”जागतिक तापमानवाढ १.५ डिग्री सेल्सिअस (IPCC अहवाल नुसार)पर्यंत पोहोचण्याआधी आपल्याकडे फक्त ८-१०वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे आता “तात्काळ” कृती आवश्यक आहे. ऊर्जा स्वराज, स्थानिक पातळीवर ऊर्जेची निर्मिती आणि वापर हा त्यावरचा एक उपाय आहे. आपल्याला लागणाऱ्या ऊर्जेची गरज समुदाय, गाव पातळीवर पूर्ण होऊ शकत नाही का ? पर्यावरणाची हानी रोखायची तर १०० %स्वच्छ ऊर्जा हवी. त्यासाठी सौर उर्जा ही लोकचळवळ झाली पाहिजे.” प्रा. चेतन सिंह सोलंकी सांगत होते. गेल्याच आठवड्यात चेतन त्यांच्या सौर बसमधून गडचिरोलीत आले होते. सध्या ही सौर बस हेच त्यांचं घर.
चेतन सध्या त्यांच्या सौर बसमधून ११ वर्षांच्या ऊर्जा स्वराज यात्रेवर निघाले आहेत.गांधीवादी आदर्शांना अनुसरून त्यांनी या उपक्रमाला ‘ऊर्जा स्वराज’ नाव दिलं. २६ नोव्हेंबर २०२० ला भोपाळमधून त्यांची यात्रा सुरू झाली. तेव्हापासून या बसमध्येच ते राहतात. बसमधली प्रत्येक सोय सौर उर्जेवर आधारित. बसमध्येच सर्व कामं. झोप, आंघोळ, स्वयंपाक, प्रशिक्षण यासाठी बसमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. लोकांना भेटून जागृती करण्यासोबतच सौर उर्जेवर जगणं शक्य असल्याचं उदाहरणही त्यांना दाखवून द्यायचं आहे. यात्रेत आतापर्यंत ६ राज्यात १५ हजार किमीचा प्रवास आणि ३५ हजारांहून अधिक लोकांची भेट. ११ वर्षात २८ राज्यात २ लाख किमीहून अधिक प्रवास नियोजित आहे.
चेतन मध्य प्रदेशात वाढलेले. १९९९ मध्ये आयआयटी मुंबईतून एम. टेक. बेल्जीयममध्ये सौर उर्जेवर पीएचडी. मुंबईत शिकत असतानाच अण्णा हजारेंशी भेट झाली. अण्णांबरोबरच्या चर्चेतून योग्य दिशा मिळायला मदत होत गेली. पीएचडीनंतर आपल्या गावापासून त्यांनी बदल घडवायला सुरुवात केली. एनर्जी स्वराज फाउंडेशनची स्थापना केली. SOULS प्रकल्पाद्वारे त्यांनी ७. ५ दशलक्ष घरांसाठी सौरऊर्जेचा वापर करून सोलर लॅम्प डिझाइन केले. देशविदेशातले अनेक पुरस्कार, ७ पुस्तकं, ४ अमेरिकी पेटंट आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून १००हून अधिक शोधनिबंध.
महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून हवामान बदलावर उत्तरं मिळवणं शक्य असल्याचा विश्वास चेतन व्यक्त करतात.
-ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली