प्रेस नोट – मराठी

मुंबई

अविकसित जिल्ह्यांचे विधानसभेतले प्रतिनिधित्व अत्यल्प,  वर्चस्व विकसित शहरांचेच

मावळत्या विधानसभेतील उपस्थित प्रश्नांवरून चित्र स्पष्ट, ‘संपर्क’कडून  सामाजिक अंगाने लेखाजोखा

………..

२०१४ साली गठित झालेल्या विधानसभेच्या कामकाजातील अभ्यासलेल्या एकूण ९,८३५ प्रश्नांत अल्प मानव विकास निर्देशांक (माविनि) असलेल्या राज्यातील नऊ जिल्ह्यांची मिळून प्रश्नसंख्या (१,१२३) ही मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांच्या एकत्रित प्रश्नसंख्येच्या (२,१३७) जवळपास निम्मी आहे. अवघा एक प्रश्न नंदुरबार या सर्वात कमी माविनि असलेल्या जिल्ह्यातून विचारला गेला. तर, मुंबई उपनगर जिल्ह्यातून सर्वाधिक १,००३ प्रश्न मांडले गेले.  मावळत्या विधनसभेत सत्ताधारी भाजपकडून सर्वाधिक २,९५७ प्रश्न उपस्थित केले गेले. त्या खालोखाल, २,५४९ प्रश्न कॉंग्रेस पक्षाच्या नावावर आहेत.

मुंबईच्या संपर्क संस्थेने २०१४ ते २०१८ या काळातल्या सर्व २८८ आमदारांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या सामाजिक अंगाने केलेल्या अभ्यासातून ही माहिती हाती आली आहे. निवडून दिलेले आमदार सदनात लोकसमस्यांवर नेमके कोणते आणि किती प्रश्न विचारतात, हे नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी, तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आणि अर्धा तास चर्चा या आयुधांखाली मांडले गेलेले सर्व ९,३४८ प्रश्न  संपर्कने विधिमंडळाचे संकेतस्थळ आणि विधानसभा अधिवेशनांचे अहवाल यातून अभ्यासले.  

राज्यातल्या नऊ अल्प माविनि असलेल्या जिल्ह्यांचे विधानसभेतले प्रतिनिधित्व अत्यल्पच असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.  या ९,८३५ प्रश्नांमध्ये ‘मुंबई’ हा शब्द १,०६७ वेळा आला आहे.  सामाजिक प्रश्नांत सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्नविषय पाणी, त्याची प्रश्नसंख्या ७३१  आणि सर्वात कमी विचारला गेलेला प्रश्नविषय महिला, त्याची प्रश्नसंख्या ७३ आहे. अभ्यासलेल्या प्रश्नांत शिक्षण ६२०,  आरोग्य ५६७,  शेती ५६६,  बालक ३३८ आणि बेरोजगारी ९७ अशी प्रश्नसंख्या आहे.

२८८ पैकी  राधाकृष्ण विखेपाटील आणि विजय वडेट्टीवार या आमदारांची प्रश्नसंख्या २०० हून अधिक, तर १३  आमदारांची प्रश्नसंख्या शंभरहून अधिक आहे.   दिलीप सोपल, शिवेंद्रसिंग भोसले, राम कदम, उदय सामंत, केसी पडावी, उदयसिंग पाडवी, विजयकुमार गावीत आणि काशिराम पावरा या आठ आमदारांच्या नावावर, त्यांचा प्रथमोल्लेख असलेला एकही प्रश्न जमा नाही.  अभ्यासलेल्या सात सामाजिक विषयांपैकी, आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, बालक या पाच विषयांवर सर्वाधिक प्रश्न कॉंग्रेसच्या आमदारांनी विचारले आहेत. कुपोषण, बेरोजगारी आणि धोरणविषयक सर्वाधिक प्रश्न भाजपकडून विचारले गेले आहेत. शेकाप, रासप, एमआयएम, भारिप बम, मा कम्यु या पक्षांनी बालकविषयक एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. शेकाप, बविआ, रासप, सप, मनसे, भारिप बम, मा कम्यु या पक्षांनी महिलाविषयक एकही प्रश्न मांडला नाही.  महिलाविषयक सर्वाधिक प्रश्न विचारणार्‍या आमदार दीपिका चव्हाण, राकॉ, बागलाण या आहेत. अधिवेशनांतील उपस्थितीची सरासरी शंभर टक्के असलेल्या त्या एकमेव आमदार आहेत. सर्वात कमी, ३७ टक्के  उपस्थिती शिवेंद्रसिंग भोसले, राकॉं, सातारा यांची आहे.

ज्या पक्षाचे आमदार अधिक संख्येने त्या पक्षाची विधानसभेतील प्रश्नसंख्या अधिक, हे गृहितक लागू झालेले दिसत नाही. कारण शेकापच्या तीन आमदारांनी १७२ प्रश्न विचारले आहेत. रासप आणि सप यांच्या एकेका आमदाराने प्रत्येकी ५१ आणि ४९ प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेपेक्षा कॉंग्रेसची आमदारसंख्या २१ ने कमी आहे. मात्र, कॉंग्रेस आमदारांनी शिवसेनेकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांपेक्षा ११३ प्रश्न अधिक उपस्थित केले आहेत.

कमी मतदारसंघ म्हणजे कमी प्रश्न हा आडाखा या अभ्यासाने चुकीचा ठरवला आहे. तीन मतदारसंघ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातून विचारले गेलेले प्रश्न, चार मतदारसंघ असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातून विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या दुप्पट आहेत. सहा मतदारसंघ असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून मांडले गेलेले प्रश्न, त्याहून दुप्पट मतदारसंघ असलेल्या नागपूर जिल्ह्यातून विचारल्या गेलेल्या प्रश्नांपेक्षा ५४ ने अधिक आहेत.

——–

हे विषय वारंवार चर्चेत

रिक्त पदे, प्रलंबित प्रकल्प, योजनांतील घोटाळे, शासकीय रुग्णालयांत सिटीस्कॅन मशीनची, ट्रॉमा सेंटरची निकड, अवैध वाळूउपसा, अनधिकृत बांधकामे, एमआयडीसीतून होणारे प्रदूषण, पुनर्विकासातील गैरव्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक, जिल्हा सहकारी बॅंकांतील घोटाळे, नद्यांचे प्रदूषण हे विषय प्रश्नांत वारंवार आले आहेत.

———

आमदार संवाद मंचचा जागर

विधानसभेचा कल लक्षात घेऊन, अल्प मानवविकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्यांतून अधिकाधिक प्रश्न विधानसभेत उपस्थित व्हावेत,  यासाठी ‘संपर्क’ने सात मतदारसंघांत  स्थानिक नागरिकांचे ‘आमदार संवाद मंच’ कार्यरत केले आहेत. या माध्यमातून नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय घडवून आणला जात आहे. पुढील महिन्यात ‘संपर्क’ नागरिकांची प्रचारफेरीही काढणार आहे.

मेधा कुळकर्णी  9833518713 / मृणालिनी जोग  982050478  /  हेमंत कर्णिक 9821550498