कोरोनामुळे शासनानं ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला. पण जिथे इंटरनेटची सुविधा धड नाही, रेंज नाही तिथल्या मुलांचे काय, हा प्रश्न उपस्थित होतोय.
नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील तीनसमाळ, रोषमाळ ही आदिवासीबहुल दुर्गम गावं. सातपुडा पर्वतरांगेत वसलेली. एकीकडे अथांग नर्मदा तर दुसरीकडे घनदाट जंगल. नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवराच्या पाणलोट क्षेत्राजवळील या ठिकाणी जायला पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता आहे खरा. पण तो अगदीच निकृष्ट. गावकऱ्यांसाठी तसा तो काहीच उपयोगाचा नाही. गावात कुठल्याही शासकीय सुविधा नाहीत. जिल्हा परिषदेची शाळा नाही.
याच गावातला लक्ष्मण पावरा. औरंगाबादमध्ये समाजशास्त्र विषयाचं शिक्षण घेतो. लॉकडाऊनमुळे तो गावाला परत आला.
ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी गावातल्या मुलांना मोबाईलची रेंज ही मुख्य अडचण होती. त्यावर लक्ष्मणने शक्कल लढवली. दररोज सकाळी तो घनदाट जंगलातून दीड ते दोन किलोमीटर चालत डोंगरावर जातो. सोबत मुलंही. तिथं एका उंच झाडाच्या फांद्यांवर रेंज मिळते. पाठ डाऊनलोड झाल्यावर लक्ष्मण सोप्या, विद्यार्थ्यांना पटकन समजेल अशा मातृभाषेत त्यांना शिकवतो.
गेले दोन महिने हा उपक्रम सुरू आहे. लक्ष्मण आणि विद्यार्थी उंच फांद्यावर बसून दोन ते तीन तास नियमित अभ्यास करतात. विद्यार्थ्यांनाही याची गोडी लागली आहे. सुरुवातीला चार-पाच विद्यार्थी यायचे. या फांद्यांवरच्या शाळेची पटसंख्या आता २० ते २५ झाली आहे.
-रुपेश जाधव, हिरालाल रोकडे, नंदुरबार