प्रतिकूल परिस्थितीतील मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिशन एकलव्य

निरनिराळ्या आवाजानी गजबजलेली झोपडपट्टी.   त्यातलं एक छोटंसं घर.  आई,वडील,मुलगा,मुलगी असं  चौकोनी कुटुंब. प्रत्येक जण काहीना काहीतरी काम करून पैसे कमावतो. याच  घरातला चौदा वर्षांचा अरुण शाळा, अभ्यास सांभाळून  सकाळी  घरोघर पेपर टाकून दोन पैसे कमवून आईला मदत करतो.  अरुणला  दहावीला  चांगले गुण मिळाले.  दहावीपर्यंत पोहोचलेला त्याच्या घरातला तो पहिलाच. त्याला पुढे शिकायचं आहे.  त्याच्या जिद्दीला बळ दिलं  मानव अधिकार  संवर्धन संघटनेनं.   नाशिक जिल्ह्यातली ही संस्था. त्यांचा ‘मिशन एकलव्य’ उपक्रम आहे.

अरुणसारखी मुलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून उत्तम गुण मिळवतात. स्वत: पैसे कमवून शिकत असतात.  त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी संस्था त्यांचा एकलव्य गौरव पुरस्कारानं सत्कार करते. पूर्वी  ‘समता आंदोलन’ ही  युवा संघटना हा उपक्रम करत असे. तेव्हा सर्वसाधारणपणे गुणवत्ता यादीत येणारी मुलं चांगल्या आर्थिक स्थितीतली असत. त्यांचा जंगी सत्कार होत असे. अर्थातच या मुलांचे त्यासाठीचे कष्ट असतातच. पण अनेक आघाड्यांवर संघर्ष करणाऱ्या मुलांचं यश नेहमीच्या तराजूत तोलता येणारं नाही. पण तेव्हा मात्र ही मुलं पूर्णपणेच  दुर्लक्षित असायची. या मुलांसाठी एक शाबासकी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मोठी उमेद पुरवू शकते, हा विचार त्यामागे होता.  पुढे संस्था दुसऱ्या संस्थेत विलीन झाली.

आता नाशिकमध्ये २००७ पासून  मानव अधिकार संवर्धन संघटना या मुलांची दखल घेत आहे. संस्थापक शांताराम चव्हाण,

प्रा. मिलिंद वाघ, श्यामला चव्हाण, तल्हा शेख, शेखर साळवी, अशोक माळी, उन्मेष बागवे, पुंडलिक सातपुते यांनी या मुलांसाठी पुढाकार घेतला आहे. ही मंडळी स्वतः वर्गणी काढतात. त्यांचं काम आणि हेतू पाहून इतर अनेकांनीही या कामासाठी आर्थिक हातभार लावला आहे.

दरवर्षी साधारण १५० ते  २०० मुलामुलींचा सत्कार संस्था करते. त्यांच्या उच्चशिक्षणापर्यंत त्यांच्याशी संपर्क ठेवते.  वर्षभर त्यांना  शिक्षणाशी निगडित बाबींवर मार्गदर्शन केलं जातं.  मुलं  शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तुटू नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शहरातील हुतात्मा स्मारक इथं  महिन्यातील २ रविवार अनौपचारिक बैठक होते.  त्यांचे प्रश्न, त्यांची मते जाणून घेतली जातात. वेळोवेळी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेतल्या  जातात. संस्थेचे  ‘बुक बँक’ आणि ‘बुक कॉर्नर’ असे दोन उपक्रमही आहेत.  बैठकीच्या वेळी ‘बुक कॉर्नर’ वर विविध विषयांवरची पुस्तके मांडली जातात. मुलांना ती हाताळायला दिली जातात.  आवडलेली पुस्तके मुले  घरीदेखील नेतात. पुढल्या बैठकीला परत आणतात आणि नवीन घेऊन जातात. यातून मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागते.  वर्षातून एकदा अभ्यास सहल काढली जाते. निवासी शिबिरदेखील होतं.

उपक्रमातून  अनेक मुलं  यशाची मधुर फळं चाखत आहेत.  सुरवातीच्या काही वर्षांनंतर ‘एकलव्य गौरव’ पुरस्काराच्या पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी  गौरावार्थी विद्यार्थीच घेत आहेत. हे. स्वतःच्या अडचणींवर मात करून इतरांना मदत करण्याची ही सामाजिक जाणीव  एकलव्य गौरवार्थी अत्यंत जबाबदारीने निभावत आहेत.

-भाग्यश्री मुळे,नाशिक

Leave a Reply