… फिरुनी नवी जन्मेन मी!

पूजा देसाई –चाफळकर. लहानपणापासून गाण्याची आणि अभियनाची प्रचंड आवड. या आवडीच्या जोरावरच तिने मुंबई विद्यापीठात सुवर्ण पदकही मिळवलं. शिक्षणानंतर लग्न नंतर बाळाचं आगमन. असे सगळे सोनेरी क्षण अनुभवणं सुरू होतं. बाळाचं बाराव्या दिवशी बारसंही झालं. दुसऱ्याच दिवशी पाठदुखी थांबेना आणि तापही कमी होण्याचं लक्षण नाही. शेवटी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी पुढील तपासण्यांसाठी तिला पुण्यात हलवायला सांगितलं. पुण्यात चाचण्या झाल्या आणि त्यातून ब्लड कॅन्सरचं निदान समोर आलं. बाळ जेमतेम 20 दिवसांचं. त्या बाळाकडे पाहूनच पूजा खंबीर झाली आणि आजाराशी लढा द्यायचं तिनं ठरवलं. सुरूवातीला पुण्यात उपचार घेऊन पुढच्या उपचारासाठी तिला अमेरिकेला नेण्यात आलं. प्रसुतीपूर्व काळात तिला खोकला आणि अधुनमधून ताप येत होता. पण औषध घेतलं की बरं वाटायचं. तेव्हा हे सतत येणारं आजारपण कशाचं हे मात्र कळलं नव्हतं.


‘फिरूनी नवी जन्मेन मी’ म्हणत आयुष्य सुरू करणारी, प्रत्येक दिवस रसरसून जगणारी पूजा देसाई चाफळकर म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा निर्मळ, नितळ झरा! असं पूजाचे नातेवाईक नेहमीच सांगितात. तिचं लग्न सांगलीतील सागर चाफळकर यांच्याशी झालं. वैवाहिक आयुष्य आनंदाने सुरू असतानाच या रोगाशी चार हात करण्याची वेळ तिच्यावर आली.


आज या घटनेला दीड वर्ष पूर्ण झालं. नुकत्याच झालेल्या तपासणीमध्ये तिनं कॅन्सरवर मात केल्याचं स्पष्ट झालं आहे. आता तिनं पुढच्या वाटचालीची योजनाही आखली आहे. गायनाची आवड असल्याने तिनं वेस्टर्न गाण्याचं अमेरिकेत शिक्षण घेतलं. गाण्याचे ऑनलाईन क्लासेसही ती घेत होती. लवकरच सांगलीत एक अकादमी सुरू करत असल्याची माहिती पूजाने दिली.

– जान्हवी पाटील, रत्नागिरी

 

Leave a Reply