पोषण आहार वाटपमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आलं हास्य

 

कोरोनाची भीती अगदी सुरुवातीला जेवढी होती तेवढीच आजही आहे. आता ग्रामीण भागातही संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. मार्चपासून सतत लॉकडाऊनच्या काळात मुलांचं पोषण ढासळतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सगळं बंद होतं. पण अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन काम करण्याची वेळ आली होती. गावातील मुलांचा, गर्भवती मातांचा विचार करीत आम्ही कामाला महत्त्व दिलं, अनेकांना पोषण आहाराच्या माध्यमातून मदत झाली आणि त्यातूनच आम्हालाही जगण्याची नवी दिशा मिळाली, असं अंगणवाडी सेविका कुसुम मिसाळ व पुष्पा बनकर सांगत होत्या.

बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातलं हे अंजनी गाव. लोणार तालुका मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. इथं कोरोनाचा संसर्ग इतर तालुक्यांच्या तुलनेत उशीरा झाला. लॉकडाऊनमध्ये तालुका शंभर टक्के बंद होता. महाविद्यालयं, शाळा, अंगणवाडया सगळंच बंद. त्यामुळे अर्थातच मजूर, शेतकरी आणि गरीबांना रोजंदारी बंद झाली. ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्याचवेळी शासनाने अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना पोषण आहार घरपोच उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.


अंजनी गावात कुसुम मिसाळ तर बीबी इथून पुष्पा बनकर काही वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करत हेत. घरात कर्ता पुरुष नाही. त्यामुळे या दोघींनीच आपापलं घर उभं केलं आहे. कुटुंबप्रमुख त्याच असल्याने सध्याच्या परिस्थितीत घरोघरी जाऊन काम करायचं की नाही हे ठरवणं तसं अवघडचं. दोघींनीही आम्ही द्विधा मनस्थितीत असल्याचं सांगितलं.

अंजनी येथील अंगणवाडीत शून्य ते 3 वर्षांपर्यंतची 34 बालके, 3 वर्ष ते 6 पर्यंतची 46, स्तनदा माता 1, गर्भवती 4 आहेत. तर बीबी येथील पुष्पा बनकर यांच्या अंगणवाडीत 3 ते 6 वयोगटातील चाळीस बालके, सहा महिने ते 3 वर्ष 34 बालके, स्तनदा माता 7, गर्भवती 11 आहेत. सातत्याने लॉकडाउन वाढत असल्याने या तालुक्यातील अनेकांची कामे सुटली होती. खिश्यात पैसा नाही, घरात खायला काही नाही अशी अवस्था आली. हे सगळं बघून गावातील स्तनदा माता, गर्भवती आणि मुलांचं पोषण ढासळणार हे दोघींच्याही लक्षात आलं. ही परिस्थीती जवळून पाहत असल्यानेच त्यांनी गावात घरोघरी जाऊन पोषण आहाराचं वाटप करण्याचा निर्णय घेतला. कुसुम सांगतात, त्यावेळी केवळ काही आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आम्ही बाहेर पडत असल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत होती. गावातील रस्ते आधीच अरुंद त्यात समोरून येणाऱ्यांना मी रस्त्याने दिसले की ही मंडळी लगेच मार्ग बदलत असत. त्यामुळे माझ्याही मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. गावातील लोकं दुरूनच बोलत. लोकांचं हे वागणं पाहून काही काळ त्रास झाला.
या काळात आरोग्याची परिपूर्ण माहितीही त्यांनी मिळवली. गावात कोण आलं, कोण गेलं, कोण आजारी आहे याची माहितीही त्यांना घ्यावी लागत असे. सातत्याने गावकऱ्याच्या संपर्कात होते, नागरिकांना घरपोच पोषण आहार उपलब्ध करून देत होते. मी सारखी बाहेर पडते म्हणून पॉझिटीव्ह होऊ की काय अशी भीती सतत वाटत असल्याचंही त्या सांगतात.
मी ज्या पोषण आहाराचं वाटप केलं त्यातून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. माझ्या कामाची पोच मला अशा प्रकारे मिळाली. यातूनच मला जगण्याची नवी दिशा, आनंद मिळत असल्याचं कुसुम मिसाळ सांगतात.
– दिनेश मुडे, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा

Leave a Reply