फणसवाडीतल्या मुलांना शाळा माहीत नव्हती, संतोष ती उभारण्याचा प्रयत्न करतोय

 

पनवेलमधल्या फणसवाडीतल्या आदिवासी पाड्यावरच्या मुलांना शाळा माहीत नव्हती. संतोषमुळे त्यांना काही गोष्टी माहीत झाल्या आहेत. आता तिथे शाळा उभारण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.


नवी मुंबईतल्या ऐरोलीत राहणारा संतोष माने २८ वर्षांचा मेकॅनिकल इंजिनिअर. इंड्स टॉवर लिमिटेड या कंपनीत मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून तो काम करतो. गेल्या पाच वर्षापासून संतोष काही सामजिक संस्थांसोबतदेखील काम करत आहे. आदिवासी भागात, गरीब , वंचित वस्त्यांमधल्या मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांना नव्यानव्या गोष्टींची जाणीव करून देणं, या गोष्टी संतोषला महत्त्वाच्या वाटतात. आपला वाढदिवस तो या मुलांसोबत साजरा करू लागला.पण हेच काम अजून पुढे जाऊन मोठं व्हावं यासाठी आणखी प्रयत्न्नांची गरज त्याला वाटू लागली. त्यातूनच त्याने पद्मिनी फाउंडेशनची स्थापना कली. आईच्या नावानं सुरू केलेल्या या फाउंडेशनमुळे काम करायला अधिक उर्जा मिळते असं संतोष सांगतो.


दीड वर्षापासून पद्मिनी फाउंडेशननं नवी मुंबईतील सानपाडा,तुर्भे, घणसोली, रबाळे, ऐरोली इथल्या वंचित वस्त्या, कल्याणमधल्या काही वस्त्या , पनवेलमधली फणसवाडी, घाडेश्वर या गावांमधल्या सुमारे ५०० मुलांसाठी काही ना काही काम केलं आहे. शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सुविधांचा बराचसा अभाव जिथे दिसून येतो तिथे तो भरून काढण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न संतोष करत आहे. सरकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तो करतो.
घरच्यांसोबतच त्याच्या मित्रांचादेखील कामात सहभाग आहे. पद्मिनी फाउंडेशनची दहा जणांची टीम आहे. “आदिवासी आणि झोपडपट्टी भागाततील मुलांना आपल्या पायावर उभं राहता यावं त्यासाठी आपल्यासारख्या शिकलेल्या मुलांनी पुढे आलं पाहिजे” अस संतोष सांगतो.

-विजय भोईर, नवी मुंबई

Leave a Reply