भविष्यातली भीती, तणाव … अशा समस्या काहींना भेडसावत आहेत. यासाठी पोलिसांनी मानोपचार तज्ज्ञांची टीम तयार केली आहे. सात डॉक्टर प्रत्येकी दोन तास मार्गदर्शन करतात.”
ही सेवा मोफत असून लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना मोबाईलद्वारे अथवा प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन सेवा घेता येत आहे. विशेष म्हणजे जे नागरिक आधीच मानसिक आजारांवर उपचार घेत आहेत आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम लाभदायक ठरत आहे.
#नवीउमेद #धुळे
– कावेरी राजपूत, धुळे