प्रेमविवाहाचा कॉमन धागा

सुरेश आणि पत्नी सुवर्णा भुजबळ दोघं चळवळीत. तोच त्यांच्या प्रेमविवाहाचा कॉमन धागा. सुरेश सांगतात, “सुमेधनं चळवळीचा वारसा पुढे न्यावा, असं मन म्हणे. ते त्याच्यावर लादणं म्हणता येणार नाही. स्वाभाविक म्हणा, हवं तर. मात्र २१ वर्षं तो या धारणेला गुंगाराच देत आला! त्याला रुचेल, पटेल तेच करणार. माझ्या गृहितकांना धक्के देणाऱ्या सुमेधच्या बोटाला धरून पालकत्वाचा प्रवास सुरू आहे. पाचवीत असताना २५ मार्कांच्या एका छोट्या परीक्षेत सुमेध पास झाला नाही. का? तर विज्ञानाचं ५ मार्कांचं प्रोजेक्ट करत होता. त्याचं सबमिशन काही दिवसांनंतर होतं. तरी तेच करत बसला. आजही व्यवहाराकडे पाहून प्राधान्यक्रम ठरवणं त्याला जमत नाही.”   आर्ट कॉलेजमधलं कलाशिक्षण पठडीबाज असतं, त्या क्षेत्रातल्या प्रयोगांबद्दल शिक्षक अपडेट नसतात… असं म्हणत त्यानं दहावीनंतरचं ते शिक्षण पूर्ण केलं नाही. मग आर्को दत्तांच्या फोटोग्राफीच्या शिबिराला गेला. झपाटून जाऊन असाइनमेंटस केल्या. वयाची अट पूर्ण होण्याआधीच त्यांच्याकडच्या कोर्सलाही हट्टानं प्रवेश घेतला. आज तो त्या क्षेत्रात चांगलं काम करत आहे. इव्हेंट फोटोग्राफीच्या चांगले पैसे देणार्‍या कितीतरी ऑफर्स त्याला येतात. त्यातून या खर्चिक छंदाचे खर्च निभावता येतील. पण तो मात्र त्याला आवडणारीच फोटोग्राफी करतो. 

चळवळीच्या वातावरणाचे संस्कार तो विसरलेला नाही, असं सुरेश म्हणाले. National Geographic च्या एका स्पर्धेत सुमेधनं दुसऱ्या स्पर्धकाचं पाण्यात पडलेलं मेमरी कार्ड काढून दिलं. त्या क्षणी फक्त स्पर्धा महत्त्वाची असूनही त्यानं हे केलं. अशीच घटना शाळेत असताना घडली होती. कंप्युटर, इंटरनेटमधली त्याची गती बघून प्रिन्सिपलनी त्याला एक अडचण सोडवायला बोलावलं. त्या वेळी त्याच्या लक्षात आलं की शाळेच्या पीसीचा पासवर्ड ओळखला जाऊ शकतोय. त्यात परिक्षेसाठी सेट केलेले पेपरही होते. पण सुमेधनं सरांना ते वेळीच ध्यानात आणून दिलं.” असं कौतुक करून सुरेश पुन्हा सांगतात की चळवळीबद्दल बोलू लागलं की ‘पकवू नका’ असे सुमेधचे उद्गार असतात!  सुरेश स्वतः दलित वस्तीतून आलेले. सुवर्णाच्या सरकारी नोकरीमुळे सुमेधला बालपण स्थैर्याचं मिळालं. संघर्ष, अवहेलना त्यानं पाहिली नाही. असं चांगलं वातावरण सर्व मुलांना मिळावं आणि यासाठी चाललेलं काम त्यानं समजून घ्यावं, ही त्यांची अपेक्षा. अर्थात सुमेधला घडवण्याबाबत पालक म्हणून आमचे रॅशनल विचार नव्हते, हेच खरं, असं मान्यही करतात. त्यांच्या पिढीतल्या सर्वच पालकांना अनुभवाला येतो तो मुलांच्या मित्रमैत्रिणींमधला मोकळेपणा. ही जवळीक अचंबित करणारी, स्वत:ला प्रश्न विचारायला लावणारी नि हेवा वाटावी अशी आहे, असं सुरेश सांगतात.
“समाजसुधारणेचं जू आपल्या बापानं (बाबासाहेबांनी) आपल्या खांद्यावर दिलं आहे”, असं म्हणत वस्तीतल्या मुलांसाठी तळमळणारे सुरेश जन्माला घातलेल्या एकाच मुलाचे बाप नसतात. अजूनही वंचित मुलं आहेत… त्यांना स्थैर्य मिळत नाही… त्यांचे आईवडील शिक्षित नाहीत… त्यांना exposure नाही… ही त्यांची सततची खंत. त्यांच्यातला पालक असा झुरतोय.

– सुलेखा नलिनी नागेश