फड सिंचन पद्धतीची किमया न्यारी, विना खर्च शेतीला पुरवी पाणी

जलसाठ्यांचं विकेंद्रीकरण करून शेती जलसमृद्ध करायची हा विचार डोळ्यासमोर ठेवून धुळे जिल्ह्यातील जवाहर ट्रस्टने जलसंवर्धनाच्या कामाला सुरुवात केली. पहिली काही वर्ष गाजावाजा न करता काम उभं केलं गेलं. आज धुळे तालुक्यात छोटी छोटी पाण्याची बेट तयार झाली आहेत. नदी – नाले यांचं पुनरुज्जीवन केल्याने आता तिथं पाणी ओसंडून वाहतंय. वाळवंट वाटणारा हा प्रदेश पिकांच्या हिरवळीने नटून निघाला आहे.

धुळे तालुका तसा दुष्काळी. त्यामुळे पिण्याचं पाणी वर्षभर टँकरने. अश्या भागात हे काम उभं राहिलं आहे. त्यामुळेच इथल्या दुष्काळी भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे आणि शेतीला पाणी शिल्लक राहू लागलं आहे. शेती सिंचनाच्या ४०० वर्ष जुन्या ‘फड पद्धती सिंचन’ व्यवस्थेला जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून पुनर्जीवित केलं गेलं. त्यामुळे सात गावांतील किमान दोनशे विहिरीं पाण्याने भरून निघाल्या आहेत. या कामात पुढाकार घेतला तो आमदार कुणाल पाटील यांनी.

खान्देशात शाश्वत सिंचन पद्धत म्हणून फड सिंचन पद्धतीकडे पहिलं जातं. या सिंचन पद्धतीत नदी पात्रात बांध घालून गुरुत्वाकर्षण आणि सायफन तत्व वापरून शेती सिंचनाखाली आणली जाते. खान्देशातील पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला अश्या पद्धतीचे फड पद्धती बंधारे होते. यातून पाटाच्या साहाय्याने पाणी शेतात जात होतं. कालांतराने ही पद्धत बंद पडली. जवाहर ट्रस्टने फड पद्धतीचे महत्व समजून घेतलं. आणि सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांची मदत घेतली. सर्व पारंपरिक माहिती जमा केली. नकाशे अभ्यासले गेले आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

दिवसरात्र काम करत संस्थेने मोराणे आणि हेंकळवाडी या दोन फड पद्धती बंधाऱ्यांना जीवनदान दिलं. मोराणे पाट तब्बल साडेसात किलोमीटर लांब कोरण्यात आला. ३२ दिवसात २२५०० घनमीटर काम झालं. आज या पाटाचा फायदा जापी, न्याहळोद, विश्वनाथ, सुकवद आणि मोहाडी या गावातील शेतकऱ्यांना होता आहे. मोराण्याच्या पाटात प्रचंड घाण आणि माती साचली होती. ती हटविण्यात आली. हेंकळवाडीच्या पाटाचा गुदमरलेला श्वासही मोकळा करण्यात आला. हा पाट नऊ किलोमीटर लांब कोरण्यात आला. याचा लाभ हेंकळवाडी आणि परिसरातील गावांना होत आहे. या पाटांचे काम पूर्ण झाल्यावर त्यातून पाणी वाहताना पाहण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली. पाटातलं वाहतं पाणी शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का होता.

या दोन पाटांच्या पुनरुज्जीवनामुळे चारशे हेक्टर शेतजमीन प्रत्यक्षात सिंचनाखाली आली. तसंच, पाटातून पाणी वाहू लागल्याने भूगर्भाची जलपातळी वाढली आहे. शास्त्राच्या निकषांवर हे दोन्ही पाट दोन मीटर रुंद आणि दीड मीटर खोल करण्यात आल्याने त्यांचा भविष्यात कुठलाही दुष्परिमाण नाही. त्यात पाटाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळत असल्याने सर्वच शेतकरी आनंदी आहेत.